-
Gof..(गोफ)
‘वपु’ ही आद्याक्षरं मराठी माणसाच्या मनाच्या खूप जवळ आहेत... त्यांच्या कथांनी वाचकांच्या मनावर गारूड केलं... त्यांच्या काही कथांभोवती, वेगवेगळ्या लेखकांनी एकांकिकेच्या आविष्काराचा ‘गोफ’ विणला... या गोफातून घडतं जीवनाचं व्यामिश्र दर्शन... कधी एखादी लोकलमध्ये भेटलेली तरुणी स्वप्नवत् वाटते... तर कधी एका लहान मुलीचा करुण अंत होतो... कधी एखादा फेरीवाला मुलासारखा जीव लावतो... तर कधी नवरा-बायकोचं अर्थहीन नातं अस्वस्थ करून जातं... भांडणाच्या क्लासची कल्पनाही समोर येते एखाद्या एकांकिकेतून... तर भावाभावांच्या नात्यातील गैरसमज मानवी मनाचं वास्तव चित्र रेखाटून जातो... एखाद्या सोनटक्केवर नियती घाव घालते... किती ही गुंतागुंत भावनांची आणि त्यामुळे होणारी घुसमट माणसाच्या मनाची... ‘वपुं’च्या कथांचं हेच वैशिष्ट्य अधोरेखित करणारे हे एकांकिकांचे ‘नवरंग’... प्रभावी संवाद आणि भावनांचे पडसाद हे या ‘नवरंगां’चं सामर्थ्य... कथा ते एकांकिका असा हा प्रवास वाचकांना नक्कीच लुभावणारा... ‘फॉर्म’ आणि आशय यांचं नातं उलगडून दाखवणारा... वाचा आणि अंतर्मुख व्हा...
-
Japun Tak Paul (जपुन टाक पाऊल)
पुरुषोत्तम काळे- ‘वपुं’चे वडील यांनी चाळीस वर्षे रंगभूमीसाठी पडदे रंगविण्याची सेवा केली. रंगभूमीविषयक काही कार्य व्हावं आणि तेही ‘ललितकलादर्श’साठी, ही ‘वपुं’ची फार दिवसांची इच्छा होती. भालचंद्र पेंढारकरांच्या नाटकीय कारकिर्दीच्या अनुभवांचं शब्दांकन करण्याचं काम ‘वपुं’कडून घडलं, तर ‘ललितकलादर्श’साठी काही कार्य केल्याचं समाधान मिळून, तीही एका अर्थानं रंगभूमीची सेवाच होईल, या भावनेनं त्यांनी हे लिहिलं. पेंढारकरांनी त्यांच्या गतजीवनातले प्रसंग सांगितले, पण त्यांची तेव्हाची मनःस्थिती कशी असेल, हे हेरून ‘वपुं’नी ते आपल्यापुढे आणले आहे.
-
Karmachari
You who stand in a queue, who try to board a running local, who tolerate your boss's snide remarks and the trials and tribulations of marital life - you still manage to discuss politics with enthusiasm, to finish a game of cards, to laugh and to make others laugh ... You are a true karmachari. A collection of unforgettable short stories about ordinary people, Karmachari is a mirror held up to society. Set in suburban Mumbai of the 1970s, yet universal, it is peopled by characters we might meet in real life. They come alive under V.P. Kale's sharp but compassionate gaze, and prod us gently towards a world of greater kindness and understanding.
