Jaitapurchi Batti (जैतापूरची बत्ती)
जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाची चर्चा, चिकित्सा करणारे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे; साहित्यिक फक्त वातानुकूल दालनात बसून सुखेनैव रंजक लेखन करतात, आजूबाजूच्या समाजाच्या सुखदु:खाशी ते संबंध ठेवत नाहीत, असे म्हणणार्यांना उत्तर म्हणून हे पुस्तक लिहिलेले नाही. एका भूमिपुत्र लेखकाने सामाजिक कर्तव्य म्हणून हे पुस्तक लिहिलेले आहे. माझी अणुऊर्जेच्या दुष्परिणामांबाबतची, विशेषत: जैतापूर प्रकल्पाबाबतची भीती नाहीशी होत गेली. माझे कोकण, माझा देश यांना या प्रकल्पापासून कोणतीही भीती नाही, याबद्दल माझी खात्री पटली. आणि आपोआपच माझ्या लेखनातून, प्रतिपादनातून प्रकल्पाच्या समर्थनाचा अंत:प्रवाह झिरपू लागला. अर्थात या अणुऊर्जेची घातक बाजू माझ्या ध्यानात आल्याशिवाय कशी राहील? किंचितही निष्काळजीपणा, बेपर्वाई ही ऊर्जा हाताळताना, अणुभट्टीचे डिझाइन करताना झाल्यास अपरिमित जीवितहानी, आर्थिक हानी झाल्याशिवाय राहणार नाही, हेही मला कळून चुकलेले आहे. पण हे सारे मानवनिर्मित आहे. माणसानेच, वैज्ञानिकांनीच या समस्येची सोडवणूक करावयाची आहे. अणुभट्टय़ांची पराकोटीची सुरक्षितता हा यापुढील काळात वैज्ञानिकांसाठी परवलीचा शब्द ठरणार आहे. भारतीय वैज्ञानिक इथे कुठेही कमी पडणार नाहीत, याचीही माझी खात्री पटलेली आहे. पण अणुऊर्जेला पर्याय नाही, हेही खरे आहे. माडबन-जैतापूरचे दीपगृह (लाइटहाऊस) ‘जैतापूरची बत्ती’ म्हणून ओळखले जाते. या बत्तीने आजवर समुद्रातील जहाजांना मार्गदर्शन केले. आता तिने भूपृष्ठावरील मानवी जहाजांना, त्यांच्या कप्तानांना सुयोग्य मार्गदर्शन करावे अशी माझी अपेक्षा आहे-त्यासाठीच ही ‘जैतापूरची बत्ती’.