Mitramayajagat (मित्रमयजगत )
पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी मुंबईत पत्रकारितेत चार दशके व्यतित केली. आपल्या बातमीदारीच्या संपन्न अनुभवात भेटलेल्या माणसांची व्यक्तिचित्रे त्यांनी या पुस्तकात रंगवली आहेत. त्यात गोविंद तळवलकरांसारखे साक्षेपी संपादक, दिनू रणदिवेंसारखे हाडाचे बातमीदार, बाळासाहेब ठाकरे ते शरद पवार असे स्वतःचा ठसा निर्माण केलेले बडे नेते, देव आनंद, सुनील दत्त यांच्यासारखे कलावंत भेटतात. अकोलकर मूळ नाशिकचे, तेथील मूळ वाड्याच्या, तेथे घडलेल्या संस्कारांच्या, जडणघडणीच्या आठवणी त्यांनी जाग्या केल्या आहेत. बातमीदारी करताना जागवलेल्या रात्रींचे किस्से सांगितले आहेत. अकोलकरांची भावगर्भ व ललितरम्य शैली, ओघवती भाषा व ठोस भूमिका यांमुळे पुस्तक वाचनीय झाले आहे. चार दशकांत पत्रकारितेची बदलत गेलेली रूपेही इथे नकळत उलगडलेली आहेत.