Baki shunya (बाकी शून्य)
आपल्या जगण्याच्या प्रवाहाचा वेगच एवढा प्रचंड असतो, की आपण सारे एका संमोहनातच जगत असतो, कारण जगण्याच्या अविरत उलथापालथीत मेंदू जणू बधीर होऊन जातो. त्यामुळे ’आपण कोठे चाललो आहोत? कशासाठी चाललो आहोत?’ असे प्रश्न एकतर पडतच नाहीत आणि पडलेच, तर त्याचा मागोवा घेईपर्यंत प्रवाहाने नवीन वळण घेतलेले असते आणि आपण पुन्हा प्रवाहपतित झालेलो असतो. ’बाकी शून्य’ वाचताना आणि वाचल्यानंतर जगण्यासंबंधीचे सारे मूलभूत प्रश्न ठळकपणे मनाच्या पृष्ठभागावर येतात, आपण क्षणभर काठ पकडतो, थांबतो आणि वाहणार्या प्रवाहाकडे नवख्या नजरेने पाहू लागतो. ’गीता विषादयोग सांगते की कर्मयोग?’ या प्रश्नासारखाच हा एक सनातन प्रश्न- ’या कादंबरीत जगण्याला नकार आहे, की होकार?’ अर्थात हा नकार किंवा होकार लेखक आणि वाचक यांच्या मनोमीलनाचे अपत्य असणार यात शंका नाही. आपले आत्ताचे जगणे आणि हा काळ यांचे अनंत अंगांनी विश्लेषण करणारी, एक नवे दर्शन घडवणारी कादंबरी.