-
Fandry Bharatiya Chitrapatatil Mailacha Dagad (फँड्री भारतीय चित्रपटातील मैलाचा दगड)
'फैड्री' हा जात, धर्म, वर्ण, वर्ग, वंशादी भेदांचा अमंगळ चक्रव्यूह भेदून प्रेम फुलवत राहावं, असं स्फुल्लिंग चेतवणारा चित्रपट आहे. 'फँड्री'तील संघर्ष प्रेक्षकाला माणूसपणाच्या चिंतनात रमवतो. स्वतःतील छुप्या पशुत्वावर भिरकावलेला दगड त्याला न्याय्य वाटतो. अनुभव देत, हितगुज करत प्रेक्षकांचे भावनिक उन्नयन साधणाऱ्या 'फँड्री'सारख्या कलाकृती दुर्मीळ असतात. त्यांचा अनेक अंगांनी अभ्यास केला गेला पाहिजे. नेमके हेच काम या पुस्तकाद्वारे हनुमंत लोखंडे यांनी केले आहे. यातील चर्चेची, चिंतनाची मांडणी लेखकाच्या अभ्यासवृत्तीची आणि त्याच्यातल्या समंजस संवादकाची साक्ष देणारी आहे. विविध दृष्टिकोनातून 'फँड्री'चे आकलन करताना, चित्रपट अन् समाज यांच्यातील वीण उलगडून दाखवताना, आजवर आम्ही घडवलेल्या इष्ट-अनिष्ट समजुतींचा ऊहापोह करताना लेखकाने आपल्या ओघवत्या शैलीनं साधलेली सुभगता पुस्तक वाचनीय करते. सोबतच, किशोर कदम यांची समर्पक प्रस्तावना आणि लेखकाने घेतलेली नागराज मंजुळे यांची जिज्ञासू मुलाखत पुस्तकास आणखी समृद्ध करते. समकालीन जातिग्रस्त अवकाशात, प्रागतिक विचारांची पायवाट पाडणाऱ्या सुधारकांची लोभस दिंडी, संवेदनशील माणूसपणानं पुढे नेणारा नागराजसारखा कलाकार आणि त्याच्या कामाचे सौंदर्य उलगडून दाखवत विचारमग्न करणारा हनुमंत लोखंडेसारखा चिंतनशील अभ्यासक, हे दोघेही अप्रूपाचे आहेत.
-
Tata 1968 - 2021 (टाटा १९६८ - २०२१)
"गेल्या काही वर्षात टाटा सन्समधील माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीबाबत बरंच काही लिहिलं गेलंय. त्यातल्या बऱ्याच गोष्टी पुरेशा माहितीअभावी अथवा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून लिहिल्या गेल्या होत्या. पीटरचे पुस्तक मात्र कुठलीही पक्षपाती भूमिका घेताना दिसत नाही." रतन टाटा "टाटांनी एका कौटुंबिक मालकीच्या उद्योगाचे रूपांतर अनेक असंबंधित व्यवसायांच्या महाकाय समूहात करत आज ते ज्या स्थानावर पोहचले आहेत, ते कसे साध्य केले? 'टाटा वे' म्हणजे काय, ज्यामुळे त्यांना मोठा सन्मान आणि आदर मिळाला? पीटर केसी अशा अनेक बाबींचा धांडोळा घेतात." इकॉनॉमिक टाईम्स "जर एखाद्यास जागतिक पातळीवर आघाडीवर असणाऱ्या भारतीय उद्योगसमूहाबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा असेल तर त्यासाठी हे पुस्तक उत्तम सुरुवात ठरेल." फायनान्शियल एक्सप्रेस
-
Washington Diary (वॉशिंग्टन डायरी)
अमेरिकेच्या इतिहासात २०२२ आणि २०२४ या सालांमध्ये सलग दोनवेळा प्रथमच एक मराठमोळी व्यक्ती, मुळची भारतीय, अमेरिकन केंद्र सरकारची खासदार म्हणून निवडून आली. अमेरिकेच्या राजकारणातील हे उच्च पद प्राप्त करणाऱ्या मराठी उद्योजकाचे नाव आहे डॉ. श्री ठाणेदार. अत्यंत बेताच्या परिस्थितीतून आलेला, बेळगावसारख्या छोट्या शहरातील एका सामान्य कुटुंबातील मुलगा; पण त्याची स्वप्ने आकाशाला गवसणी घालणारी होती. अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेणे, त्यानंतर आर्थिक स्थैर्यासाठी चांगली नोकरी करणे, स्वतःचा बिझनेस सुरू करणे