Harik (हारीक)
मराठी ग्रामीण साहित्य प्रकारातले एक महत्त्वाचे नाव संजीव गिरासे! मातीतून जन्मलेली कथा, त्याच मातीत जगणारा साहित्यिक याचा सुंदर मेळ संजीव गिरासेंच्या कथात्मसाहित्यात दिसून येतो. वास्तवाला स्पर्श करीत ग्रामीण भाव-भावनांना अलवार स्पर्श केला आहे. वाचकांच्या मानसिक पातळीवरून थेट हृदयाशी संवाद साधणाऱ्या गिरासेंच्या कथा आहेत. पुरोगामी विचार हे जगण्याचं अंग असावं हे सत्य असलं, तरी त्यातील मानवी, मानसिक आणि सैद्धान्तिक परिसीमा ओलांडणारं पुरोगामित्व सृिष्टचक्राच्या गतीत अडथळा आणणारं ठरतं, हे `डाबरं` या कथेतून व्यक्त होते. संसारासाठी जगायचं, मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडायचं, नवरा जुगारी, सटोड्या, असं असताना एकांगी लढा देणारी निर्मला लेखक `हारीक` या शीर्षक कथेतून समर्थपणे उभी करतो. निसर्ग, राजकीय सत्ता, पुढारी, व्यापारी, भ्रष्ट व्यवस्था यांच्याशी झगडणारा भीमा अप्पा `वझं` या कथोतून प्रभावीपणे समोर येतो. ग्रामीण जीवनाच्या तळाशी जाऊन शोध घेणारे कथात्मसाहित्य म्हणून `हारीक` या कथा समूहाकडे पाहायला हवे. सारांश, ग्राम जीवनातील व्यक्तिपरत्वे मानसिक आंदोलने, घालमेल, आर्थिक कुतरओढ आणि सामाजिक ताना-बाना अधोरेखित करणाऱ्या या कथा आहेत.