Pratiksha ( प्रतीक्षा )
प्रतीक्षा' ही कादंबरी रणजित देसाईंच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी प्रकाशित झाली. पुनर्लेखनासाठी देसाईंनी ती बाजूला ठेवून दिली होती. परंतू पुनर्लेखन होवू शकले नाही. या कादंबरीत एक भावपूर्ण प्रेमकहाणी चित्रित झालेली असून यातील वातावरण आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. संपूर्ण कथानक हिमालयाच्या परिसरात घडते. कादंबरीचा नायक अतृत्प आणि असफल प्रेमजीवनातून आलेल्या निराशेपोटी भटकत असतो. खर्या प्रेमासाठी फिरत फिरत हिमालयात येतो आणि येथेच त्याची नायिकेशी गाठ पडते. नायक अतिशय हलक्या व भावपूर्ण अंत:करणाचा आहे. तर नायिका सुंदर, सत्वशील, प्रमळ, संयमी कर्तव्यदक्ष आणि विचारी आहे. अतिशय अलगदपणे या दोघांमधील भावबंध विणले जातात. ती हळूहळू घट्ट होणारी वीण वाचकाला मंत्रमुग्ध करते. प्रेमाचा संयमित आविष्कार हा अधिक शृंगारिक असतो याचा प्रत्यय ही कादंबरी वाचताना येतो. बाबांच्या व्यक्तिरेखेतून पाप, पुण्य, प्रेम जीवन परमेश्वर इत्यादी विषयांची वेगळी पण ठाम मते वाचकांपुढे येतात. कथेला आणि व्यक्तीरेखनाला पुष्टी देणारे विचार म्हणून कादंबरीत त्याला विशेष स्थान आहे. कादंबरीतील वातावरण निर्मिती ही लक्षणीय आहे. निसर्गवर्णनाबरोबरच लोकजीवनाचेही चित्रण येथे आढळते. एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारचे रहस्यपूर्ण कथानक रंगवून लेखकाने ही छोटेखानी कादंबरी वाचकांच्या मनाला भिडवण्याचा प्रयत्न केला आहे.