-
Gappangan. (गप्पांगण)
प्रत्येक माणसाला अन्न पाणी वस्त्र निवारा या मूलभूत गरजांच्या पाठोपाठ गरज असते ती संवादाची. ( अर्थात शक्यतोवर सुसंवादाची ) बाळाच्या जन्मानंतर काही काळातच आई आणि इतरजणही 'अडगुळं मडगुळं' पासून 'येरे येरे चांदोबा' पर्यंत बाळाशी एक प्रकारे वरवर पाहता निरर्थक पण संवेदनांच्या संदर्भात सार्थ शब्दात संवाद साधू लागते. संवादाची नंतर नंतर गरज, सवय, आवड आणि निकड भासू लागते. गप्पा मारणे (थापा नव्हेत) हा विरंगुळा हवासा वाटतो. अशा गप्पांतून कितीतरी विषयांना, व्यक्तींना, गावांना, देशांना, आठवणींना स्पर्श होतो. वेदनेला उद्गार आणि हर्षाला उल्हास मिळतो. निंदकाचे घर शेजारी पाजारी नसेल तर कौतुकाची थाप मिळते. एकूणच जीवन व्यवहार सुखदायी होतो. वाचलेले,ऐकलेले, पाहिलेले,अनुभवलेले असे काही थोडे-फार गप्पांच्या माध्यमातून संक्रमित होते. गावाकडचा पिंपळाचा पार ते ऑर्कुट पर्यंतचा प्रवास या गप्पांच्या साक्षीतच झाला आहे. सगळं खरं आहे! पण या गतिमान युगात (ऑर्कुटचा अपवाद)गप्पांना वेळ देणं घेणं जरा अवघडच झालंय. मग अशात कोणी संवेदनशीलपणे अक्षरगप्पा करायला लेखणी हाती धरली तर ? लेखिका माधवी कुंटे यांनी अशाच विविध विषयावरच्या अक्षरगप्पा केल्या आहेत. सरळ मनाने आणि सरळ शब्दात, उपदेशाच्या अभिनिवेश नाही. सरळ सरळ मोकळ्या गप्पा. या गप्पांगणात गप्पांचा अड्डा जमवूयात आपण सारेजण. गप्पांगणात तुमचे मनः पूर्वक स्वागत!
-
Maitra ( मैत्र )
माधवी कुंटे यांचा हा तेरा कथांचा कथासंग्रह ज्यात स्त्री मनाचे चित्रण केले आहे. विविध भावना प्रसंग याचे प्रसंगानुरूप लेखन वाचनीय आहे.