Dairy Of Anne Frank (डायरी ऑफ ऑन फ्रँक)
ऍन फ्रँक ही एक तेरा वर्षाची ज्यू बालिका. दुसर्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या ज्यू द्वेषामुळे घाबरून तिच्या कुटुंबातली चार व आणखी चार माणसे मिळून ऍम्स्टरडॅम येथील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर जवळजवळ दीड दोन वर्षे लपून रहातात. या अवधीत त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तरीही आज ना उद्या आपली सुटका होईल या आशेवर ती जगत राहतात. ऍनला तिच्या तेराव्या वाढदिवशी तिचे वडील एक रोजनिशी बक्षीस देतात. त्या दिवसापासून ती रोजनिशी लिहायला सुरवात करते, ती त्या सर्व मंडळींना पकडून छळगृहात नेईपर्यंत. तिथे अतिशय हालअपेष्टा सोसताना त्या आठांपैकी सात जणंना मृत्यू गाठतो. फक्त ऍनचे वडील ऑटो फ्रँक जगून वाचून सुटून परत येतात. त्यांना ऍनची रोजनिशी सापडते. तिचे संकलन करून ती ते छापतात. त्यात व्यक्तींची नावे काल्पनिक होती. परंतु युद्धसमाप्तीला अर्धशतक लोटल्यानंतर परत संपूर्ण रोजनिशी काही काटछाट न करता छापलेली आहे. 1995 साली हे लोक ज्या ठिकाणी अज्ञातवासात राहिले होते ती इमारत आता विकत घेऊन तिथे ऍन फ्रँकचे स्मारक केले आहे. ऍन वापरत असलेल्या काही वस्तू, तिचे हस्ताक्षर तिथे ठेवलेले आहे. तिच्या रोजनिशीची आजपर्यंत जगातल्या जवळजवळ सत्तर (70) भाषेत भाषांतरे झाली आहेत. ती सर्व, त्या ऍम्स्टरडॅममधल्या तिच्या स्मारकाच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवली आहेत.