Pitali Nondvahi - Aathavani Datatat (पितळी नोंदवही - आठवणी दाटतात)

By (author) Devaki Jain / Alka Garud Publisher Granthali

देवकी जैन यांचे त्यांच्या 'दाटलेल्या आठवणीं'चे ग्रंथरूप 'द ब्रास नोटबुक' या नावाने, मराठीत 'पितळी नोंदवही' म्हणून प्रसिद्ध झाल्यामुळे एकूणच आत्मचरित्रात्मक साहित्यात लक्षणीय भर पडली आहे. लक्षणीय अशा अर्थाने की हे पुस्तक (आणि त्याचा अनुवाद) अतिशय धाडसी, मनमोकळ्या आणि विलक्षण ऊर्जा असलेल्या व्यक्तीचे चरित्र म्हणूनच केवळ नव्हे तर एक मोठा सामाजिक सांस्कृतिक पट आपल्यासमोर मांडते. मूळ इंग्रजी ग्रंथात जी चित्रमयता आहे आणि जो अनुभव-प्रवास आहे तो तितक्याच समर्थपणे अलका गरुड यांनी केलेल्या मराठी अनुवादात आला आहे. देवकी जैन यांचा जीवनप्रवास कर्नाटक ते दिल्ली व्हाया ऑक्सफर्ड आणि जगातील अनेक देश, भाषा आणि संस्कृतींमधून समृद्ध झाला आहे. शिक्षणप्रवासही विलक्षण झपाटलेला आणि तेजस्वी विशेष स्कॉलरशिप्स, फेलोशिप्स आणि सन्मान. पुढे विवाहही लक्ष्मीचंद जैन या निष्ठावान गांधीवादी विचारवंताशी. विद्यापीठांतील बुद्धिमान विद्यार्थिनी, अर्थशास्त्रात संशोधन करणारी महिला, स्त्री जीवनाचा साद्यंत अभ्यास करणारी विश्लेषक, काही नवे प्रबंध व सिद्धांत मांडून स्त्रीवादाचे परिपेक्ष्य बदलणारी विचारवंत, बंडखोरी करतानाही समतोल संभाळणारी पण बंडप्रवृत्ती न सोडणारी व्यक्ती, मनस्वी पत्नी आणि आई, चौकटीत राहूनही चौकटीबाहेर विचार करणारी व सक्रिय जीवन जगणारी स्त्री आणि कधीही उमेद वा आशावाद न सोडणारी व्यक्ती आणि वयाच्या ८७ व्या वर्षी आपले जीवन कॅनव्हासवर सापेक्षरीत्या चितारणारी सर्जनशील लेखिका ही त्यांची काही रूपे. अलका गरुड यांनी हा कॅनव्हास आणि ते जीवनचित्र यावरचे रंग तितकेच जिवंत ठेवले आहेत. देवकी जैन यांनीच हे मराठी 'ब्रास नोटबुक' लिहिले असावे, असे वाटण्याइतके प्रभावी आणि प्रवाही 'अनुवादांतर' केले आहे. स्त्री चळवळीत कार्य करणाऱ्या, पण मुख्यतः मराठी समाज/स्त्री जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देवकी जैन यांचे पुस्तक आणि अलका गरुड यांचे भाषांतर अतिशय प्रबोधनकारी ठरणार आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category