-
Raya (राया)
कृष्णदेवराय हा बहुजन पार्श्वभूमीतून पुढे आलेला राजपुत्र सन १५०९मध्ये विजयनगरच्या सिंहासनावर विराजमान झाला. एकीकडे कमकुवत झालेलं साम्राज्य आणि दुसरीकडे चोहो बाजूंनी शत्रू अशा, प्रसंगी खचवून टाकणार्या परिस्थितीला कृष्णदेवराय धैर्याने समोरा गेला आणि आणि आपल्या २० वर्षांच्या विलक्षण कार्यकाळात त्याने इतिहास घडवला! आपल्या कारकिर्दीतल्या सर्व लढाया तो जिंकला आणि त्याने दक्षिण भारताला एकअमली छत्राखाली आणलं. आज कृष्णदेवराय भारतीय इतिहासातल्या थोर राजांपैकी एक मानला जातो, ते केवळ रणांगणावर त्याने अतुलनीय यश मिळवलं म्हणून नाही, तर तो खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवरचा पहिला भारतीय राजा होता म्हणून. जागतिकीकरण आणि बहुसांस्कृतिकता यांसारख्या आव्हानांना त्याला तोंड द्यावं लागलं होतं. या सांस्कृतिकदृष्ट्या गतिशील कालखंडाने कृष्णदेवरायाला भारतीय इतिहास आणि परंपरा यांचा अभ्यास करण्याची प्रेरणा दिली. एक ‘तत्त्वज्ञ-राजा’ असलेला कृष्णदेवराय स्वतः एक निष्णात कवी होता. या विलक्षण आणि उत्कंठावर्धक पुस्तकात अत्यंत सूक्ष्म संशोधनाची रंजक मांडणी करण्यात आली आहे. पोर्तुगीज आणि फारसी स्रोतांबरोबर अनेक दुर्लक्षित तेलुगू स्रोतांवर हे पुस्तक आधारित आहे. थोर सम्राट कृष्णदेवराय याचं हे मनोवेधक चरित्र इतिहासप्रेमींच्या व रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास वाटतो.
-
Devalacha Wagh Ani Kumaonche Anaki Kahi Narabhaksh
“नरभक्षक वाघाला मारण्याचं काम मनाला अतिशय समाधान देतं, यात शंकाच नाही. ‘जे काम कुणीतरी करणं अत्यावश्यक होतं आणि आपण ते केलं’ याचं ते समाधान असतं. आपण आपल्या बलाढ्य शत्रूला त्याच्याच परिसरात जाऊन मात दिल्याचं समाधान असतं; आणि या सगळ्याच्या पलीकडे, पुतळीसारख्या धाडसी मुलीला वावरण्यासाठी पृथ्वीवरचा लहानसा का होईना, एक कोपरा सुरक्षित केल्याचं समाधान असतं.” नरभक्षक वाघांची प्रचंड दहशत बसलेल्या, दुर्गम म्हणाव्या अशा पूर्वोत्तर राज्यांमध्ये कॉर्बेट यांनी केलेल्या वाघांच्या शिकारींमागची त्यांची ही प्रामाणिक भावना आहे. साहजिकच, या सगळ्या शिकारकथा थरारकच आहेत. मात्र वाघाची शिकार करणार्या या माणसाची माणसाइतकीच वाघाबाबतची संवेदनशीलता अनेकदा रोमांचित करते आणि कॉर्बेट यांचं वेगळेपणदेखील अधोरेखित करते. म्हणूनच ‘शिकार करण्याचा आनंद घेणारा शिकारी’ या घट्ट, निष्ठुर चौकटीत या माणसाला बंदिस्त करता येत नाही. उलट जंगलाचं जिवंतपण, सळसळतेपण आणि रांगडा पण नितळ कारभार हा माणूस ज्या तरलेतेने टिपतो, त्यातून ‘शिकारी’ या काहीशा आक्रमक चौकटीच्या कितीतरी योजनं तो पुढे जातो आणि माणसाच्या ‘विकसित’ म्हणवल्या जाणार्या मेंदूमुळे निर्माण झालेल्या अनेक वर्तन विसंगती, त्याच्या मनातल्या सूक्ष्मात रुतून बसलेलं मतलबी क्रौय यांना सहज, नर्मविनोदीपणे पृष्ठभागावर आणतो. त्यामुळेच ‘थरारक’ म्हणून या कथा आनंद देतातच, पण त्याच वेळी कॉर्बेटबरोबर त्या आपल्यालाही खोल जंगलात उतरायला भाग पाडतात आणि त्याहूनही पुढे जात ‘माणूस’ नावाच्या रसायनाबाबत अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करतात.
-
Rashtirya Swayamsewak Sanghane Gamawaleli Varse( र
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या डॉ. संजीव केळकर यांनी संघाच्या कार्यपद्धतीचे या पुस्तकात विश्लेषण केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडलेल्या काही मंडळींपैकी दोघा-तिघा मंडळींनी जी पुस्तके लिहिली त्यापेक्षा हे पुस्तक वेगळे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाबद्दल आस्था असतानाही केळकर यांनी येथे कठोर चिकित्सा केली आहे. संघाला गोळवलकर यांच्या मार्गाने यश मिळणार नाही, तर देवरस यांच्या सर्वसमावेशक पद्धतीनेच उज्ज्वल काळ असेल, असे मत लेखक मांडतात. गोळवलकर यांनी संघाच्या कामाची दिशा बदलली. त्यामुळे संघटनेचे बरेच नुकसान झाले. केळकर यांनी अनेक पुस्तकांचे संदर्भ घेऊन, विविध पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, अनेक कागदपत्रांचा अभ्यास करून केळकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. अशोक पाध्ये यांनी मराठी अनुवाद केला आहे. अभ्यासक आणि सामान्य वाचक दोघांनाही हे पुस्तक आवडेल.