Venaa (वेणा)
"स्त्रीचे जगणे, मनाने आणि शरीरानेही, आणि लाक्षणिक अर्थाने तिचे मरणेही, किती क्लेशदायक पद्धतीने चालू असते याचे अस्वस्थ करून टाकणारे आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे दर्शन या कवितांतून घडते. मुलगी वयात येते तेथपासूनचे स्त्रीच्या दु:खी आयुष्याचे एकेक पान आपणांस येथे उलगडताना दिसते..." " ..स्त्रीची विविध रूपे डोळ्यांसमोर येतात. ती सारी एक होऊन त्यांतून एकच स्त्री दिसू लागते. ती संवेदनशील आहे, तिच्या डोळ्यांपुढे आयुष्याची सुंदर स्वप्ने आहेत, तिला तिची अस्मिता आहे, आत्मप्रतिष्ठेची जाणीव आहे , त्या तिच्या स्वप्नांचा चुराडा होतो, ती होरपळते, आकांत करते, दु:खातून प्रवास करते, कोसळते...'स्वतःला चपखल बसवावे असे एकही नाही सापडले नाव, इतिहासाच्या पानावर' असा स्वतःसंबंधी विचार करून निष्कर्ष काढते, पण पुन्हा उभी राहते, बेदरकार बनून झुंजते-सुख प्राप्त झाले असता त्यात मन:पूर्वक रमते. या आयुष्याचा, भोवतालच्या जीवनाचा विचारही करते. आयुष्यातल्या सर्व अनुभवांना काव्यरूप ध्यावे असे तिला वाटते आणि ते ती देते, हे महत्वाचे आहे. म्हणूनच तिच्या वेदना या नुसत्या वेदना न राहता त्या 'वेदनांची मिरवणूक' तयार होते. आजी, आईपासून चालत आलेल्या वारशाला येथे एक नवे वळण प्राप्त होताना दिसत आहे. व्यवहार आणि काव्य या दोन्ही दृष्टींनी हे वळण सुखद वाटते."