Mala N Kalalele Baba (मला (न) कळलेले बाबा)
मी व बाबा चोवीस तास सहवासात असे. निदान हजार दिवस तरी असतील. दोन्ही भारत जोडो यात्रा, कसरावदचे दोन महिन्यांचे दोन-तीन मुक्काम, दिल्ली-बेळगाव-कलकत्त्याचा प्रवास, मुंबई इथली बाबांची शस्त्रक्रिया व शेवटी बाबा रक्ताच्या कर्करोगानं आजारी असतानाचे सहा महिने, मी बाबांचा निकट सहवास अनुभवला, तरीही मला बाबा दोन टक्केही समजले नाहीत. बाबा कसे होते, याचा प्रत्येक वेळी वेगळा भास होत असे. नक्की कसे ते ठरवता येत नाही. कदाचित माझ्या सामान्य बुद्धी-क्षमतेनं असेल, बाबांच्या जवळपास राहण्यासाठी येणारे पाहुणे, भक्तगण आम्हाला बाबांची माणसं म्हणून ओळखत. त्यात त्यांचा मोठेपणा होता. तरी बाबांच्या सोबतच्या शेकडो आठवणी आहेत, त्या लिहाव्या का? त्या लोक वाचतील का? माझ्या आयुष्यातली बत्तीस वर्षं मी ह्या मोठ्या, खर्या माणसासोबत घालवली आहेत. मी बाबांना प्रथम भेटलो तेव्हा 31 वर्षांचा होतो. भारावून जाण्याचं वय नव्हतं. मी बाबांकडे कसा आलो? का आलो? ह्याला अनेक कारणं आहेत. ती पुढे कुठं तरी येतील. पण इतक्या वर्षांनंतर नक्की कोणतं कारण हे सांगता येणार नाही. माझ्यासमोर गेल्या तीस वर्षांत अनेक कार्यकर्ते गेले. मी का राहिलो हेही सांगता येणार नाही, कारण बाबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रचंड भोवर्यात मी अनेकसांसारखा गरगर फिरत राहिलो आहे.