-
Asmita
अस्मिता फुरसुंगीकर, भारतीय लष्करातील कर्नलच्या मुलीचे अपहरण झाले. शोध घेण्याची जबाबदारी संजय पाटील य पोलीस अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली. मालाड नदी, जहागीरदार अहवाल, मुशी कट्यार, मृत्युंजय यज्ञ, घारापुरी बेट, इराडी देवी, अलिबाग किल्यातील तळघर यातील गूढरहस्य, मुंबईपासून अलिबागपर्यंतच्या शोध मोहिमेत संजयची गाठ पडली आहे अघोर पंथातील सिद्धीपुरुष सर्पराजमहाराजांशी, त्याला तोंड देण्यासाठी मदत घ्यावी लागली ती अध्यात्म जगातील श्री गुरुमणी यांची आणि सुरु झाला जीवघेणा संघर्ष.
-
Local Majhi Sakhi
मुंबईच्या एस.एन.डी.टी विद्यापीठात पर्यावरणावर झालेल्या चर्चासत्रात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला गेला. तो होता, मुंबईचा लोकल-प्रवास . लोकल प्रवासावर संशोधन करून वाचलेला पेपर. त्यात म्हटलं होतं की मुंबईचा लोकल-प्रवास हे संथ मरणाचं सावट आहे. या एका वाक्याने लेखिका दचकली. कारण तीही रोज लोकलने प्रवास करत होती. लोकलमध्ये रोज घडणार्या, घाबरवणार्या घटनांची ती साक्षीदार होती. त्यामुळे संथ मरणाचं सावट या संकल्पनेनं ती मुळापासून हादरली. मुंबईसारख्या प्रचंड गर्दीच्या महानगरात, सामाजिक, राजकीय अशा बेमुर्वत घटनांनी लोकल-प्रवाशांना बसणारा फटका, उदा. रेलरोको, बॉम्बस्फोट, आगी लागणे, झोपडपट्टीवाल्यांची दादागिरी, सिग्नल-यंत्रणा ठप्प होणे. परिणामी चाकरमान्यांना कार्यालयात पोहोचायला होणारा उशीर, लेटमार्क होणे वगैरे. या गोष्टी प्रवाशांच्या आवाक्यातल्या नसतात. यातून वैयक्तिक समस्या निर्माण होतात. आयुष्याचा समतोल बिघडत जातो. सत्य घटनांवर आधारित कादंबरी.
-
A Russian Diary
ब्लादिमीर पुतिनच्या राजवटीतल्या, घायाळ करणार्या आणि हादरवून टाकणार्या सत्यांना अॅना पोलितकोवस्क्याने तिच्या आधीच्या आणि या डायरीत ज्या प्रकारे उघड केलं आहे, त्यावरून तिला केव्हाना केव्हा कोणीतरी मारून टाकणारच होतं आणि एका प्रकारे ती एवढे दिवस जगली, हाच एक चमत्कार म्हणावा लागेल! सर्वात आश्चर्यकारक गोष्ट तर ही म्हणावी लागेल की, सोव्हिएतनंतरच्या अस्थिरतेच्या काळात एक अशी पत्रकार उभी राहिली, जिने जवळजवळ एकहाती चेचन्याची कुप्रसिद्ध दु:खान्तिका, तसंच आधुनिक रशियाची गैरकृत्यं जगाच्या नजरेसमोर आणली. राजकीय आणि मानवी हक्कांची व्यवस्थेतच मोठ्या प्रमाणावर घडून आलेली पायमल्ली, याचा तिने बुरखा फाडला आणि 'रशियन डायरी'त केलेल्या नोंदीतून तिने ते काम सुरूच ठेवलं. हीच ती डायरी, डिसेंबर 2003 ते 2005च्या अखेरपर्यंत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पार्लमेंटरी निवडणुका आणि बेसलानच्या शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर उठलेला गदारोळ यांच्या नोंदी ठेवणारी! अॅना पोलितकोवस्क्याला जगू देण्यात आलं नसतं, याची जणूकाही भविष्यवाणीच तिची 'ए रशियन डायरी' वाचताना झाल्यासारखी भासते. तिच्या मॉस्को येथील अपार्टमेंट ब्लॉकच्या जिन्यात, सुपारी घेऊन एका भाडोत्री मारेकर्याने केलेली तिची भयानक हत्या घडल्याचं तुम्हाला ठाऊक असल्याने तिचा हा शेवट अटळ होता, हे प्रकर्षाने जाणवतं.
