Shitpetitun Jevha Jag Yete... (शीतपेटीतून जेव्हा जाग येते...)

By (author) Kshitij Desai Publisher Srujansanwad Prakashan

क्षितिज देसाई यांच्या 'शीतपेटीतून जेव्हा जाग येते...' या कथासंग्रहातील कथा आपल्याला एका अद्भुतरम्य दुनियेची सफर घडवून आणतात. अनामिक भविष्यातील त्या काळात माणसानं अंतराळात मुक्त विहार करण्याचं कौशल्य साध्य केलं आहे. त्याच्या मदतीनं त्यानं परग्रहांवर वसाहती स्थापन केल्या आहेत. धरतीपासून तिथपर्यंतचा पल्ला कमीत कमी वेळात गाठण्यासाठीच्या वेगवान वाहतूक यंत्रणेची स्थापना केली आहे. व्यक्ती-व्यक्तींमधील संपर्कासाठी भाषेच्या किंवा मोबाईलसारख्या यंत्रांच्या माध्यमांची गरज उरलेली नाही. मेंदूंची थेट जोडणी आणि तीही कोणत्याही तारांचा किंवा अशाच साधनांचा वापर न करता, विचारांचं आदानप्रदान करत आहे. आहारासाठी अनोख्या पोषणव्यवस्थेची रुजवात केली गेली आहे. आपलं तारुण्य राखून भविष्यात प्रवेश करण्यासाठी शीतपेटीची, हायबरनेशनची सोय झालेली आहे. आपल्याला हव्या त्या काळासाठी त्यात स्वत:ला गोठवून घेऊन परत जागं करणं शक्य झालं आहे. यंत्रमानव म्हणजेच रोबो सर्व सेवांसाठी तत्पर आहेत. मानव आणि यंत्रमानव एकमेकांबरोबर गुण्यागोविंदानं नांदत आहेत. त्यांचं सहजीवन बहरलेलं आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातील विस्मयकारक प्रगतीनं साकारलेल्या या अनोख्या दुनियेत निसर्गानं त्याच्यावर लादलेल्या यच्चयावत शारीरिक आणि भौतिक मर्यादा माणसानं केव्हाच झुगारून दिल्या आहेत. सुखसोईंची परमावधी गाठलेली आहे पण माणसातील हीन प्रवृत्तींवर मात करणं मात्र त्याला शक्य झालेलं नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंच्या त्याच्यावरच्या विळख्यातून सुटका करून घेण्यात तो अपयशीच ठरला आहे. त्यामुळंच याही दुनियेत चोऱ्या होतात, पण संपत्तीच्या किंवा दागदागिन्यांच्या नाही तर संगणकीय कोडच्या. फसवणूक होते, पण तिचं स्वरूप वेगळं आहे. तरीही त्या आहेत चोऱ्याच. चोरून मारून इथंही अनधिकृत कालप्रवास होतो. घुसखोरी होते. याही दुनियेत खंडणीसाठी अपहरण होतं पण ते माणसाचं नसून यंत्रमानवांचं होतं. तेही घाऊक पद्धतीनं. खंडणी रोख पैशाच्या रूपात नाही तर क्रेडिट कॉईन्सच्या स्वरूपात मागितली जाते. आतंकवाद अजूनही बोकाळलेलाच आहे, पण अतिरेकी बाहेरून येत नाहीत सुरक्षा यंत्रणेतील कोणाच्या तरी संगणकीय जुळ्याच्या रूपात घरभेदी बनून हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात सुरक्षा यंत्रणाही नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांना शोधून काढतातच.

Book Details

ADD TO BAG