Laxmanresha (लक्ष्मणरेषा)
व्यंगचित्रात भारतीय माणसं दाखवायची म्हणजे आर. के. लक्ष्मण यांना मोठा जमावच काढावा लागे. गुजराती, मराठी, केरळी, बंगाली, मद्रासी, पंजाबी अशी वेगवेगळ्या चेहरेपट्ट्यांची, पोशाखांची माणसं काढायला वेळ लागे. व्यंगचित्र सादर करण्याची वेळ गाठण्यासाठी हळूहळू या जमावातील एकेका मंडळींना लक्ष्मण चाट देऊ लागले. अखेर एकच जण उरला. टक्कल असलेला, फुगीर नाकाचा, आखूड मिश्यांचा, धोतर व चौकडीचा कोट घातलेला आणि सदोदित चेहर्यावर भांबावून गेल्याचे भाव असलेला ’सामान्य माणूस’ (कॉमन मॅन). या देशातील कोट्यवधी मूक जनतेचं प्रतिनिधित्व तो करू लागला. लक्ष्मण यांच्या या आत्मकथेत त्यांचीही अवस्था कधी कधी या ’सामान्य माणसा’सारखी होते. कधी त्यांच्या व्यंगचित्रात आकडे लपले आहेत, असं समजून सट्टा खेळणारा व्यापारी त्यांना येऊन भेटतो, कधी न्यूयॉर्कमधील पार्क अॅव्हेन्यू भागात ते रेनकोट घेऊन गेल्यानं त्यांना चुकून मेक्सिकन समजलं जातं, तर एकदा मद्य पार्टीनंतर एवढी गाढ झोप त्यांना लागते की, आयुष्यातला एक दिवस ’कोरा दिवस’ ठरतो! जीवनाच्या कॅनव्हासवर लक्ष्मण यांनी रेखाटलेली शब्दचित्रं, टिपलेल्या घटना त्यांच्या व्यंगचित्रांइतक्याच मिश्कील, खट्याळ, खुसखुशीत आहेत.