-
Agresar (अग्रेसर)
अग्रेसर म्हणजे भाऊ पाध्ये यांनी काढलेला साठोत्तरी मुंबईची आंतरिक संरचना दाखवणारा विलक्षण एक्सरे आहे. बकाल चाळींपासून उच्चभ्रू वर्तुळांपर्यंतची सांस्कृतिक वस्तुस्थिती तिच्यातील गुंतागुंतीच्या पेचांसह भाऊ पाध्ये यांनी मार्मिकपणे टिपली आहे. वैजू हे या कादंबरीतील प्रमुख पात्र आहे. तिने स्वतः च्या आयुष्याचे केलेले कथन, वाचकाच्या आकलनाशी तिने मांडलेला लपंडाव, तिच्या संभाषिताचा अस्सलपणा या सर्व गोष्टी मराठी कादंबरीच्या इतिहासात वैशिष्ट्यपूर्ण ठराव्यात अशा आहेत. दांभिकता, संधीसाधूपणा, स्वतः ची व इतरांची केलेली फसवणूक, होरपळ, आकांत, वस्तुनिष्ठा, व्यवहारीपणा अशा अनेक छटांसह समोर येणारी अग्रेसर वैजू मराठी कादंबरीमधील एक अपवादात्मक पात्र आहे.
-
Karanta (करंटा)
स्वातंत्र्योत्तर कालखंडामधील अनेक स्तरांवरील नैतिक अधः पतनाची कथा भाऊ पाध्ये यांच्या करंटा या कादंबरीतून साकार होते. या कादंबरीमधून मुंबईसारख्या औद्योगिक शहरातील कामगार युनियनचे जग त्याला असलेल्या अनेक परीमानांसह उभे राहते. स्वार्थाचा स्पर्श न झालेला कार्यकर्ता आझादचाचा, परवड झालेले त्याचे कौटुंबिक आयुष्य, मूल्यनिष्ठ माणसांची ससेहोलपट करणारे युनियनमधील राजकारण, या साऱ्याला असलेले आर्थिक संदर्भ या सर्व गोष्टींचा लेखाजोखा भाऊ पाध्ये अत्यंत तटस्थपणे मांडतात. कामगार चळवळीचे आतून चित्रण करताना त्यांची मानुस्पनावरची नजर किंचीतशीही हटत नाही. -हरिश्चंद्र थोरात
-
Vasunaka (वासूनाका)
वालपाखडी मुंबईत कोठेतरी नांदते आहे. वासूनाका ही तिची चावडी. येथे मामू, डाफ्या, मामा सुर्वे अशी इरसाल पुरुषमाणसे आहेत आणि भानू, बायजी यांच्यासारख्या तरबेज बायका आहेत. मौलागिरी व चैन करणे, लस्सी आणि हातभट्टीची दारू पिणे, आकडे लावणे आणि पोरी फितवणे हाच नाक्यावरच्या टोळक्याचा धंदा आहे. मुंबापुरीच्या अजस्त्र, अस्ताव्यस्त, गहिऱ्या जीवनावर सभ्य पांढरपेशांचा फेस इथेतिथे संथ रेंगाळत असतो. त्याचा चिकट गढूळ गाळ मात्र अशा पाखाड्यातून व नाक्यावरून ढवळत हिंदकळत राहतो. पाप व पुण्य, सभ्य व असभ्य असे भेद या गाळात बुडून नाहीसे झालेले आहेत. सारेच विलक्षण व भेसूर वास्तव आहे पण ते या नाक्यावरच्या टोळक्याला साधे, रोजचे वाटते. भाऊ पाध्ये यांनी या वास्तवांचा उग्र कुबट वास या कथांतून पकडला आहे. नावाला मराठी, पण उर्दु, इंग्रजी व खास बनविलेल्या सांकेतिक शब्दांनी भरड झालेली या टोळभैरवांची भाषाच बेडर, लंपट वासनांच्या दर्पाने दरवळणारी आहे. परंतु वासना चाळवणारी अश्र्लीलता पाध्यांच्या या कथांतून नाही. जे काही आहे, ते भंकसपणाच्या दिशाशून्य जीवनाच्या वास्तवाचे निर्भय चित्रण आहे. वासूनाका ही कादंबरी बकाल महानगरी संस्कृतीतल्या बेकार, तरुण मुलांसंबंधी एकाच वेळी कारुण्य आणि उत्तरे नसलेले प्रश्र्न निर्माण करते. लैंगिक विकृतीचे, मवाल्यांच्या मनातील नैतिक जाणीवेचे, त्यांच्या टोळीच्या आपसातील शिस्तीचे हे चित्रण मराठी साहित्यसृष्टीत एकमेव व विलक्षण असे आहे.