Third Man (थर्ड मॅन)
डॉ. संजय ढोले हे सध्याच्या घडीला विज्ञानसाहित्यातील आघाडीचे विज्ञानकथालेखक असून, त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून हा ‘थर्ड मॅन’ नावाचा विज्ञानकथासंग्रह साकारला आहे. त्यांच्या विज्ञानकथा या विज्ञानाच्या मध्यवर्ती कल्पनांचा आविष्कार असून, सैद्धान्तिक, प्रायोगिक व भविष्यातील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वेध घेणार्या स्वतंत्र कलाकृती आहेत. त्यांच्या कथा प्रस्थापित विज्ञानाचं बोट धरून पुढे जातातच; पण त्याच वेळी भविष्यातील येऊ घातलेल्या विज्ञानाचा परामर्श घेणार्याही आहेत. डॉ. ढोले यांनी विज्ञानकथेत भौतिकशास्त्र, जैवशास्त्र, किरणशास्त्र व इतर आंतरशाखीय शास्त्रांचे विषय हाताळले असून, लालित्याचा सक्षमपणे आधार घेऊन, त्या वाचकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य केलं आहे. ‘थर्ड मॅन’ ही कथा भविष्याचा वेध घेणारी असून, ‘उपरा’ व ‘मोकळं अवकाश’ या कथा अंतराळाचा ठाव घेणार्या आहेत. शिवाय ‘अंधारातील डोह’ व ‘ट्रीटमेंट’ या कथा वैद्यकीय शास्त्रातील घडामोडींशी निगडित असून, ‘नि:पात’ आणि ‘मागोवा’ या मानवी जनुकाशी नातं सांगणार्या आहेत. तर ‘दरड’ ही तंत्रज्ञानाचा पुरावा देणारी आहे. डॉ. ढोले यांच्या सर्वच कथा विज्ञानाशी नातं सांगणार्या असून, प्रवाहित व रोमहर्षक आहेत. म्हणूनच या निश्चितपणे वाचकांच्या मनाचा ठाव घेऊ शकतील.