Chaldhakal Karnyapasun Mukti (चालढकल करण्यापासून मुक्ती)
सगळेच जण कधी ना कधी कामाची टाळाटाळ करतात. आपण गोष्टी पुढे ढकलतो; कारण त्या कराव्याशा वाटत नाहीत, किंवा आपण इतर कामांना प्राधान्य देत असतो. कधी कधी काम सुरू करणंच खूप कठीण होऊन बसतं ! काही वेळा आपण स्वतःला समजावतो की अजून थोडा वेळ मिळाला तर वेगळा दृष्टिकोन बाळगून किंवा नव्या ऊर्जेने काम सुरू करू. लहान-मोठ्या कामांची टाळाटाळ करणं हा मनुष्य स्वभावच आहे. पण जेव्हा या कामाच्या दिरंगाईमुळे आपल्याला हताश वाटू लागतं आणि ते काम डोईजड होऊ लागतं. तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या कामावर, घरात किंवा नात्यांवर दिसू लागतो. अशा वेळी त्या दिशेने हातपाय हलवणं अनिवार्य ठरते. तुम्हाला प्रत्येक कामाची टाळाटाळ करण्याची सवय आहे का ? त्यावर उपाय आहे. पण एका रात्रीत तुमची सवय बदलेल अशी अपेक्षा ठेवू नका. तुम्ही एके दिवशी अचानक कामाची दिरंगाई करणं सोडून देणार नाही. पण हळू-हळू, एखाद-दोन सोपी कामं पार पाडू शकता, जेणेकरून तुमचे काम लवकर आणि अधिक त्रासाशिवाय पूर्ण होईल. दिरंगाईचा भार दूर केल्यावर, तुम्हाला जो मोकळेपणा जाणवेल त्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. याचे फायदे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात पाहायला मिळतीलच.