-
Kundha (कुंधा )
आपण नुसते हामाल हे. हामालावून बी निफ्तर! कशे म्हना. जमिनी लय हाये आपल्याजो, पण नुसत्या नावाले. खरे मालक दुसरेस हे तिचे. शेठ, सावकार, बँका, पतपेढ्या, राजकीय नेते हे मालक हे तिचे. त्येंच्ह्या तालावर नाचतो आपू. ते, नाचवता आन् रंघत शोषून घेता आपलं. कसा वाचीन शेतकरी मंग?' दगा मास्तरानं सांगितलेलं खानदेशी 'तावडी' भाषेतलं हे -हाससूत्र 'कुंधा' या अशोक कौतिक कोळी यांच्या या कादंबरीचा अर्थबिंदू आहे. गावरहाटीतली सनातन संघर्षघंटा कादंबरीतून लेखकाने अशी काही वाजवली की, राजकारणाचा कुंधा वावर आणि शेतच उखडून फेकायला कसा सज्ज झाला; यासंबंधीचा थरार उभा करण्यात ही कादंबरी पुष्कळ विजयी झाली आहे. लेखकाकडे मोठे भाषादव्य आहे, अनुभव सोलून मांडण्याची ऊर्जा त्याच्याकडे आढळून येते. शिवाय गावातील हितसंबंध सडवत ठेवणारी काळोखजन्य वृत्ती सूड, लोभ, बदला, वचपा आणि तंटा यांना एकत्र मिसळून सतत वर कसा नागफणा काढते, याचे भेदक चित्रण 'कुंधा' कादंबरीतून आलेले आहे. कुंधा प्रतीकरूपाने सिद्ध झाला असला तरी शेतीच्या कर्माधर्माशीच तो जखडलेला नाही. गावातील झगड्याच्या मूळाशी हा कुंध्याचा राक्षस आहे. राजकारणानिमित्त बखेडा उत्पन्न करणारा कुंधा तर कादंबरीत खलनायकासारखा वधिर्त झालेला आहे. कादंबरी वतनदार वाडा आणि आसामी वाडा या दोन संघर्षपीठांचा पीळ प्रगट करते. ही दोन्ही संघर्षपीठं क्षीण मतलबांसाठी जीवांवर उठतात. आणि एका अर्थानं दोघंही रक्तबंबाळ होतात.
-
Aasud
या कथासंग्रहातून अशोक कोळी यांनी खानदेशाच्या शेतकी जीवनाची सर्वांगीण व्यथा आणि कथा महात्मा फुलेंच्या वास्तवशैलीचा वारसा स्वीकारुन अत्यंत उत्कटपणे चित्रित केली आहे. शेतीच्या वर्तमान अवस्थेचे व शेतक-यांच्या भीषण जगण्याचे सशक्तपणे चित्रण करणारी त्यांची कथा तिच्या आविष्कारशील बोली भाषेमुळे ग्रामीण कथेचे नवे वळण किती समृद्ध आहे, त्याचे दर्शन घडविणारी आहे. एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकाच्या मराठी ग्रामीण कथेतील 'शेती' आणि 'बळीराजा' यांच्या प्रश्नांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी असलेल्या अशोक कोळी यांचा हा कथासंग्रह. यातील कथा शेतीच्या प्रश्नांची उकल करताना संघर्षाला आंदोलनाचे नवे परिमाण देतात. शोषणव्यवस्थेवर 'आसूड' फटकारतात. आजच्या खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या छायेतून आलेल्या शोषणाच्या नवनव्या रूपांना छेद देत कथाकाराची लेखणी सामाजिक वास्तवाचा जळजळीत आविष्कार करते आणि व्यवस्थेचा बळी ठरलेल्या कष्टकरी माणसाला अंतर्बाह्य हलवून सोडते. शेतकर्याच्या दुबळ्या मनोवृत्तीला आत्मशोधातून संघर्षाचे आत्मभान देण्याचे सामर्थ्य या लेखणीत आहे. शेतकर्याला स्वत:चे प्रश्न स्वत: सोडविता आले पाहिजेत, याची ओढ या कथाकाराला आहे. या कथांची शीर्षके, व्यक्तिरेखा, त्यांचा नैसर्गिक रांगडेपणा, अंतरंगाची प्रांजळता हे सर्व विविध वृत्ती-प्रवृत्तींनी प्रकट होणारे आहे. कथाकाराने ते मुद्दाम जीवनानुभूतीतून जसेच्या तसे ठसकेबाजपणे टिपलेले आहे. कथेला वास्तव रूप देण्याची हातोटी, बोलीतील रांगडे संवाद, शब्द व त्याचे अर्थवैभव, मातीशी नातं सांगणारी भाषाशैली ! हा सारा आविष्कार लेखकाच्या स्वतंत्र प्रतिभेची साक्ष देणारा आहे.