Himalayachi Savali (हिमालयाची सावली)
या नव्या नाटकात तुम्ही एका चांगल्या विषयाला हात घातला हे फार बरे झाले. वाईट आणि चांगले यांच्या संघर्षा पेक्षा चांगले आणि अधिक चांगले यांचा संघर्ष अधिक नाजूक असतो. तो रंगविणे ही कठीण असते. पण मराठी कथा, नाटक, कादंबरी यांनी आता या वाटा चोखाळल्या पाहिजेत. असे नाटक आपोआपच उत्कट स्वभावनिष्ठ होते. त्यामुळे नाट्याचा कृतीमपणा कमी होतो. ड्रिंकवॉटर, शेरवूड वैगेरेंच्या लिंकनवरल्या नाटकाचा हा अनुभव मी घेतला आहे. या नाटकात अनुषागाने सुचलेला एक विचार मी तुमच्या पुढे मांडतो, चरित्रात्मक नाट्य किव्हा कादंबरी लिहिणे हे एक प्रकारची कसरत अहे. मूळचि माणसे घेतली कि काल्पिताला, रचना कौशल्याला आणि संस्कार सामर्थ्याला मर्यादा पडतात. तुम्ही नावे, माणसांची नाती, व्यवसाय इत्यादी गोष्टी बदलल्या आहेत तरी तेवढ्याने फार मोठा बदल घडून येत नाही. मुळच्या माणसांच्या संबंधितांच्या हळव्या भवनांना अकारण जपावे लागते. अशा वेळी ज्या चरित्रा पासून आपल्याला आशयसंपन्न विषय मिळत असेल त्याचा आत्मा तेवढा कायम ठेवून बाकीचे सारे मूळ चरित्रापासून दूर नेणे अधिक हितकारक होणार नाही काय? या प्रश्नाचे उत्तर काहीही असो. वृद्ध नायक व नायिका यांच्याभोवति गुंफलेली कथानके आपल्याकडे फार थोडी असतात त्या दृष्टीने तुमचे नाटक एक नवीन पायंडा घालीत आहे. रामचंद्राची सीता आणि तुकारामाची जिजाई यांचे मिश्रण असलेली नायिका सुदैवाने तुम्हाला लाभलेली आहे. तिचे चित्रण तुम्ही फार कैशाल्याने केले आहे . वि. स. खांडेकर