-
Punyachi Apurvai (पुण्याची अपूर्वाई)
ओतुर या लहानशा बिनबिजलीच्या गावाहून मी झगमगत्या पुणे शहरात आलो. डोळे दिपले. पाय घसरले तरी सावरलो. नंतर खूप विद्वान भेटले, कलावंत भेटले. त्यांनी खूप शिकवलं. पण खरा रमलो ते पूर्व भागातल्या कारागिरांच्या जगात. त्या साध्यासुध्या मळक्या कपड्यांतल्या, धुळीने भरलेल्या लोकांनी ओढलेच मला त्यांच्यात. त्यांच्या कामातली मग्नता खूप आवडली. आणि एकमेकांशी असलेली संलग्नताही. नंतर कुतूहलाने भरलेले डोळे पुण्याच्या आणखीही काही भागांवरून फिरले. या सगळ्या जागा होत्या; तशी त्यातली माणसेही होती. आजच्या अफाट वाढलेल्या पुण्यात मी माझं पुणं असं जपून ठेवलं आहे.
-
Dhage Aadave Ubhe
ज्या ज्या वेळी स्वतःच्या कर्तृत्वाविषयी मनात विचार येतात, त्या वेळी मी हे मानवसमूह नजरेसमोर आणतो; आणि त्या विचारांची स्वतःलाच लाज वाटू लागते. मी एखाद्या यंत्रमाग-कामगाराच्या पोटी जन्मलो असतो आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून वही-फणीच्या कामाला जुंपलो गेलो असतो, तर? किंवा कामाठीपुर्यातल्या एखाद्या वेश्येपोटी जन्मलो असतो, तर? या समूहांमध्ये जन्मणार्या बहुतेकांच्या वाढण्याला केवढ्या मर्यादा असतात! या थरात जन्मलेली हुशार, हुन्नरी मुलं जागच्या जागी जिरून जात असतील, बघता-बघता यंत्रमागावर हात किंवा पाय हलवणारे ते त्या यंत्राचा एक भाग बनून जात असतील. एखाद्याच्या निर्मितिक्षमतेचा, जगण्याच्या ऊर्मीचा नाश करणं हे मला त्या माणसाच्या खुनापेक्षाही भयंकर वाटतं.
-
Karyarat
अनिल अवचट यांचे `कार्यरत’ हे सोळावे पुस्तक. कार्यहीनता, भ्रष्टाचार, अविवेकी राजकारण यांनी काळोखलेल्या वातावरणात हे काही आशेचे किरण. या पुस्तकातील माणसे समाजातल्या प्रश्र्नांवर सर्वस्व झोकून देऊन काम करणारी. प्रसिद्धीच्या झोताबाहेर राहून समाजासाठी वेगळ्या वाटा शोधणारी.आदिवासींमधे काम करणारी सुरेखा दळवी, विंचूदंशावर इलाज शोधणारे बावस्कर, तुंगभद्रा नदीच्या पर्यावरणाच्या नाशाविरुद्ध लढणारे हिरेमठ, दुष्काळी भागात प्रतिसृष्टी निर्माण करणारे अरुण देशपांडे आणि काका चव्हाण, आणि गडचिरोलीतील आदिवासींमधल्या आरोग्याच्या प्रश्र्नांवर उत्तर शोधणारे अभय व राणी बंग, यांच्या कामाकडे, चारित्र्याकडे पाहिलं तर जगायची नवी उभारी येते. सर्वच काही संपलं नाही, याची ग्वाही, या पुस्तकातली माणसं पानापानावर, वाक्यावाक्यात देत राहतात.
-
Vanat Janat
जवळच्या टेकडी परिसरात फिरायला जायचो, तेव्हा तिथल्या झाडांशी, वेलींशी, पायवाटेशी मी मनातल्या मनात बोलू लागलो आणि त्याची गंमत वाटू लागली. या झाडांच्या, वेलींच्या, दगडांच्या, कोळीकीटकांच्या दृष्टीने जग पाहू लागलो. मी त्यांना शब्द दिले, संवाद दिले, ते माझ्याशी बोलू लागले. खरं तर मीच माझ्याशी बोलू लागलो होतो. लहान मुलांमध्ये जशी `फॅंटसी’ असते, तिने उतारवयात माझ्यात प्रवेश केला आणि मीही परत लहान झालो. या गोष्टींनी मला खूप खूप दिलंय. बालपण तर दिलंच. माणसांच्या सुखदुःखांकडे आजवर पाहत होतो आता त्या पलीकडच्या सृष्टीला काय म्हणायचंय तो आवाज ऐकू लागलो आणि भराभरा लिहीत गेलो. `सृष्टीत… गोष्टीत’ या पहिल्या गोष्टींना छान प्रतिसाद मिळाला. नंतरच्या काळात लिहिल्या गेलेल्या या पन्नास गोष्टी. त्याही तुमच्यापुढे ठेवीत आहे.
-
America
अमेरिकेहून आल्यावर वाटलं, बरं झालं आपण जाऊन आलो ते. वेगळा समाज, वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली. वेगळा पाया, वेगळे संकेत असलेला समाज अस्तित्वात असू शकतो. हे आधी जाणवलं नव्हतं. वाटायचं, आपल्यासारखंच तिथं. फक्त जरा श्रीमंती थाटाचं. पण तसं ते नव्हतं. ते वेगळंच होतं आणि ते पाहणं फार आवश्यक होतं. कारण ते आपल्याकडे येऊ घातलंय आणि तेही अधिक विकृत स्वरूपात. उद्या आपल्याकडे काय प्रश्र्न असणार आहेत, याचा अंदाज आजची अमेरिका पाहून लावता येतो.
-
Srushtit Goshtit (सृष्टीत... गोष्टीत)
पहिल्यांदाच गोष्टी लिहायला लागलोय. जवळच्या टेकडी परिसरातील जंगलात फिरू लागलो. अचानक मला एक भाषा सापडली. तिच्यामुळे मी ओळखीच्या झाडांशी बोलू लागलो. नंतर कळलं, गवत, झुडपं सगळेही त्याच भाषेत बोलताहेत. मग काय नुसत्या गप्पा आणि गप्पाच. कधीतरी पक्ष्यांनी, किड्यांनीही येऊन बोलायला सुरूवात केली. आणि घरी आल्यावर वरचा पंखाही त्याच्या घसघस भाषेत म्हणाला, `काय माझ्याशी नाही बोलायचं वाटतं’. या सगळ्यांनी माझं जीवन काठोकाठ भरून टाकलंय. त्यांच्या गप्पांमधून निघालेल्या या काही गोष्टी.