-
Madhumati ( मधुमती )
"रणजित देसाई’ यांची लघुकथा सर्वसामान्य मराठी लघुकथेपेक्षा निराळी आहे. अद्भुतरम्य वातारणात वावरण्याची तिला हौस आहे. निळ्या, सुंदर स्वप्नात ती रंगून गेलेली आहे. तिचे स्वरूप महाराष्ट्रीय असण्यापेक्षा अखिल भारतीय स्वरूपाचे आहे. वास्तवापेक्षा इतिहास तिला अधिक रुचतो. संगीत व शृंगाराच्या रसात ती नखशिखान्त नाहून निघाली आहे... रसिक मनाची नादि पात्रे त्यांच्या कथेत स्वप्नातल्याप्रमाणे वावरत आहेत. कलेसाठी आणि प्रेमासाठी ती आपले जीवन उद्ध्वस्त करून घेतात; आणि त्याची मुळीच खंत मानीत नाहीत. रणजित देसाईंच्या कथांत वावरणार्या स्त्रिया रूपवान, नाजूक, कलावंत आणि त्यागी आहेत. नायकीण असो, गाणारी असो वा कुलवती असो, त्यांनी तिच्या स्त्रीमनाचा, तिच्या मृदुलतर भावनांचा आविष्कार करताना आपली लेखणी मुलायमपणे वापरली आहे. रणजित देसाईंच्या लेखणीत प्रसाद आहे, माधुर्य आहे; वाचकाला रम्य वातावरणात नेऊन वास्तवता विसरावयास लावणारी जादू आहे. आपल्या कथेची पार्श्वभूमीही ते मोठ्या कल्पकतेने, कथेतली स्वप्नमयता वाढावी, अशा तर्हेने वापरतात. त्यांच्या अवलोकनशक्तीचे आणि कल्पकतेचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. त्यांच्या कथांतील वातावरण वास्तवापेक्षा अद्भुततेकडे झुकणारे असले, तरी पण त्यातून आकाराला येणार्या व्यक्ती मात्र मानवी जगातल्या आहेत. आपल्या सुखात रंगणार्या अन् आपल्या दु:खात पिचणार्या, त्यांच्या कोमल हृदयाचे त्यांनी केलेले चित्रण इतके जिवंत आणि चटकदार आहे, की ते अवलोकिताना वाचक हसावा नि रडावा...’
-
Hyderabadchee Chittarkatha ( हैदराबादची चित्तरकथा
हैदराबादचे नाव घेतले की आठवतो तो या संस्थानाचा मुक्तिसंग्राम. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही इथल्या उन्मत्त निजामाच्या आडमुठेपणामुळे हैदराबाद स्वतंत्र भारतात विलीन होण्यासाठी १३ महिन्यांचा काळ लागला. सुमारे सव्वाचारशे वर्षांपूर्वी गोवळकोंडा किल्ल्याच्या पायथ्याशी भागानगर या नावाने वसलेल्या या शहराला विविधरंगी इतिहास आहे. याच शहरात जन्मलेल्या धनंजय कुलकर्णी यांनी जन्मगावाच्या आकर्षणापोटी या पुस्तकाचा प्रपंच मांडला आहे. हैदराबादच्या नवाबी ऐश्वर्यापासून सध्याच्या सायबर सिटीपर्यंतचा प्रवास त्यांनी यात प्रभावीपणे मांडला आहे. पुस्तकात छायाचित्रांचाही समावेश असून, त्यातील काही छायाचित्रांमुळे या शहराच्या उंची स्थापत्यरचनेची कल्पना येते. मोत्यांच्या जडणघडणीसाठी व व्यापारासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्धीस आलेले, खानपानात (त्यात बिर्याणी आलीच!) रमलेले, सर्व कलांचा आस्वाद घेणारे हे शहर आजही आपले वेगळेपण राखून आहे, याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो.