-
Build The Life You Want (बिल्ड द लाईफ यू वॉन्ट)
या पुस्तकात मला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. मला आशा आहे की, तुम्हीदेखील त्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहाल. म्हणजे एक अशी खऱ्या अर्थी आनंदी व्यक्ती पाहाल, जी तुम्ही बनू शकता. आर्थरने या पुस्तकात मांडलेल्या तत्त्वांचे मी पालन करते आणि त्यामुळे मी अधिकाधिक आनंदी होत चालले आहे. मला खरंच मजा येत आहे. मला हे पक्कं माहिती आहे की, जेव्हा आपण दुसऱ्यांना आनंद देतो तेव्हा तो वाढतो. हे पुस्तक तुम्हाला आनंद स्वीकारण्याचं आणि तुमचा आनंद इतरांनाही वाटण्याचं स्मरण देत राहील. ओप्रा विन्फ्रे या पुस्तकात... आनंद म्हणजे काय? भावनांचं व्यवस्थापन मेटाकॉग्निशनची शक्ती आपला नावडता भूतकाळ परत कसा लिहावा? उद्देश्य असलेलं आणि अर्थपूर्ण जीवन जे खरोखरच महत्त्वाचं आहे ते घडवणे
-
Heads You Win (हेड्स यु विन)
अलेक्झांडर कारपेन्कोला बालपणापासूनच स्पष्ट दिसत असतं की, तो देशवासीयांचं नेतृत्व करण्यासाठीच जन्माला आला आहे; पण राज्य वाचविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्या वडिलांची ‘केजीबी’द्वारे हत्या होते, तेव्हा जीव वाचविण्यासाठी त्याला आपल्या आईबरोबर रशियातून पळ काढावा लागतो. गोदीवर त्यांच्यासमोर दोन पर्याय असतात – त्यांनी अमेरिकेला जाणार्या जहाजाच्या कंटेनरमध्ये चढावं की ग्रेट ब्रिटनला जाणार्या, याची निवड अलेक्झांडर नाणं उडवून करतो... एका क्षणात, अलेक्झांडरच्या भविष्याला दुहेरी कलाटणी मिळते. दोन खंड आणि तीस वर्षांच्या काळाची व्याप्ती असलेल्या या भाग्य आणि भविष्याच्या दंतकथेमध्ये, एक स्थलांतरित म्हणून नवीन जगावर राज्य करण्याच्या त्याच्या जय आणि पराजयाच्या हिंदोळ्यांवर आपणही स्वार होतो. अलेक्झांडरची ही अद्वितीय कथा उलगडत असताना, आपल्या नशिबात काय लिहिलं आहे याची त्याला जाणीव होते आणि शेवटी रशियातील भूतकाळ आपली पाठ सोडणार नाही, हे तो स्वीकारतो.
-
The Dance of Anger (द डान्स ऑफ अंगार)
‘राग’ या भावनेवर क्रेद्रित असलेलं पुस्तक आहे ‘द डान्स ऑफ अँगर.’ या पुस्तकातून राग या भावनेचा (विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत) विविध दृष्टिकोनांतून विचार केला गेला आहे. स्त्रीला रागावण्याचा अधिकार नाही, असं समजलं जातं आणि ती रागावली तर तिला नकारात्मक विशेषणं लावली जातात, याकडे लेखिकेने लक्ष वेधलं आहे. स्त्रीचं रागावणं लोकांना का नको असतं, स्त्रीला रागावतानासुद्धा विचार का करावा लागतो, तिच्या रागावण्याचे परिणाम काय असतात याविषयी या पुस्तकात चर्चा केली आहे. तसेच राग आलेला असतानाही शांत राहण्यामुळे, ‘स्व’ची जाणीव कशी बोथट होत जाते, याबद्दलही लेखिकेने लिहिलं आहे. राग व्यक्त करण्याची पद्धत आणि त्यामुळे होणारे तोटेही लेखिका लक्षात आणून देते. रागाला जर विधायक वळण लावायचं असेल तर काय करायचं, याचं मार्गदर्शन लेखिकेने केलं आहे. स्त्रीची रागाची भावना पुरुषप्रधान संस्कृतीमुळे कशी दाबली जाते आणि त्यामुळे तिची क्षमता कशी झाकली जाते, याचीही चर्चा या पुस्तकात केली आहे. ज्या गोष्टीसाठी राग व्यक्त केला जातो, त्या गोष्टीसाठी अन्य पर्यायांचा विचार कसा करता येऊ शकतो, याचंही मार्गदर्शन या पुस्तकातून केलं आहे. स्वची स्पष्टता, नवरा-बायकोंमधील भांडणं हे मुद्दे सोदाहरण पटवून दिले आहेत. थोडक्यात, राग या नैसर्गिक भावनेला विधायक वळण देऊन, त्याचा सकारात्मक उपयोग करून आपल्या जीवनात आणि व्यक्तिमत्त्वात कसा बदल घडवून आणायचा, याचं नेमकं मार्गदर्शन या पुस्तकातून होतं. त्यामुळे हे पुस्तक व्यक्तिमत्त्व विकासासाठीही उपयुक्त ठरावं.