Premmayi

By (author) Va.Pu.Kale Publisher Mehta Publishing House

ओशो यांच्या 'बिलव्हेड’ या ग्रंथाच्या आधारे वपुंनी केलेलं हे स्वैर लेखन आहे. ओशोंना अभिप्रेत असलेल्या आधुनिक मानवाचं दर्शन वपुंच्या लेखनातून घडतं. कुठल्याही जाती, धर्म, पंथ, विचारसरणीच्या वैचारिक, भावनिक दबावापासून मुक्त होऊन खर्‍या अर्थानं मुक्त तत्वज्ञान जगणार्‍या माणसाचं अनोखं चित्रण येथे वपुंनी केले आहे. हा माणूस कसा असतो ? त्याचं कोणतंही प्रार्थनास्थळ नाही. निसर्ग, झाडं, झरे, नद्या यातला आणि स्वत:मधला परमेश्वर हा त्यांचा देव. प्रेम, प्रेम आणि प्रेम हाच त्यांचा स्थायीभाव. जगाला बदलणार्‍या फंदात न पडता स्वत:ला अभिप्रेत असलेलं विश्‍व स्वत:तच निर्माण करण्याची वेगळी वाट ते चोखाळत असतात. त्यांचा प्रवास अंतर्मनाकडे असतो. त्यामुळं प्रत्येकाचा देव स्वतंत्र स्वयंभू असतो. हा माणूस म्हणजे बाऊल. हा माणूस उत्कटतेनं, उत्स्फूर्तपणे जगतो. अधिक नैसर्गिक बनतो. तो शांत असतो. आपल्या जीवनात विरघळून गेलेला असतो. परमेश्वरानं दरवाजा वाजवला म्हणजे दार उघडण्याकरीता तो सज्ज असतो. 'बाऊल’ माणसाच्या विविध विषयातील आगळ्या दृष्टीकोनावर वपुंनी येथे प्रकाशझोत टाकला आहे. प्रेमाचा खरा अर्थ, विविध अंगांनी येथे बहरला आहे. त्यात गहनता आहे, गूढता आहे आणि वैचारिक सधनताही आहे. तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील हे प्रेमाचे अनोखे दर्शन वाचकाला चाकोरीबद्ध वैचारिकेतून बाहेर काढते. मुक्त मानवाच्या उच्च वैचारिक पातळीचे दर्शन घडवते.

Book Details

ADD TO BAG