-
CCTVnchya Gard Chayet (सीसीटीव्हींच्या गर्द छायेत)
विद्यमान मानवी संस्कृतीवर तंत्रज्ञान क्रांतीचे अनेक तऱ्हेचे भलेबुरे परिणाम झाले आहेत. नवऔद्योगिक व तंत्रज्ञानप्रणित आधुनिकोत्तर काळाच्या परिणामातून गीतेश गजानन शिंदे यांची कविता निर्माण झाली आहे. या जगातले ताणतणाव आणि पेच त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहेत. भूतकाळातील मानवी जग, निसर्गसृष्टी आणि सध्याच्या जगातील अंतर्विरोधातून ही कविता निर्माण झाली आहे. हरवलेली स्वप्नभूमी आणि आत्ताच्याकृष्णविवरातील छायांनी या कवितांना आकार प्राप्त झाला आहे. भूतकाळातील भरलेपणाची जाणीव आणि विविध प्रकारच्या अंतरायाचा स्वर या कवितांमधून ऐकू येतो. आजच्या जगातील रिळाचित्रदर्शनातील (रिल्समधील) स्वमग्न, सेल्फी समाजाच्या एकाकी रंजनमायेची असोशी या कवितेतून प्रकटलीअसून आभासी मायाजाळात हरवलेल्या जगाच्या मायाबंधाची ही जाणीव आहे. भाषा आणि भावना रक्तबंबाळ झालेल्या जगाचे हे संवेदन आहे. कवितेतील या ताणतणावाला समांतर स्त्रीत्वाचा आणि वडील-मुलाचा जाणीवशोध आहे. स्त्रीचा सृष्टिशोध तसेच इतरेजनांचा तिच्याविषयीचा शोध या कवितेत असून त्यास गतविस्मृतींचे पदर आहेत. तर वडील आणि मुलातील विस्कटलेल्या विसंवादात विभक्तपणाची जाणीव आहे. हरवलेल्या जगाचा आठवशोध म्हणून या कवितेत समुद्र, झाड, स्वप्नं आणि हिमालय शोधाला विविध परिमाणे प्राप्त झाली आहेत. आधुनिकतावादी, सामाजिक तर काही प्रमाणात भावकवितेची सरमिसळ गीतेश शिंदे यांच्या कविताविश्वात आहे.
-
Eka Aarambhache Prastavik (एका आरंभाचे प्रास्ताविक
असंख्य प्रश्नांनी भरलेल्या या विराट दुनियेत व्यक्तीच्या आपल्या म्हणून असणाऱ्या प्रश्नांना जागा आहे की नाही? जागा असेल किंवा नसेल, जागा द्या किंवा देऊ नका, व्यक्ती म्हणून प्रत्येकाला अशा आपल्या आपल्या फक्त स्वतःच्याच अशा प्रश्नांशी कायमच झगडावं लागत असतं. हे कोणालाही पटावं. ते आपल्या सगळ्यांचं वास्तव असतं. अन हे प्रत्येकी वेगळं असतं. दुनियेत अशी सात अब्ज वास्तवं या घडीला मौजूद आहेत. अन ती सगळी एकमेकांपासून भिन्न आहेत. अन त्या प्रत्येकाची आतली एक भली मोठी दुनिया आहे. तिला काही महत्त्व आहे की नाही?… अशा प्रश्नांची दुनिया घेऊन वावरणारी काही प्रातिनिधिक पात्रं या कादंबरीत आहेत. त्यांच्या प्रश्नांची देवघेव, त्यांचे टकराव, बारक्या बारक्या इच्छा, आकांक्षा आणि हितसंबंधांचे टकराव यांच्यातून कथानक पुढे सरकत जातं. आणि प्रत्येक पात्रासाठी काही एका आरंभाजवळ येऊन थांबतं. असा आरंभ कुठे स्पष्ट कुठे अस्पष्ट सुद्धा असतो. उदाहरणार्थ लमुवेल आणि तुंगाक्का यांच्यासाठी हा आरंभ स्पष्ट दिसतो. बाकीच्यांसाठी तो तितका दिसत नाही. पण तो असतो. कारण कोणताही शेवट हा मुळात आणखी एका आरंभाचं प्रास्ताविकच असतो. म्हणून ही कादंबरी. एका आरंभाचे प्रास्ताविक.
-
Rath (रथ)
१९८४ साली पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या या कादंबरीला वाङ्मयीन चळवळींची विशेषतः ग्रामीण साहित्य चळवळीची पार्श्वभूमी आहे. या चळवळीतील विविध पातळ्यांवरील नेते, कार्यकर्ते, त्यांचे मनोव्यापार, त्यांच्या भूमिका; त्यांचे जगणे या साऱ्याचे वेधक चित्रण व विश्लेषण स्वाभाविकपणेच तिच्यात येते. चळवळी या त्या त्या काळाच्या अपरिहार्य गरजा म्हणून निर्माण होत असतात. माणसं निमित्तमात्र असतात. ती नसती तर त्यांची जागा आणखी कोणीतरी घेतलीच असती, हे खरंच आहे. पण माणसं निवडण्यासाठीची उपलब्धता ही त्या त्या काळाची मर्यादा सुध्दा असते. या मर्यादेचा चळवळीच्या गतिचक्रावर, तिच्या भवितव्यावरही प्रभाव पडत असतो. आणि हे अपरिहार्यही असतं. काही संपतं वा थांबतं तिथून नवं काही सुरू होतच असतं. किंबहुना माणसांना काहीच सुरू करता येत नाही वा थांबवताही येत नाही. दोन्ही प्रकारात कृतीचे जे भ्रम असतात त्यांचा निरास फक्त अनुभवाच्या ज्ञानाच्या उजेडातच होतो. या प्रकारच्या विशाल समझदारीकडं नेणाऱ्या काही दिशा ही कादंबरी प्रस्फुटित करते. स्वातंत्र्योत्तर मराठी ग्रामसमाजातील बदलाचा, त्याच्या विषयीच्या आस्थेच्या पर्यावरणाचा व सांस्कृतिक आकांक्षेचा एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून सुध्दा या कादंबरीकडं पाहता येईल.