-
The Demon In The Freezer
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी, हजारो समर्पित माणसांच्या जागतिक पातळीवरील अथक परिश्रमांतून मानवजातीचा हजारो वर्षे संहार करणा-या देवीच्या रोगाचं उच्चाटन होऊ शकलं, पण गरज पडली तर असाव्यात म्हणून तत्कालीन दोन महासत्तांनी विषाणूंच्या काही कुप्या फ्रीजरमध्ये गोठवून ठेवल्या. आता हा देवीचा विषाणू पुन्हा अवतरण्याचा धोका दिसू लागला आहे. दहशतवादी गटांनी किंवा राष्ट्रांनी तो जीविक अस्त्र म्हणून वापरला तर मानवी इतिहासानं कधीही न पाहिलेला भीषण नरसंहार होईल. हे सगळं कळत असूनही आत्ता या क्षणी कोणीतरी त्या महाभयानक दैत्याला फ्रीजरमधून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे...
-
He Bandh Purane
हे बंध आहेत, पण बंधनं नाहीत. ना काळाची, ना भौगोलिक परिसीमांची, ना राजकीय पातळीवरील अपेक्षित-अनपेक्षित बदलांची. आज सहा दशकं लोटल्यानंतरही ज्या अर्थी हे बंध पुराणे झालेले नाहीत, त्या अर्थी कुठं तरी 'अंतरीची ओळख-खूण' पटलेली आहे. एकमेकांना विदेशी-परदेशी न मानण्याइतके आपण जवळचे आहोत. कितीतरी सोव्हिएत आणि रशियन कवी-कलावंतांनी या बंधांना आपापल्या कृतींमधून साज चढविलेला आहे. कवी रसूल गमझातव यांना स्त्रीच्या ललाटावरील कुंकुमतिलक हे तिचं ओळखपत्र वाटतं, तर स्व्यातस्लाव रेरिख यांना लक्ष्मीदेवता ही महन्मंगल सृजनाची मूर्ती वाटते. इल्या ग्लझुनोव या चित्रकारानं भारतीय राष्ट्रध्वजाच्या पाश्र्वभूमीवर आपल्या कुंचल्यानं पंडित नेहरू असे विलक्षणरित्या चितारले आहेत, की वाटावं आत्ता याच क्षणी ते हस्तांदोलनासाठी पुढं होतील. नुकताच उभय देशांच्या राजनौतिक संबंधांचा हीरकमहोत्सव साजरा केला गेला. त्या साठाच्या आकड्यावर पुढे आणखी कितीही शून्यं चढली, तरी हे बंध जुने होणार नाहीत. कधीच नाही.
-
Business Legend
जी. डी. बिर्ला, वालचंद हिराचंद दोशी, कस्तुरभाई लालभाई व जे. आर्. डी. टाटा या आपल्या आयुष्यातच 'आख्यायिका’ ठरलेल्या भारतातील चार महान उद्योगपतींच्या आयुष्याचा व अफाट कर्तृत्वाचा अत्यंत वेधक व विस्मयचकित करून टाकणारा पट येथे उलगडला आहे. ही या चार उद्योगमहर्षींची व्यक्तिचित्रं आहेत. त्यांचं व्यक्तिगत जीवन - त्यांच्या सवयी, जीवनशैली, त्यांची वैचारिक धारणा, अचूक निर्णयक्षमता, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, भोवतालचे ताणतणाव यांचे मनोज्ञ, दुर्मीळ रंग भरता भरता, त्यांच पायाभूत काम करण्याची जिद्द कशी अफाट होती, ब्रिटिश राजवटीत - प्रतिकूल परिस्थितीत कोणकोणते संघर्ष करीत त्यांनी उद्योग उभारले, अडचणींचे 'संधी’त रूपांतर करण्याचे त्यांचे सामर्ध्य किती प्रचंड होते, वैयक्तिक संपत्ती जमविण्याच्या पार पलीकडची त्यांची देशभक्तीमय उद्योजकता व आर्थिक राष्ट्रवादाची दुर्मीळ दूरदृष्टी किती प्रखर होती, याचे लेखिकेनं चैतन्यमय व गहिरे चित्र येथे रेखाटले आहे. त्यांच्या काळाच्या - देशाच्या राजकीय, आर्थिक, सामजिक ताणाबाणाच्या विस्तृत अवकाशावर हे चित्र उभं केलं आहे. हा या लेखनाचा विशेष आहे. लेखिकेनं आजवर अस्पर्श राहिलेल्या अनेक स्रोतांतून तपशील मिळवून संशोधनपूर्वक केलेलं हे लेखन नव्या उद्योजकांना प्रेरक ठरेल."
