Tumchya Aamchya Leki (तुमच्या-आमच्या लेकी)
आरोग्य-समस्या घेऊन येणारा पेशंट अनेक वेळा मानसिक दडपणाखाली असतो. त्याच्या आरोग्य-तक्रारींचं मूळ कारण ही दडपणं तर नसावीत? अशी शक्यता लक्षात घेऊन डॉ. लिली जोशी आपल्या पेशंटशी संवाद साधता साधता त्याचा विश्वास संपादन करतात आणि पेशंट त्यांच्यापाशी मन मोकळं करतो. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक समस्या सांगतो...आणि `डॉक्टर' लिली जोशी यांच्याकडे येणार्या तरुणींसाठी किंवा रजोनिवृत्तीला आलेल्या स्त्रियांसाठीही त्या `लिलीताई' होऊन जातात ! आरोग्य समस्यांचं मूळ कोठे आहे, याचा या डॉक्टरताना नेमका ठावठिकाणा लागतो. वैद्यकीय उपचारांबरोबर केलेलं नेमकं समुपदेशन लागू पडतं आणि या स्त्रिया शरीराने व मनाने तंदुरुस्त होऊन आयुष्याला भिडायला, आनंदी जीवन जगायला मोकळ्या होतात...! डॉ. लिली जोशी यांनी त्यांच्या खास शैलीत असे विविध अनुभव बोलक्या कहाण्यांच्या स्वरुपात या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. हे अनुभव वाचकांना एक प्रकारचं सामाजिक भान तर देतीलच पण त्याचबरोबर स्वत:च्या समस्यांची उत्तरंही देऊन जातील ! आजच्या जीवनात अनेक आघाड्यांवर सामना करणार्या, धडपडणार्या, अडखळणार्या तरुणींना, स्त्रियांना मार्गदर्शन करणार्या या...तुमच्या-आमच्या लेकी !