Aasud
या कथासंग्रहातून अशोक कोळी यांनी खानदेशाच्या शेतकी जीवनाची सर्वांगीण व्यथा आणि कथा महात्मा फुलेंच्या वास्तवशैलीचा वारसा स्वीकारुन अत्यंत उत्कटपणे चित्रित केली आहे. शेतीच्या वर्तमान अवस्थेचे व शेतक-यांच्या भीषण जगण्याचे सशक्तपणे चित्रण करणारी त्यांची कथा तिच्या आविष्कारशील बोली भाषेमुळे ग्रामीण कथेचे नवे वळण किती समृद्ध आहे, त्याचे दर्शन घडविणारी आहे. एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकाच्या मराठी ग्रामीण कथेतील 'शेती' आणि 'बळीराजा' यांच्या प्रश्नांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी असलेल्या अशोक कोळी यांचा हा कथासंग्रह. यातील कथा शेतीच्या प्रश्नांची उकल करताना संघर्षाला आंदोलनाचे नवे परिमाण देतात. शोषणव्यवस्थेवर 'आसूड' फटकारतात. आजच्या खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या छायेतून आलेल्या शोषणाच्या नवनव्या रूपांना छेद देत कथाकाराची लेखणी सामाजिक वास्तवाचा जळजळीत आविष्कार करते आणि व्यवस्थेचा बळी ठरलेल्या कष्टकरी माणसाला अंतर्बाह्य हलवून सोडते. शेतकर्याच्या दुबळ्या मनोवृत्तीला आत्मशोधातून संघर्षाचे आत्मभान देण्याचे सामर्थ्य या लेखणीत आहे. शेतकर्याला स्वत:चे प्रश्न स्वत: सोडविता आले पाहिजेत, याची ओढ या कथाकाराला आहे. या कथांची शीर्षके, व्यक्तिरेखा, त्यांचा नैसर्गिक रांगडेपणा, अंतरंगाची प्रांजळता हे सर्व विविध वृत्ती-प्रवृत्तींनी प्रकट होणारे आहे. कथाकाराने ते मुद्दाम जीवनानुभूतीतून जसेच्या तसे ठसकेबाजपणे टिपलेले आहे. कथेला वास्तव रूप देण्याची हातोटी, बोलीतील रांगडे संवाद, शब्द व त्याचे अर्थवैभव, मातीशी नातं सांगणारी भाषाशैली ! हा सारा आविष्कार लेखकाच्या स्वतंत्र प्रतिभेची साक्ष देणारा आहे.