-
Rang Manache ( रंग मनाचे )
अकरा कथांचा संग्रह. कथा जरी अकराच असल्या तरी व. पु. काळे ह्यांच्या चुरचुरीत लेखनाची खुमारीच ही आहे की आजूबाजूचे सारे विश्व ह्या ना त्या प्रकारे त्यात टिपले गेलेले असते. वपु नेमकेपणा टिपणारे छायाचित्रकारही होते. तोच गुण त्यांच्या लेखणीतही उतरला आहे म्हणूनच 'गॅरण्टी’, 'बघतात तुला, पण...’, 'आणि तसं झालं तर...’ सारख्या ह्या संग्रहातील कथा 'असंही असू शकतं’, 'हे असंच आहे’ असे वाटायला लावणार्या आहेत. हे सारे वपुंच्या शैलीत वाचणे हा एक वेगळा आनंद आहे. वपु केवळ मिस्कील लेखक नाहीत तर विचार करायला लावणारे मिस्कील लेखक होते ह्याची प्रचिती यावी असा हा मनाच्या रंगाची उधळण करणारा कथासंग्रह.
-
Paanpoi
वपुंचेच पुस्तक परंतु हे तसे वपुंचे पुस्तक नाही. काही सुचलेले विचार, काही घडलेल्या घटना, काही ऐकीव, वाचीव गोष्टी, इतरांना खुलवून सांगावे असे काव्य - विनोद मात्र हे सारे व. पु. काळे ह्यांच्या शैलीत व ढबीत असे ह्या छोट्याशा पुस्तकाचे वेगळेपण. ही एक प्रकारची पाणपोई आहे. थकल्यावर तहान लागल्यावर तीवर तहान भागवायची असते, एवढेच वपुंचा उद्देशही तेवढाच आह. मात्र वपुंना हे एक सामाजिक कर्तव्यच वाटलेले आहे म्हणून ज्यांना ज्यांना आपले अनुभव धन इतरांना सांगावे असे वाटते त्यांनी त्यांनी कुचराई न करता ते सांगितलेच पाहिजे असेही त्यांना वाटते. याबद्दल त्यांची धारणा अशी आहे की, "अनुभव व्यक्त करण्याकरता लेखक व्हावंच लागतं असं नाही तो अनुभवच लेखणीच्या टोकाशी उपस्थित असतो."
-
Intimate
व. पु.काळे ह्यांचा कथातले जग हे आपल्या अवतीभोवतीचेच असते. किंबहुना त्यात कोठे ना कोठे आपण असतोच परंतु जे आपल्या लक्षात आलेले नसणे किंवा लक्ष जाऊनही कळलेले नसते ते वपुंनी मार्मिकपणे टिपलेले असते आणि त्यावर मिष्कीलपणे शब्द केलेले असते. त्यातून मत्सरी मंडळींचे 'दिलासा मंडळ’ सारख्या अफलातून कल्पना वाचकांसमोर देतात न त्यातून असे अचूक लिहू शकणार्याबद्दलही मत्सर वाटू लागतो! संवादातून कथा फुलविणे ही तर वपुंची खासियतच. त्यामुळेच तर वपुंच्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याश्या वाटतात- अश्याच वपुंच्या नऊ कथा ह्या संग्रहात आल्या आहेत. ज्यता 'मोदी अँड मोदी’ सारखी वाचकांनी उचलून धरलेली कथाही ह्यात आहे.
-
Zopala
मनाच्या विविध रंगछटांचं र्दन वपुंच्या या पुस्तकातून घडतं यातल्या प्रत्येक कथेतला वेदनेचा अंत:स्त्रोत वाचकांना वेढून टाकतो. या वेदनेसह जगणार्या मनस्वी व्यक्तींच्या मनस्वी कथा आपल्याला अंतर्मुख करतात. स्वत:चा ोध घ्यायला भाग पाडतात. या कथांमधील माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामथ्र्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो.
