-
Vedhak Vijaya Wad (वेधक विजया वाड)
आपल्या लेखनाचा विशिष्ट दर्जा सांभाळून सातत्याने कथालेखन करणाऱ्यांमध्ये विजया वाड यांचा उल्लेख करायला पाहिजे. दर्जा सांभाळणे आणि लेखनाचे सातत्य टिकवणे या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. सातत्यामुळे एक प्रकारची लेखनमग्नता येते. लेखनाच्या, अभिव्यक्तीच्या, आविष्काराच्या व्यापात मन व्यग्र राहाते. त्याच्याच जोडीला सर्जनवृत्तीला गांभीर्यही येते. विजयाबाईंच्या बऱ्याच कथा स्त्रियांच्या मानसिकतेवर लिहिल्या गेल्या आहेत. एक स्त्री म्हणून पुरुषप्रधान समाजात जीवन व्यतीत करताना स्त्रीच्या मनात कोणती स्पंदने, आंदोलने, चालू असतात याचे सुरेख चित्रण विजयाबाईंनी आपल्या अनेक कथांतून केले आहे.
-
Ramabai Mahadevrao Ranade-Vyaktitva Aani Kartutav
एकोणिसावे शतक हा महाराष्ट्राचा प्रबोधनाचा कालखंड . थोर विचारवंत आणि समाजसुधारकांचा परिसस्पर्श लाभलेला महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा गौरवशाली कालपट . याच काळात स्त्रियांच्या दुःस्थिती - निवारणाचे महत्त्वपूर्ण कार्य ज्या काही मोजक्या स्त्रियांकडूनही घडले , त्यांपैकी रमाबाई रानडे हे एक ठळक नाव . खरेतर सावित्रीबाई फुले आणि पंडिता रमाबाई यांच्या बरोबरीने घेण्यायोग्यतेचे नाव . मात्र त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा जेवढा परिचय देशवासियांस व्हावयास हवा होता तेवढा दुर्दैवाने झालेला दिसत नाही . खुद्द महाराष्ट्रालाही त्यांचे विस्मरण झाले आहे की काय अशीच परिस्थिती अपवाद वगळता जाणवू लागली होती . २०१२ हे वर्ष रमाबाईंचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्म - वर्ष . या निमित्ताने त्यांचे असाधारण जीवन आणि अतुलनीय कार्य परिचित करून देण्याचा स्तुत्य उपक्रम मॅजेस्टिक प्रकाशनने हाती घेतला आणि विलास खोले यांच्यासारख्या जाणकार , संशोधक प्रवृत्तीच्या लेखकाने रमाबाईंचे चरित्र सिद्ध करून तो तडीस नेला .
-
Shantaram Paritoshik Katha (शांताराम पारितोषिक कथा
मराठीतील सुप्रसिद्ध कथाकार प्रा. के. ज. पुरोहित ऊर्फ शांताराम यांच्या नावे दरवर्षी सर्वोत्तम कथेला दिल्या जाणार्या `शांताराम कथा पारितोषिक’ योजनेला आता पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. इतक्या सातत्याने मराठी कथेसाठी दिले जाणारे हे एकमेव पारितोषिक आहे. गेल्या पंधरा वर्षांत मराठी कथेने जी वेगवेगळी रूपे धारण केली आणि वेगवेगळ्या जीवनानुभवांचे जे कवडसे कथांद्वारे साकार केले ते पाहता भिन्नभिन्न कथाकारांनी लिहिलेल्या `शांताराम कथा-पारितोषिक’प्रांप्त गुणवान कथांचा प्रस्तुत संग्रह म्हणजे विविध रंगरूपांनी विनटलेले मराठी कथाविश्र्वातील मनोहर इंद्रधनुष्य आहे. मराठी कथासाहित्य समृद्ध करणारे या संग्रहातील सुमेध वडावाला रिसबूड, प्रिया तेंडुलकर, रोहिणी कुलकर्णी, आशा बगे, प्रकाश नारायण संत, मेघना पेठे, अनुराधा चिन्मुळगुंद, संजीव लाटकर, राजन खान, राजन गवस, मधुकर धर्मापुरीकर, मोनिका गजेंद्रगडकर, लक्ष्मण लोंढे, श्रीरंग विष्णू जोशी, माधुरी शानभाग हे सर्व कथाकार शांताराम कथापारितोषिकाचे मानकरी आहेत. समकालीन मराठी कथेच्या स्वरूपाचे यथार्थ दर्शन घडविणारा हा संग्रह केवळ वाचनीयच नाही तर संग्राह्य आहे.