Sobat.... (सोबत)
कवितेचे लेणे हृदयामध्ये घेऊन जन्मलेला लेखक नकळत गद्यातही कविता लिहू लागतो. मधु मंगेश कर्णिक हे असे एक काव्यात्म गद्य लिहिणारे लेखक आहेत. अनेक वर्षापूर्वी, `सत्यकथे’मध्ये `चेहरा असलेली झाडे’ या शीर्षकाने त्यांचे काही अगदी वेगळे लेखन प्रसिद्ध झाले; आणि त्याने साहित्य रसिकांचे लक्ष वेधून घेतले. आजूबाजूच्या, नेहमी दिसणार्या झाडापेडांवर कर्णिकांनी मोठ्या काव्यात्मतेने लिहिले होते. कर्णिकांनी ज्या नजरेने वृक्षवल्लरींना, प्राणिजगताला, निसर्गाला न्याहाळले, त्या नजरेत अजाण बालकाचे कुतूहल, जाणत्याची जिज्ञासा, कलाकाराची संवेदना, रसिकाची तन्मयता आणि कवीची सहृदयता होती. आज जवळ जवळ चार दशकांनंतरही `सोबत’मधील लेखन त्या वेळेएवढेच ताजे, टवटवीत आढळते, हा मधु मंगेश कर्णिकांच्या अमोघ लेखणीचा महिमा होय.