-
Ayodhya Te Varanasi (अयोध्या ते वाराणसी)
भारतीय जनता पक्षाचा सत्तेपर्यंत पोचण्याचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला तो १९९० च्या ‘सोमनाथ ते अयोध्या’ रथयात्रेपासून… तेव्हा ‘भाजप’चं नेतृत्व होतं वाजपेयी अडवाणी यांच्याकडे. नंतर १९९८ पासून सहा वर्षं सत्तेवर राहिल्यानंतर २००४ साली ‘भाजप’ला सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं… आणि तेव्हापासून पक्षसंघटना ढवळून निघायला सुरुवात झाली . पुढे नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली अधिक आक्रमक होत , ‘भाजप’ ने २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवली… आणि हा पक्ष पुन्हा सत्तारूढ झाला… व तेथून ‘भाजप २.०’ची सुरुवात झाली . २०१४ च्या निवडणूकीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मोदी यांनी ‘वाराणसी’ येथूनही लोकसभेची जागा लढवली आणि त्याच जागेचं प्रतिनिधित्व कायम ठेवलं… हा सर्व प्रवास ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी ‘दिसलं तसं… बघितलं जसं’ या शैलीत पुस्तकात मांडला आहे. पंचवीस वर्षांचा हा प्रवास सांगता – सांगता अकोलकर दीनदयाळ उपाध्याय, शामा प्रसाद मुखर्जी, जनसंघ… अशा पूर्वेतिहासाचाही आढावा घेतात आणि या सर्व प्रवासाचं वस्तुनिष्ठपणे विश्लेषणही करतात. भाजपच्या वाटचालीचा समग्रपणे मागोवा घेणारं मराठीतलं महत्वाचं पुस्तक… अयोध्या ते वाराणसी !
-
Mitramayajagat (मित्रमयजगत )
पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी मुंबईत पत्रकारितेत चार दशके व्यतित केली. आपल्या बातमीदारीच्या संपन्न अनुभवात भेटलेल्या माणसांची व्यक्तिचित्रे त्यांनी या पुस्तकात रंगवली आहेत. त्यात गोविंद तळवलकरांसारखे साक्षेपी संपादक, दिनू रणदिवेंसारखे हाडाचे बातमीदार, बाळासाहेब ठाकरे ते शरद पवार असे स्वतःचा ठसा निर्माण केलेले बडे नेते, देव आनंद, सुनील दत्त यांच्यासारखे कलावंत भेटतात. अकोलकर मूळ नाशिकचे, तेथील मूळ वाड्याच्या, तेथे घडलेल्या संस्कारांच्या, जडणघडणीच्या आठवणी त्यांनी जाग्या केल्या आहेत. बातमीदारी करताना जागवलेल्या रात्रींचे किस्से सांगितले आहेत. अकोलकरांची भावगर्भ व ललितरम्य शैली, ओघवती भाषा व ठोस भूमिका यांमुळे पुस्तक वाचनीय झाले आहे. चार दशकांत पत्रकारितेची बदलत गेलेली रूपेही इथे नकळत उलगडलेली आहेत.