-
Karmachari
वपु काळेसुद्धा एकेकाळी कर्मचारीच होते. रांगा-निरनिराळ्या कारणांसाठी. आणि त्यात ताटकळत उभे राहणे, लोकल पकडण्यासाठी म्हणजे ऑफीस गाठण्यासाठीची घाई, त्या सार्यात आडवे येणारे बंद वगैरे प्रकार, साहेबांसह इतरांची खवचट बोलणी, कँटीन नामे ठिकाणी दिला जाणारा चहा वगैरे वगैरे त्यांनी सुद्धा अनुभवले आहे आणि त्यांनीसुद्धा इतरांप्रमाणेच सारे हसत हसत हसण्यावारी नेले आहे पण सोडून नाही दिले- त्यांच्या लेखकीय मनाने हे सारे मिस्किलपणे टिपले आहे- वेळोवेळी म्हणूनच गोखले, खांबेटे, सातवळेकर, वंदना वगैरेंना बरोबर टिपणार्या ह्या कथा त्यांचे हातून लिहून झाल्या आहेत व ह्याच मंडळीनी त्या डोक्यावर घेतल्याने त्याच्या ह्या संग्रहाच्या पुन्हा पुन्हा आवृत्त्या निघाल्या आहेत.
-
Chaturbhuj (चतुर्भुज)
दोनाचे चार हात' झाले, की सगळ्या चिंता मिटल्या... हा एक समज, पण आयुष्याचे खरे सूर तर इथूनच झिरपू लागतात. रोजच्या जगण्यातली मोठी-मोठी स्थित्यंतरं... भावनिक, मानसिक आंदोलनं... आणि सुखाची आवर्तनं... हे सगळं गुंफून राहतं केवळ 'लग्न' या शब्दाभोवती ! 'चतुर्भुज' कथेतला चिंतातूर वर, 'चुडा' मधील वधुपक्षाची केविलवाणी दैना, 'अंतर' मधल्या दोन मैत्रिणींची लग्नामुळे पालटलेली आयुष्यं आणि 'बलिदान' मधील नियतीच्या फे-यात अडकलेली बायको... आपल्याच आजूबाजूची ही पात्रं खास 'वपु' शैलीतून अवतरलेली... त्यांच्या बहारदार लेखणीतून बहरलेली.
-
Aik Sakhe
वसंत पुरुषोत्तम काळे यांचे हे पंचविसावे पुस्तक एका निराळ्या पद्धतीने छापलेले. गोष्टीतून गोष्ट सांगत जाणारे, 'अरेबियन नाइट्स’ सारखे त्याचे स्वरूप आहे. वपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहेत. पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे, तोरा आहे.
-
Ka Re Bhulalasi
का रे भुललासी' हा वपुंचा कथासंग्रह 'वरलिया रंगा'चा भेद करून माणसाच्या खर्या रंगांचे दर्शन घडवितो. माणसाला जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे घालून वावरावे लागते. प्रसंग निराळे तसा मुखवटाही निराळा, त्यात माणूस आपले अंतरंग, सुख-दु:खे, प्रेम, प्रतारणा, भ्याडपणा, हताशपणा, सूड लपवत जगत असतो. हे मुखवटे, बुरखे परिस्थितीनुरूप घालावे लागतात तर लबाडपणाने घातलेले बुरखे वेगळेच असतात ! प्रत्येकाचा जगाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन असतो. आपण आपल्याच रंगांनी माणसं, प्रसंग रंगवू पाहतो. खुल्या मनाने, खुल्या दिलाने विचार करत नाही. दुसर्यावर आपले विचार लादू पाहतो. हे ही एक प्रकारचे मुखवटेच की ! वपुंच्याच भाषेत सांगायचं झालं तर, "ह्या वरवरच्या भुलण्यामध्ये आपल्याला माणसाचे, जगाचे, निसर्गाचे खरे रंग कधी सापडतच नाहीत."