-
Radhey (राधेय)
"राधेय’ ही रणजित देसाईची सर्वात आवडती कादंबरी. देसाईंनी एकाकी कर्ण, उपेक्षीत आणि अवमानीत कर्ण, त्याचं वृशालीशी असलेलं नातं कृष्ण आणि दुर्योधनाशी असलेलं नातं हे सगळं इतक्या कमालीच्या संवेदशीलतेनं चित्रित केलेलं आहे की कर्णाच्या संपूर्ण जीवनालाच एक शोकान्तिकेचं परिमाण लाभतं. "राधेय’च्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की "राधेय’मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो. यावरूनच या कहाणीची सार्वत्रिकता देसाईंनी दाखवून दिली आहे. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून उंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. कर्णाचं जीवनविषयक तत्वज्ञान सर्वाहून वेगळं आहे. कर्ण म्हणतो "आयुष्यात चारित्र्य जपता आलं, उदंड स्नेह संपादन करता आला, मित्रच नव्हे तर शत्रूही तृप्त झालेले पाहिले. वैरभाव पत्करला तोही परमेश्वररूपाशी. यापेक्षा जीवनाचं यश वेगळं काय असतं? कर्णाचं मनस्वी दर्शन घडवणारी, प्रत्येकाने कधीना कधी वाचावी अशी हृद्य कादंबरी.
-
Timepass
टाईमपास’ ही एका अपरिमित उर्जा व धैर्य असलेल्या बुद्धीमान स्त्रीची कहाणी आहे. ही स्त्री स्वत:च्या मनाला पटेल त्याच प्रकारचं आयुष्य जगली, स्वत:च्या जबाबदारीवर जगली. ही विलक्षण स्त्री म्हणजे सुप्रसिद्ध मॉडेल आणि ओडिसी नृत्यांगना प्रोतिमा बेदी. 1949 साली जन्मलेल्या प्रोतिमा बेदी यांचा मृत्यू 1998 साली एका दुर्दैवी अपघातात झाला.या अवघ्या 49 वर्षांच्या आयुष्यात त्या अतिशय वादात्मक आणि अपवादात्मक वेगळ्या घटनांनी व्यापलेलं जीवन जगल्या. 'टाईमपास’ बनलंय ते प्रोतिमा बेदींच्या आत्मचरित्रातील काही अंश, त्यांच्या रोजनिशीतला काही भाग, आणि त्यांनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींना, कुटुंबिय, प्रियकर यांना लिहिलेल्या पत्रांवरुन 'टाईमपास मध्ये प्रोतिमा बेदींच्या अत्युत्कट स्मृती आहेत..... अगदी मुक्तपणे लिहिलेल्या. आयुष्यातल्या विविध टप्प्यांवर 'वळण’ बनणार्या सगळ्या घटना प्रोतिमा बेदींनी अतिशय प्रामाणिकपणे आणि निर्भिडपणे मांडल्या आहेत. स्कॅन्डलस् मॉडेल, बिनधास्त तरुणी, समर्पित नृत्यांगना..... अशी प्रोतिमा बेदींची विविध रुपं 'टाईमपास’ मध्ये पाहायला मिळतात. हातचं काहीही राखून न ठेवता अतिशय मनमोकळेपणे मांडलेलं हे आत्मकथन आहे.