आणि प्रचंड मेहनतीने तो यशस्वी करून दाखवणे हा त्याचा प्रवास होता. खरं तर इथेच एखाद्याची गोष्ट संपली असती, पण डॉ. श्री ठाणेदार हे काही वेगळेच रसायन आहे. (त्यांची डॉक्टरेटही रसायनशास्त्रातील आहे !!!) सामान्य माणसाला एका आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याची संधी मिळते. मनस्वी स्वभावाने आणि ठाम ध्येयाने तो ती संधी घेतो आणि त्याचे सोने करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. श्री ठाणेदार. चांगल्या स्थिर असलेल्या बिझनेसवर अचानक प्रचंड आर्थिक संकट आले. पाहता पाहता राजाचा रंक झाला. पण धीर न सोडता श्री ठाणेदार यांनी पुन्हा एकदा फिनिक्स पक्ष्यासारखी राखेतून भरारी घेतली आणि स्वतःला सिद्ध करून दाखवले. त्यानंतर बिझनेसचा अध्याय बंद करून त्यांनी पुढील झेप राजकारणात घेतली. २०२० मध्ये मिशिगन राज्यातील आमदार, तर २०२२ आणि आता २०२४ अशा सलग दोनवेळा डेट्रॉईट, मिशिगन या विभागातून अमेरिकेचे खासदार म्हणून ते निवडून आले. अमेरिकेच्या केंद्रीय संसदेतील एक सक्षम राजकारणी म्हणून ही भूमिका ते आता सर्व शक्तिनिशी सिद्ध करत आहेत. अमेरिकेतील बिझनेस आणि तिथले राजकारण या दोन्ही पटांवर घडलेला नाट्यमय थरार म्हणजे श्री ठाणेदार यांची नवी गोष्टः 'वॉशिंग्टन डायरी.'
-
Maharaja E Hind Maharaja Yashwantrao Holkar (महाराजा-ए-हिंद महाराजा यशवंतराव होळकर)
"लढाईच्या मैदानांत मी ब्रिटिश तोफखान्याचा सामना करण्याला वा त्यापुढे तगण्याला असमर्थ असलो तरी शेंकडो कोसांचा मुलुख तुडवला, लुटला व जाळला जाईल. तुमच्या सेनापतीला श्वास घेण्यासाठीं एका क्षणाचीही सवड मिळणार नाहीं. समुद्राच्या लाटांप्रमाणें असलेल्या माझ्या फौजेच्या धाडीखालीं लाखों माणसें संकटांत पडतील." महाराजा यशवंतराव होळकर
-
Abhedya (अभेद्य)
रेव्हेन्यू इंटेलिजन्स ब्युरो जेव्हा स्वतःच्या इतिहासातील सर्वांत धाडसी मोहिमेला आरंभ करतो, तेव्हा त्यांना प्रतिकाराची पूर्ण जाणीव असते. पण ज्याची त्यांनी कल्पनाही केलेली नसते, तो असतो विश्वासघात. मोहिमेच्या अग्रभागी उभे आहेत दोन भिन्न संघर्षांतून घडलेले अधिकारी! कर्तव्याच्या अखंड ध्यासाने पेटलेला सुशांत पवार ... आणि केवळ सामर्थ्यशाली गुन्हेगारांशीच नव्हे, तर संशय आणि दबावाशीही झुंज देणारा तडफदार अधिकारी महादेव माळकर ... कित्येक महिन्यांच्या सूक्ष्म नियोजनातून आणि काटेकोर गुप्ततेच्या आवरणाखाली, आकार घेते एक प्रचंड मोहीम ... अचूक, भेदक आणि कुणीही थांबवू शकणार नाही अशी. चूक होण्याची शक्यताच नव्हती. पण सगळंच चुकतं ... जेव्हा योजनेला तडा जाऊ लागतो आणि विश्वासाची कसोटी लागते, तेव्हा टीम खंबीरपणे उभी राहते. जखमी, पण अढळ ... गुप्त पाळत, शेल कंपन्या, सांकेतिक नोंदी, लपवलेले लॉकर्स आणि दुर्गम भागातील लपण्याच्या ठिकाणांमधून पुढे सरकणारी ही कथा वेळ, दबाव आणि चलाखी यांच्या विरोधात सत्याच्या अखंड पाठपुराव्याची आहे. वास्तववादी तपास पद्धतींवर आधारित ही कादंबरी तपास प्रक्रियेचे बारकावे आणि मानवी भावनांचा संगम साधत प्रत्येक यशामागचे धैर्य, परिश्रम आणि कणखरपणा उलगडते. विश्वासघात, जिद्द आणि पोलादी सत्याची एक थरारक तपासकथा.