-
Gulmohar
गुलमोहराचं झाड केव्हाही छान दिसतं. निळ्या निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ते जेवढ्या डौलानं शेंडे वर करून डुलतं, तेवढ्याच श्रीमंतीनं - काळ्याभोर पावसाळी ढगांवरसुद्धा वैभवशाली दिसतं, भव्य वाटतं. पण दिवाकरपंतांना गुलमोहराचं झाड आता बघवेना. तो त्यांचा पराभव होता, भंग पावलेलं स्वप्न होतं. लाकूडतोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुर्हाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकरपंतांच्या आख्ख्या भूतकाळातील आठवणींवर तडाखा हाणला. दुसर्या घावासरशी त्यांचा भविष्यकाळ नष्ट केला. तिसरा घाव बसला आणि दिवाकरपंतांना प्लॉटचा वर्ष वाढदिवस आठवला. घावाघावागणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता. खाली पडणार्या फांद्या चुकवीत चुकवीत दिवाकरपंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. घावावर घाव बसत होते. झाडाची उंची कमी होत होती, दिवाकरपंतांचं स्वप्नही लहान लहान होत होतं.
-
Me Manus Shodhtoy
वपुंच्या ह्या कथासंग्रहाचे नावच 'मी माणूस शोधतोय' असे आहे आणि ते त्यांच्या लेखनाशी व वृत्तीशीही सुसंगत नाही. वपु जी माणसे शोधतात ती इकडे तिकडे सर्वांनाच दिसणारी असतात पण वपु ज्या नजरेने त्यांच्याकडे बघतात व त्यांना 'टिपतात' ते चकित करणारे असते. आपल्या लक्षात हे कसे आले नाही असे जरी ते वाचल्यावर वाटले तरी आपल्या लक्षात येऊनही आपल्याला ते असे टिपता नसते आले हेही लक्षात येते न् मग ह्या लेखणीद्वारे कौतुक सप्तर्षी, दुर्वास, इत्यादी माणसाचा शोध वाचकांना खुलवून जातो. म्हणूनच ह्या शोधकथांचया संग्रहाच्या पंचवीस वर्षात चार आवृत्त्या निघाल्या आहेत.
-
Kahi Khar kahi Khota
"कथा वपुंची-तुमची आमची सगळ्यांची- जीवनाचे पुस्तक उघडल्याची" असे ह्या कथासंग्रहाबद्दल म्हटले गेले आहे ते खरे आहे- ह्या संग्रहातील 'जे.के.’, 'भदे’, यासारख्या वपुंच्या गाजलेल्या कथा ह्याची साक्ष आहे. ही व्यक्तिमत्त्वे आपल्यासारखेच दैनंदिन जीवन जगत असतात तरीही त्यांच्या वागण्या-बोलण्यात, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात फरक असतो. या फरकामुळे हे जीवन अधिकच 'जिवंत’ झालेले असते. वपु नेमके तेच हेरतात आणि ते इतक्या सहज शैलीत वाचकांना विश्वासात घेत वाचकांपुढे ठेवतात की त्यांनाही वाटते, जगावे तर हे असे. वपुंच्या सर्व ज्ञात वैशिष्ट्यांबरोबरच जीवन चेतना देणे हेही त्यांचे एक वैशिष्ट्य !
-
Nimith
ललितगद्य हा तसा वाचकांना आवडणारा साहित्यप्रकार. याचा आवाकाही मोठा. लेखकाच्या मनातले विचार, भावना स्वप्नमयी कल्पना विविध मोहमयी शब्दरूप घेऊन ललितरूपात अवतरली की त्याचं ताजं टवटवीत रूप अधिकच मोहवणारं छोट्या छोट्या प्रसंगांचं ललित शब्दरूप जणू समूहात येतं. वाचनानंदाचं दान अलगद वाचकांच्या हाती पडतं. लोकप्रिय लेखक व. पु. काळे यांच्या या आगळ्या वेगळ्या लेखनाचा हा संग्रह लेखकाच्या मनोविश्वात अनंत अनुभव खदखदत असतात. स्वत:ला शब्दरूप घेण्यासाठी आसुसलेले असतात. काही 'निमित्तानं’ त्यांनावा वाचा फुटते. अशा अनुभवांचा हा एक गुच्छ निमित्ता रूढार्थाने असो, नसो वपु काळ्यांची स्वत:ची ठसठशीत नाममुद्रा उमटलेले हे खास ढंगदार ललितबंध.