-
Three Cups Of Tea
आम्ही कोणाही व्यक्तीसमवेत काम करण्याचे ठरविल्यास, त्या व्यक्तीबरोबर चहाचे तीन कप पिण्याची आमची परंपरा आहे. चहाचा पहिला कप घेताना तुम्ही आमच्यासाठी अनोळखी व्यक्ती असता. चहाच्या दुसर्या कपाबरोबर आमचे तुमच्याशी मित्रत्वाचे नाते जुळते. तिसर्या कपाबरोबर आम्ही तुमचे कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून स्वागत करतो आणि वेळप्रसंगी कुटुंबासाठी आत्मबलिदान करण्यास आम्ही मागे पुढे बघत नाही.- हाजी अली. 1993 साली के-2 शिखरावरील थरारक आणि अनर्थकारी मोहिमेवर अयशस्वी ठरलेला गिर्यारोहक ग्रेग मॉर्टेनसन, गारठलेल्या आणि पाण्यावाचून शुष्क झालेल्या अवस्थेत, वाट चुकून पाकिस्तानातील काराकोरम पर्वतराजीतील एका दरिद्री खेड्यात पोहोचतो. खेड्यातील लोकांच्या दयाळूपणाने भारावलेला मॉर्टेनसन परत येऊन मुलांसाठी शाळा बांधण्याचे वचन देतो. दिलेल्या वचनाची पूर्तता आणि मिळालेले विस्मयजनक यश याची गोष्ट म्हणजे थ्री कप्स ऑफ़ टी. तालिबानच्या दहशतवादामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशातील वातावरण तंग आणि धोकादायक बनत गेले. परंतु अशा स्थितीत पर्वतराजींच्या कुशीत वसलेल्या आणि कल्पनातीत निसर्गलेणी ल्यालेल्या पाकिस्तानातील दुर्गम खेड्यात मॉर्टेनसन एकच शाळा बांधून थांबला नाही, तर त्याने एकूण पंचावन्न शाळा बांधल्या. ही गोष्ट म्हणजे खिळवून टाकणारे साहस आणि मानवतावादी चौतन्यातून उदयास आलेला आलेख आहे.
-
Nilangini
मी अग्निशिखा आहे. मला बळी हवाय, अश्वत्थामाचा! तो ब्राह्मण असला तरी! त्याच्या ब्राह्मण्यत्वाला काळिमा फासलाय त्याने! अती शूद्र,अती हीन झालाय तो! तो जगायच्या लायकीचा नाही. त्याला पुरुषार्थाचं मरण द्यायचं नाही तर छळूनछळून मारायला हवं. त्याला जाणवायला हवं की माझ्या पुत्रांना मारून त्याने घोर अपराध केलेला आहे. त्या नीचाच्या डोक्यावरचा मांसल मणी कापून मला आणून द्या.छछ एवढा क्रोध तिचाच असू शकतो! अग्निसारख्या तेजस्वी आणि कृष्णाची सखी असलेल्या नील वर्णाच्या नीलांगिनीचा! ...द्रौपदीला महाभारत कसं जाणवलं त्याबाबतचं तिचं हे कथन!
-
Pruthvivar Manus Uparach
मानवाचं जीवन म्हणजे सतत घेतला जाणारा शोध. या शोधामागं मानवी बुद्धिला पडणारे प्रश्न, निसर्गाबद्दलची जिज्ञासा कारणीभूत आहे. यामुळंच मानवानं आज विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. क्रमाक्रमानं सृष्टीची गुपितं मानव शोधून काढत आहे; परंतू तरीही अजून सृष्टीची अनेक गुपितं मानवाला माहित झालेली नाहीत. निसर्गाच्या गुपितांच्या शोधांबरोबरच मानवाला स्वत:च्या उत्पत्ती बाबतही अनेक प्रश्न पडलेले आहेत. मानवी इतिहासाचा शोध घेता घेता अशा एका बिंदूपाशी आपण थबकतो की ह्यापूर्वीचे काही संदर्भ सापडणे कठीण होते. या विषयासंबंधी एरिक व्हॉन डॅनिकेन या झपाटलेल्या संशोधकाने काही धक्कादायक सिद्धांत मांडले. देव म्हणजे परग्रहावरील अतिप्रगत जीव व त्यांनी पृथ्वीवर निर्माण केलेला जीव म्हणजे मानव हा तो सिद्धांत. या सिद्धांताची मनोरंजक माहिती या पुस्तकात दिली आहे. विज्ञानामधील एका आगळ्या वेगळ्या संशोधनाची माहिती देणारे उत्कंठावर्धक पुस्तक.
