-
Cheaper by the Dozen (चीपर बाय दी डझन)
चिपर बाय द डझन' हे फ्रँक गिलब्रेथ या गृहस्थावर त्याच्या एका मुलीने व मुलाने लिहिलेले पुस्तक. चरित्रात्मक असूनही अत्यंत मनोवेधक व मनोरंजक आहे. फ्रँक गिलब्रेथ व्यवसायाने इंजिनिअर. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे कुशलतेने कशी करावी, यावर ते संशोधन करत व त्याचे प्रयोग आपल्या मुलांमुलींवर करत. त्यानी स्वत:ला जाणीवपूर्वक, ठरवून बारा मुले होऊ दिली. आपल्या मुलांना टंकलेखन, मॉर्सकोड, मोठमोठाल्या रकमांचे तोंडी गुणाकार, भागाकार त्यांनी स्वत:च्या पद्धतीने शिकवले. त्याचप्रमाणे फ्रेंच, जर्मन, भाषा, भूगोल, खगोलशास्त्र शिकवून प्रवीण केले होते. मुलांना जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून शिष्टाचार, रीतरिवाज, याबरोबरच मुलांच्या समित्या बनवून त्यांच्यावर वर्षभराची धान्यखरेदी, वस्त्रप्रावरणांची खरेदी, वगैरे कामे सोपवली होती. घरात कोणत्याही गोष्टीत उधळमाधळ व बेजबाबदारपणा होऊ नये म्हणून एक काटकसर समितीही होती. या समितीतली मुले घरभर हिंडून जरूर नसताना पंखे, दिवे, पाणी वाया जात नाही ना हे पहात व चूक करणार्यास दंडही करत. फ्रँक गिलब्रेथ यांच्या सर्व उपक्रमात मानसशास्त्राची पदवीधर असलेली त्यांची पत्नी लिली सहभागी असे. जागतिक पॉवर परिषद व व्यवस्थापन परिषद (आंतरराष्ट्रीय) इंग्लंड व झेकोस्लोव्हाकियात भरणार होत्या. या दोन्ही परिषदात भाषण करण्यासाठी फ्रँक गिलब्रेथ यांना आमंत्रण होते. तिकडे जायला निघालेले असताना त्यांना, स्वत:च्या गावातच टेलिफोनवरून आपल्या पत्नीला काही सुचना देत असतांना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना मृत्यू येतो. त्यानंतर घरच्या कौटुंबिक मंडळाची बैठक घेऊन लिली फ्रँक गिलब्रेथ, पतीच्या जागी आपण या दोन देशात भाषण देण्यास जाण्याचे ठरवते. तिच्या गैरहजेरीत सर्व मुले अगदी दोन वर्षाच्या मुलांपासून सर्व सांभाळण्याचे तिला आश्वासन देतात.
-
Dairy Of Anne Frank (डायरी ऑफ ऑन फ्रँक)
ऍन फ्रँक ही एक तेरा वर्षाची ज्यू बालिका. दुसर्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या ज्यू द्वेषामुळे घाबरून तिच्या कुटुंबातली चार व आणखी चार माणसे मिळून ऍम्स्टरडॅम येथील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर जवळजवळ दीड दोन वर्षे लपून रहातात. या अवधीत त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तरीही आज ना उद्या आपली सुटका होईल या आशेवर ती जगत राहतात. ऍनला तिच्या तेराव्या वाढदिवशी तिचे वडील एक रोजनिशी बक्षीस देतात. त्या दिवसापासून ती रोजनिशी लिहायला सुरवात करते, ती त्या सर्व मंडळींना पकडून छळगृहात नेईपर्यंत. तिथे अतिशय हालअपेष्टा सोसताना त्या आठांपैकी सात जणंना मृत्यू गाठतो. फक्त ऍनचे वडील ऑटो फ्रँक जगून वाचून सुटून परत येतात. त्यांना ऍनची रोजनिशी सापडते. तिचे संकलन करून ती ते छापतात. त्यात व्यक्तींची नावे काल्पनिक होती. परंतु युद्धसमाप्तीला अर्धशतक लोटल्यानंतर परत संपूर्ण रोजनिशी काही काटछाट न करता छापलेली आहे. 1995 साली हे लोक ज्या ठिकाणी अज्ञातवासात राहिले होते ती इमारत आता विकत घेऊन तिथे ऍन फ्रँकचे स्मारक केले आहे. ऍन वापरत असलेल्या काही वस्तू, तिचे हस्ताक्षर तिथे ठेवलेले आहे. तिच्या रोजनिशीची आजपर्यंत जगातल्या जवळजवळ सत्तर (70) भाषेत भाषांतरे झाली आहेत. ती सर्व, त्या ऍम्स्टरडॅममधल्या तिच्या स्मारकाच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवली आहेत.