-
Anakalneey (अनाकलनीय)
'अनाकलनीय' या शीर्षकांतर्गत संकलित, प्रतिभा सराफ यांच्या कथा आश्वासक असून 'लघुकथा' या वाङ्मयप्रकाराची अंतस्थशक्ती वाढवणाऱ्या आहेत. 'ऐकलेल्या, पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या घटनांचे पडसाद' या कथा प्रसारित तर करतातच पण जीवनपरिघातल्या अतर्क्यतेलाही स्पर्श करतात. जगण्यामध्ये एकच एक गणिती तार्किक क्रम नसतो, 'असंबध्दतेतली संबध्दता' ही असते हे मांडणाऱ्या आणि या तथ्याचे भान ठेवणाऱ्या या पक्व प्रवृत्तीच्या कथा आहेत. स्वभावतः त्यामुळे त्या, आंतरमुखी आणि सत्यदर्शनाभिलाषी होताना दिसतात, याचा मला संतोष आहे. जगत्व्यवहाराच्या पर्यावरणात दुःखाचा वावर असतो. या दुःखाची कारणे कोणती आणि विषादाचा उद्भव कोठून होतो याचा शोध आत्मनिष्ठ लेखकाला घ्यावा लागतो. प्रतिभा सराफ असा शोध या कथांमधून घेतांना दिसतात. शरीराची शुद्धी महत्त्वाची, पण मनाची (लेखिकेच्या भाषेत आत्म्याची) शुद्धी अधिक महत्त्वाची असून तशी ती साध्य केल्यास मनोजन्य आणि बुद्धीजन्य दुःखावर मात ही करता येते, असं निरीक्षण त्यांची कथा नोंदवते. (शुद्धीकरण) तेव्हा ही कथा परिहाराकडेसुद्धा निर्देश करते, हे विशेष! मराठीमध्ये 'अतर्क्य' लेखनाची एक परंपरा आहे. परात्मतेत संभावना दडलेल्या असतात असे ही परंपरा मानते. अशा परंपरेत स्त्री लेखकांनी विशेष असे लेखन केलेले नाही. प्रतिभा सराफ यांनी अशा निगूढतेला स्पर्श केला आहे हे त्यांचे श्रेय, आणि म्हणून हा विशेष इथे नोंदवला पाहिजे. जीवनव्यवहाराच्या खोलात डोकावू पाहणाऱ्या या कथा आश्वासक आणि महत्त्वाच्या आहेत. त्यांचे स्वागत; आणि शुभेच्छा ! भारत सासणे
-
Sutaka (सुटका)
भारती मेहता यांची 'सुटका' ही लघुकादंबरी मी उत्सुकतेने वाचली आणि ती मला आवडली. ती एक सुरेख कुटुंबकथा आहे. कुटुंब कथेतील कुटुंब-वात्सल्याने त्यांची ही कथा परिपूर्ण आहे. कोकणातील माणगाव-मुरुड यासारख्या लहान गावातील कुटुंबे, त्यांचे परस्पर संबंध, तेथील शेतीवाडी, तीमध्ये तनमनाने गुंतून राहिलेली, परस्परांशी प्रेमभावनांचे अनुबंध जपणारी सरळमार्गी, निष्कपटी माणसे व त्यांच्यातील एक सुसंस्कृत खानदानी कुटुंबाची ही कहाणी भारती मेहतांनी वाचकाचे मन गुंतून ठेवील अशा कौशल्याने लिहिली आहे. मध्यमवर्गीय, सुसंस्कृत जीवन हळूहळू अस्तंगत होत चाललेले दिसत असताना भारती मेहतांनी त्याला आपल्या प्रत्ययकारी लेखणीने जिवंत केलेले या कथानकांत दिसते. 'सुटका' हे कादंबरीचे शीर्षकही अन्वर्थक आहे. भारती मेहता यांनी भोवतालच्या समाजाचे बारकाईने आणि जातिवंत लेखिकेच्या नजरेने निरीक्षण केल्याचे जाणवते. मध्यमवर्गातील नातेसंबंध, रुसवे-फुगवे, मैत्रिणींमधील भांडणे व दिलजमाई, मोहिनी या मुलीचे अहंकारी वागणे व बऱ्या-वाईटाची जाणीव नसणे अशा अनेक स्वभाव वैशिष्ट्यांनी त्यांनी या कादंबरीचे लेखन केले आहे. त्यामुळेच ते प्रत्ययकारी वाचकाच्या मनाला भिडणारे झालेले आहे. साधी सरळ कुटुंबकथा किती नाट्यमय वळणे घेऊन पुढे सरकते हे वाचताना वाचकाची उत्कंठा वाढत जाते. - मधु मंगेश कर्णिक