Dhage Aadave Ubhe
ज्या ज्या वेळी स्वतःच्या कर्तृत्वाविषयी मनात विचार येतात, त्या वेळी मी हे मानवसमूह नजरेसमोर आणतो; आणि त्या विचारांची स्वतःलाच लाज वाटू लागते. मी एखाद्या यंत्रमाग-कामगाराच्या पोटी जन्मलो असतो आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून वही-फणीच्या कामाला जुंपलो गेलो असतो, तर? किंवा कामाठीपुर्यातल्या एखाद्या वेश्येपोटी जन्मलो असतो, तर? या समूहांमध्ये जन्मणार्या बहुतेकांच्या वाढण्याला केवढ्या मर्यादा असतात! या थरात जन्मलेली हुशार, हुन्नरी मुलं जागच्या जागी जिरून जात असतील, बघता-बघता यंत्रमागावर हात किंवा पाय हलवणारे ते त्या यंत्राचा एक भाग बनून जात असतील. एखाद्याच्या निर्मितिक्षमतेचा, जगण्याच्या ऊर्मीचा नाश करणं हे मला त्या माणसाच्या खुनापेक्षाही भयंकर वाटतं.