Vedhak Vijaya Wad (वेधक विजया वाड)
आपल्या लेखनाचा विशिष्ट दर्जा सांभाळून सातत्याने कथालेखन करणाऱ्यांमध्ये विजया वाड यांचा उल्लेख करायला पाहिजे. दर्जा सांभाळणे आणि लेखनाचे सातत्य टिकवणे या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. सातत्यामुळे एक प्रकारची लेखनमग्नता येते. लेखनाच्या, अभिव्यक्तीच्या, आविष्काराच्या व्यापात मन व्यग्र राहाते. त्याच्याच जोडीला सर्जनवृत्तीला गांभीर्यही येते. विजयाबाईंच्या बऱ्याच कथा स्त्रियांच्या मानसिकतेवर लिहिल्या गेल्या आहेत. एक स्त्री म्हणून पुरुषप्रधान समाजात जीवन व्यतीत करताना स्त्रीच्या मनात कोणती स्पंदने, आंदोलने, चालू असतात याचे सुरेख चित्रण विजयाबाईंनी आपल्या अनेक कथांतून केले आहे.