-
Ek Purn Aapurna
"डोळ्यांतले अश्रू पुसत मी एकदा डॉक्टरांकडे तर एकदा चैतन्याकडे पाहात होते. अनेक डॉक्टरांनी तर्हेतर्हेने माझा मानसिक छळ केला होता, त्यामुळे माझ्यातले काहीतरी संपून गेले आहे, मरून गेले आहे याची मला जाणीव झाली. पण त्याचं क्षणी माझ्या मनात जे रुतलं आहे ते फारच अनमोल आणि महत्वाचं आहे. एक प्रचंड ईर्षा आणि प्रचंड उर्जा माझ्या हृदयात एकवटली होती. तिने मला प्रत्येक संकटाला सामोरे जायचे सामर्थ्य दिले होते. एका आईच्या आत्मशक्तीने सगळीच्या सगळी वैद्यकिय भाकिते खोटी ठरवली होती!"
-
Sarvottam Ravindra Pinge
ललित लेखन हा साहित्यातील बहुधा सर्वात सोपा आणि तितकाच अवघड प्रकार असावा. कोणीही उठावं आणि कोणत्याही विषयावर लिहावं आणि त्यास ललित लेखन असं लेबल चिकटवावं, असं गेली अनेक वर्ष सुरू आहे. तरीही कसदार ललित लेखकांची परंपरा मराठीत मोठी आहे. याच परंपरेतील एक भारदस्त नाव रवींद्र पिंगे असं आहे. पिंग्यांचं गेल्याच वर्षी निधन झालं. त्यापूर्वीची सलग तीन-चार दशकं ते लिहीत होते. हे काम सोपं नाही. इतका प्रदीर्घ काळ सातत्यानं वाचकांना मोहून टाकणारं लिखाण करणं, ही एक तपश्चर्याच आहे. त्याचं कारण म्हणजे कथा-कविता-कादंबरी अशा कोणत्याही राजमान्य साहित्यप्रकाराऐवजी पिंगे हे केवळ ललित लेखनच करत राहिले आणि त्यातून त्यांनी स्वत:चा असा विशिष्ट वाचकवर्ग तयार केला. पण पिंगे हे केवळ लेखकच नव्हते. तर ते एक साहित्यकर्मी होते. अनेक साहित्यिक उपक्रमांशी त्यांचा निकटचा संबंध होता आणि अनेकांना लिहितं करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. पिंग्यांनी नोकरी केली ती आकाशवाणीत. त्यानिमित्तानं त्यांचा अनेक मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांशी संबंध आला. शिवाय, पिंग्यांना प्रवासाची आवड होती आणि चांगलंचुंगलं खाण्याचीही. वाचन हा तर त्यांचा केवळ छंद नव्हे, तर त्यांच्या जीवनाचाच एक अविभाज्य घटक होता. त्यातून त्यांचं आयुष्य कमालीचं समृद्ध होत गेलं. हेच अनुभव पिंगे शब्दबद्ध करत गेले आणि त्यातून एक मोठा लेखक निर्माण झाला.
-
College
या कॉलेजमध्ये यूज अँड थ्रो पॉलिसी आहे. डिपार्टमेंट सुरू मी करायचं. एस्टॅब्लिश मी करायचं. मग हळूच कोणीतरी संधिसाधू मतलबी वाकडेबाई गरजू म्हणून, लाचार बनून येणार आणि शिरजोर होऊन टेकओव्हर करणार. विद्यार्थी आपण जमवायचे. तुकड्या वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे. मग तथाकथित संस्थाचालक आणि प्राचार्य आपल्यापुढं गोंडा घोळणार्या माणसांची अध्यापक म्हणून वर्णी लावणार. रिझल्ट उत्तम लागावेत म्हणून आपण मरमर करणार. रजा न घेता एस्ट्रॉ क्लासेस घेणार. नोट्स देणार. त्यातून तुकडी तयार होणार. त्या तुकडीला हे नवे लोक शिकवणार. उत्तम शिक्षक म्हणून आपलाच उदो उदो करायला विद्यार्थ्यांना चलाखीनं प्रेरित करणार. इतकं सगळं किळसवाणं आहे,ओंगळ आहे... या सगळ्याची चीड येत नाही तुम्हाला, सर ? तुम्ही अजूनही पक्क्या मुरलेल्या प्राध्यापिका झाला नाहीत. अजून अनुभव येतील. मग इतकी चीड येणार नाही. फक्त असहाय्यता जाणवेल. तीही आपण काही करू शकत नाही याची ! सगळेजण एकच गोष्ट सांगतील. सगळ्या कॉलेजमध्ये असंच चालतं. पुढं पुढं आपलीही खात्री पटते की, सगळीकडे हेच चालत असेल तर भल्याभल्यांनी हात टेकले असणार. त्यामुळे तुम्हाला एक पोक्त सल्ला देतो, तुमचं करियर पाहा." सध्याच्या महाविद्यालयीन वातावरणातील मूल्यहीनतेचा सर्वंकष आलेख काढणारी आणि अंतर्मुख करणारी सामर्थ्यशाली कादंबरी.