-
Selective Memories
शोभा डे हे नाव बहुचर्चित. कोणत्या ना कोणत्या जगावेगळ्या वागण्यामुळं शोभा डे नेहमीच वादग्रस्त ठरल्या आहेत. 'स्फोटक आणि खळबळजनक’ या शिक्याआड दडलेल्या एका संवेदनशील सच्च्या व्यक्तीचं दुर्मिळ दर्शन 'सिलेक्टिव्ह मेमरी’मधून वाचकांना घडत जातं. अपरिचित वाटांवर हट्टानं, आत्मविश्वासानं पाय रोवणारी, आपल्या व्यक्तिमत्त्वाला नवनवे आयाम जोडणारी खंबीर, आत्मनिर्भर स्त्री वाचकांना झपाटून टाकते. एका ग्लॅमरस व्यक्तीचं विलक्षण पारदर्शी रूप वाचकांना नाविन्याचा अनुभव देते. शोभा डे यांच्या मूळ पुस्तकाचा आत्मा ओळखून आपल्या स्वतंत्र भाषेत अपर्णा वेलणकर यांनी त्याचा अत्यंत रसाळ अनुवाद मराठी वाचकांसाठी सादर केला आहे. शोभा डे यांच्या या मोजक्या अघळपघळ आठवणीत मॉडेलिंगच्या करिअरमधील लोक विलक्षण अनुभव आहेत. 'स्टारडस्ट’ चालवताना दिसलेली नटनट्यांच्या स्वभावप्रवृत्तीची विविध रूपे आहेत. कौटुंबिक जीवन, वृत्तपत्र स्तंभलेखन, कादंबरीलेखन याबाबतचे कसदार अनुभव आहेत. आपले सर्व अनुभव अलिप्तपणे परंतु रंजकतेने सांगण्याची भाषिक क्षमता असल्याने 'सिलेक्टिव्ह मेमरी' विलक्षण भावनांचा पट वाचकांपुढे खुला करते. या स्मरणयात्रेत विविध क्षेत्रातील दंभ, ढोंग उघड झालेले आहे. आपल्या निर्भिड, रोखठोक शैलीत स्वत:चा व अनुभवलेल्या सर्व मार्गाचा घेतलेला वेध म्हणजे 'सिलेक्टिव्ह मेमरी'.
-
Ladies Coupe
ही आहे कथा स्वत:चंच आयुष्य विंचरून पाहणार्या एका स्त्रीची, अखिलनंदेश्वरी ऊर्फ अखिला. वय वर्ष पंचेचाळीस, अविवाहित, सरकारी खात्यात कारकून, जगता जगता इतकी ओझी येत गेली खांद्यावर की, तिचं स्वत:साठी जगणं... स्वत:च्या मर्जीनं जगणं राहूनच गेलं. मुलगी म्हणून, बहीण म्हणून, आत्या आणि मावशी म्हणून ती उष्ट्या संसारांच्या खरकट्यात फक्त पिचत राहिली. हे रहाटगाडगं खरं तर असंच चालू राहायचं; पण एके दिवशी कशी कोण जाणे, स्वत:चीच हाक ऐकून अखिला निघाली... कन्याकुमारीच्या प्रवासाला - एकटीच. आयुष्यात पहिल्यांदाच मोकळा श्वास घ्यायला... तमिळ ब्राह्मण कुटुंबाने तिच्या अविवाहितपणाभोवती घातलेली कर्मठ रिंगणं तोडून स्वत:च्या मनासारखं जगायला... स्वत:साठी जगायला... आयुष्याची वेगळी चव चाखायला. रेल्वेच्या प्रवासात तिला भेटतं एक वेगळंच जग. लेडीज कूपेच्या धावत्या आडोशात भेटतात आणखी पाच जणी. बघता बघता परकेपणाची बंधनं गळून पडतात. सहा जणींच्या आयुष्याच्या सहा दिशा पकडून गाडी भरधाव सुटते. जखमा मोकळ्या होतात. गुपितांच्या गाठी सुटतात. सहा वेगळी आयुष्यं सहा जणींत वाटली जातात. जानकी... मार्गारेट शांती... प्रभादेवी... शीला... मारीकोलान्थू. लेडीज कूपेमधून प्रवास करताना तिला भेटलेल्या या पाचही जणींना अखिला विचारतेच, "पुरुषांच्या आधाराशिवाय बाई एकटी राहू शकते ? सुखाने, आनंदाने जगू शकते ? की बाईला पुरुष हवाच असतो शेवटी ?"