Fantasy Ek Preyasi
वपुंच्या कथा, कादंबरी या लिखाणातून त्यांच तत्वचिंतन एखाद्या मध्येच येणार्या सुखद शिडकाव्या प्रमाणे असते. कथेच्या ओघात, कहाणीत वाचक गुंतलेला असताना अलगदपणे हे चिंतन मनात उतरत जाते- आणि त्यामुळेच कथेला एक वेगळी खुमारी येते. पण ललित लेखांचा बाणाच वेगळा. साहित्याचा गाभा असलेल्या सौंदर्यानुभुवाच्या पातळीवरिल मीत्वाचा शोध हा या साहित्यप्रकारात अधिक सहजपणे,स्पपणे वेगवगेळ्या खपातून व्यक्त होताना दिसते. एका छोट्या घटनेतून, घटनेच्या निमित्ताने उलगडत जाणारे,उमलत जाणारे विचारांचे बहुरंगी पुष्प वाचकाला वाचनानंदाचा सुगंध देते. वपुंचे या पुस्तकातील लेख असेच आनंददायी क्वचित गोंधळून टाकणारे,व बरेचदा सखोल विचारांच्या गर्तेत नेणारे आहेत. वाचकांच्या मनातील अनेक अव्यक्त भावना,विचार,ह्यातून शब्दरूपात भेटल्यासारखे वाटतात. तर काही विधानं, विचार हे खास 'वपु’ व्यक्तित्व घेऊन अवतरतात. 'मनातील,स्वप्नातील अणि वास्तवातील स्त्री’या लेखात मांडलेल्या विचारांच्या, कल्पनांच्या मनोरम खेळात वाचक हरवून जातो. त्यातील अनुभूती प्रत्यक्ष घडल्याची, घडावी अशी तीव्र जाणीव जागते. 'प्रिय भाले’ मधून मांडलेला विचार, 'प्रत्येकवेळी आपण कुणालातरी हाक मारीत असतो’ हा मनोमन पटतो. त्या हाकेमागे असलेला आक्रोश, आनंद, दु:ख, असोशी मनात झिरपत जाते. असे अनेक वैचारिक भावनिक पातळीवरील विचारांची कवडसे या पुस्तकातून भेटतात."