-
Premmayi
ओशो यांच्या 'बिलव्हेड’ या ग्रंथाच्या आधारे वपुंनी केलेलं हे स्वैर लेखन आहे. ओशोंना अभिप्रेत असलेल्या आधुनिक मानवाचं दर्शन वपुंच्या लेखनातून घडतं. कुठल्याही जाती, धर्म, पंथ, विचारसरणीच्या वैचारिक, भावनिक दबावापासून मुक्त होऊन खर्या अर्थानं मुक्त तत्वज्ञान जगणार्या माणसाचं अनोखं चित्रण येथे वपुंनी केले आहे. हा माणूस कसा असतो ? त्याचं कोणतंही प्रार्थनास्थळ नाही. निसर्ग, झाडं, झरे, नद्या यातला आणि स्वत:मधला परमेश्वर हा त्यांचा देव. प्रेम, प्रेम आणि प्रेम हाच त्यांचा स्थायीभाव. जगाला बदलणार्या फंदात न पडता स्वत:ला अभिप्रेत असलेलं विश्व स्वत:तच निर्माण करण्याची वेगळी वाट ते चोखाळत असतात. त्यांचा प्रवास अंतर्मनाकडे असतो. त्यामुळं प्रत्येकाचा देव स्वतंत्र स्वयंभू असतो. हा माणूस म्हणजे बाऊल. हा माणूस उत्कटतेनं, उत्स्फूर्तपणे जगतो. अधिक नैसर्गिक बनतो. तो शांत असतो. आपल्या जीवनात विरघळून गेलेला असतो. परमेश्वरानं दरवाजा वाजवला म्हणजे दार उघडण्याकरीता तो सज्ज असतो. 'बाऊल’ माणसाच्या विविध विषयातील आगळ्या दृष्टीकोनावर वपुंनी येथे प्रकाशझोत टाकला आहे. प्रेमाचा खरा अर्थ, विविध अंगांनी येथे बहरला आहे. त्यात गहनता आहे, गूढता आहे आणि वैचारिक सधनताही आहे. तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील हे प्रेमाचे अनोखे दर्शन वाचकाला चाकोरीबद्ध वैचारिकेतून बाहेर काढते. मुक्त मानवाच्या उच्च वैचारिक पातळीचे दर्शन घडवते.
-
Tapthpadi ( तप्तपदी )
लग्न विधीतल्या सप्तपदीबरोबर सुखाच्या सहस्त्र्पदांची स्वप्ने पाहत स्त्री प्रपंचात पाऊल टाकते. त्यावेळी अनेक संमिश्र भावनांनी तिचे मन वेढलेले असते. नव्या नवलाईचं अप्रुप, नवीन वातावरणं, नवीन माणसं याचं अनामिक दडपण आणि सार्या आयुष्याचाच ट्रॅक बदलणारी महत्वाची घडामोड - नव्यानवलाईत डोळ्यासमोरच्या सहजीवनाबद्दलच्या स्वप्नांच्या धुंदीत पावलांखालची जमीन कशी आहे हे कित्येकदा समजत नाही. सुखाच्या अनुभवातला आभास हळूहळू जाणवू लागतो जीवनाचे संसाराचे बोचणारे जखमा करणारे रूप उलगडू लागते. संसारातील अशा तप्तमुद्रांच्या कथा या संग्रहात वपुंनी रेखाटल्या आहेत. अनेकजणी या तप्तपदीवरून अखंडपणे चालत आहेत. संसारात सर्वार्थानं सूर जुळणे अशक्यच. पण नवरा जर 'सखा’ असेल तर पाऊलवाट फुलांच्या पायघड्यांची बनते. तसे नसेल तर जखमा करणारा काटेरी रस्ता. अवघड वाट अशीच शक्यता निर्माण झालेल्या संसाराच्या कथा खास वपु शैलीत.