-
Shala Aahe Shikshan Nahi
खेड्यांपर्यंत, आदिवासी पाड्यापर्यंत शाळेची इमारत पोचली. पण शिक्षण पोचलं का? शाळेच्या वर्गात पोरं बसली. शाळा भरली. पण पोरं शिकली का? शाळेत जाऊनही मुलं निरक्षर का? अनुदान असूनही आश्रमशाळेत लेकरं उपाशी का? अनागोंदी कारभार आणि आदिवासी भागातील प्राथमिक शिक्षणाच्यादुरवस्थेचा शोध घेणारी एका कार्यकर्त्याची शोधयात्रा... भर पावसाळ्यात गडचिरोली, चंद्रपूर, मेळघाट, नंदुरबार, यवतमाळ, नांदेडजिल्ह्यातील दोनशे गावांमध्ये जाऊन घेतलेला शिक्षणाचा हा शोध... शाळा आहे पण शिक्षण नाही ! हे कटू सत्य अधोरेखित करणारा...वाचकाला अस्वस्थ करत शैक्षणिक प्रश्नांविषयी जागा करणारा लेखजोखा...
-
Sat Na Gat
श्री. राजन खान हे आजचे महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. ते चांगले स्टोरीटेलर आहेतच, पण लेखकाने लिहिताना ज्या अर्थाने निर्दय व्हायचे असते, तसे ते फार जोरकसपणे होतात. ते त्यांच्या पात्रांत भावनिकदृष्ट्या अडकत नाहीत. त्यांच्या प्रेमात पडून अनुभवातला दाह ते निष्कारण कमीजास्त करीत नाहीत. एखाद्या स्थिर चौकटीतल्या चित्राची ओळख करून देण्याच्या पद्धतीने ते सुरुवात करतात आणि भराभर फटकारे मारत भरदार स्केच करीत जावे तशी पात्रे उभी करतात. त्यांची समूहचित्रणेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. नामी नावाच्या बलात्कारित स्त्रीची गोष्ट सांगता सांगता ते आपल्या एकूण सामाजिक वास्तवाचा खेळ उभा करतात. स्वार्थ आणि हितसंबंध राखणार्या खेळ्या सारे जण आपापल्या कुवतीनुसार खेळत असताना एखाद्याच्या सुखदुःखाला कवडीइतकेही मोल उरत नाही याचा प्रत्यय देऊन आपल्याला अस्वस्थ करतात, अंतर्मुख होण्याला प्रवृत्त करतात. एका घटनेचे धागेदोरे उभे करता करता खूप मोठा पट आपल्यासमोर साकार करणारी व समकालीन वास्तवाचे अतिशय भेदक चित्रण करणारी `सत ना गत’ ही आजची एक महत्त्वाची कादंबी आहे हे निःसंशय.
-
Jagaychay Pratyek second
डॉ. यशवंत केवळे, चर्मकार समाजातला तरुण. बूटपॉलिश करत, रेल्वेत तर्हर्हेच्या वस्तू विकत आणि नाना नोकर्या पत्करत त्यानं शिक्षण पूर्ण केलं. तो तेवढ्यावरच थांबला नाही, त्यानं अनेक कला, छंद जोपासले. रसिकतेनं जगला. आपल्या परिसराला सभ्यता शिकवण्याचा प्रयत्न केला.. आणि एका छोट्या अपघाताचं निमित्त होऊन मरण पावला. त्याच्या पत्नीनं कथन केलेली त्यांच्या सहजीवनाची ही कहाणी.