Trio (ट्रायो)
भीती ही गोष्ट माणसाच्या जन्माबरोबरच त्याच्या आयुष्याला चिकटून आलेली आहे. भीतीपेक्षा मृत्यू बरा असे म्हटले जाते; कारण मृत्यू एकदाच तुमचे प्राण हरण करतो, पण भीती पदोपदी तुम्हाला मरणाच्या दारात उभी करत असते. अशा विषयांशी निगडित कथा लिहिणाऱ्या कथाकाराकडे वेगळे कौशल्य असावे लागते ते वातावरणनिर्मितीचे. त्यात राजीव तांबे यांचा हातखंडा आहे. त्यांच्या कथांमध्ये ते आरंभापासून असा काही माहोल निर्माण करतात की वाचक त्या भीतीच्या डोहाच्या काठापर्यंत कधी येऊन पोहोचतो ते त्यालाच समजत नाही. सकस कथाबीजातून अज्ञाताच्या त्या विश्वामध्ये ते वाचकांना घेऊन जातात. मग गूढतेचे एकेक पापुद्रे उलगडायला लागतात. इथे वाचकांवरची कथाकाराची पकड थोडी जरी ढिली झाली तरी अपेक्षित परिणाम साधता येत नाही. 'ट्रायो' या कथासंग्रहातील सर्व कथा वाचल्यानंतर राजीव तांबे या कथांमध्ये वाचकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत याची साक्ष पटते.