-
Tukaram (तुकाराम)
‘तुकाराम’ हे पुस्तक वरिष्ठ सनदी अधिकारी व सध्या राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त असलेले तुकाराम मुंढे यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. या धडाकेबाज अधिकाऱ्याचा संपूर्ण प्रशासकीय प्रवास कायम संघर्षाच्या वाटेनेच झाला. बालपण ते आयएएस होईपर्यंत ते अभावानेच जीवन जगले. आयएएस स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा हा प्रवास फारच प्रेरणादायी ठरणार आहे. आयएएस झाल्यावर पारदर्शक प्रशासनाच्या आग्रहामुळे त्यांची २० वर्षात तब्बल २५ वेळा बदली करण्यात आली. त्यांच्या याच संघर्षमय आयुष्याचा वस्तुनिष्ठ आढावा ‘तुकाराम’ या पुस्तकात घेण्यात आला आहे. मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरेल, इतके हे पुस्तक गुणात्मकदृष्ट्या उत्तम झाले आहे.‘तुकाराम’ या पुस्तकाचे लेखक शफी पठाण हे मराठीचे अभ्यासक व नामवंत पत्रकार आहेत. मागच्या २५ वर्षांपासून ते माध्यमात कार्यरत असून त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून ‘दैनिक लोकसत्ता’मध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून कार्यरत असताना,तसेच ‘लोकमत’, ‘सकाळ’, ‘देशोन्नती’ या दैनिकांमधून त्यांनी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विषयांवर धारदार भाष्य केले. ते एक उत्तम पत्रकार,अभ्यासू वक्ते व संवेदनशील मनाचे कवी आहेत त्यांच्या लिखाणाने आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राच्या मनाचा ठाव घेतला आहे.
-
Mahapratapi Subhedar Malharrao Holkar (महाप्रतापी सुभेदार मल्हारराव होळकर)
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार हिंदुस्थान आणि हिंदुस्थानाबाहेर करणारे आणि मराठेशाहीचा इतिहास घडवणारे काही शूरवीर होते. त्यामध्ये अग्रस्थानी असणारे सुभेदार मल्हारराव होळकर हे अत्यंत पराक्रमी, शूर, बुद्धिमान आणि धाडसी असे सुभेदार होते. धर्म, आचार, विद्या, व्यापार आणि युद्धकला या सर्वात ते पारंगत होते. सामर्थ्य, न्याय, नीतिमत्ता, महत्वकांक्षीपणा आणि स्वतःच्या मनगटाच्या बळावर या सामान्य मेंढपाळ व्यक्तीने दिल्लीचा बादशाह कोण व्हावा हे ठरवण्यापर्यंत स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले. त्यामुळे एखाद्या स्वतंत्र राज्याच्या राजासारखे ते आयुष्यभर वागले. पण छत्रपती शाहू महाराज आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्यावरील निष्ठा त्यांनी अखंड जपली. एकूण ७४ परगणे मल्हाररावांच्या ताब्यात होते. प्रत्येक युद्धात मल्हाररावांनी भीम पराक्रम केला. आपल्या कारकिर्दीत ते एकूण ५२ लढाया लढले आणि त्या सर्वांमध्ये त्यांनी यश मिळवले. मराठेशाहीच्या उत्कर्षात मल्हारराव होळकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मराठेशाहीचा भगवा झेंडा अटकेपार फडकवण्यात मल्हाररावांचा सिंहाचा वाटा होता. उत्तर हिंदुस्थानात मराठेशाहीचा पाया मल्हाररावांनी बळकट केला. आपल्या राज्यात प्रशासन, शेती, जलव्यवस्था, न्याय, धार्मिक बाबी, स्थैर्य, शांतता राबवून त्यांनी शिवरायांचा लोककल्याणकारी राज्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. रघुराज मेटकरी हे प्रतिभावंत साहित्यिक आहेत. त्यांनी अनेक पुस्तके, दुमिर्ल कागदपत्रे धुंडाळून मल्हारराव होळकर यांचे हे चरित्र लिहिलेले आहे. मल्हाररावांचे हे चरित्र प्रेरणादायी आहे. मराठी वाचकांना ते नक्कीच आवडेल, असा विश्वास आहे. डॉ. देवीदास पोटे (ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक, मुंबई)
-
Menduchi Mashagat (मेंदूची मशागत)
‘मेंदूची मशागत’ या देवा झिंजाड लिखित पुस्तकात गावाशी जोडलेले अनुभव, संघर्ष आणि ज्वलंत विषय मांडले आहेत. शहरात राहत असूनही त्यांच्या लेखनाची नाळ गावाशी जोडलेली आहे. वाचनसंस्कृतीचे महत्त्व ते वारंवार अधोरेखित करतात. मेंदूच्या विकासासाठी वाचन गरजेचे असून, हे पुस्तक छोट्या प्रकरणांतून अनुभवांद्वारे मौल्यवान संदेश देते. आजचा मेंदू मोबाइलमध्ये अडकला असून, तो पुन्हा डोक्यात आणण्यासाठी अशी ‘मेंदूची मशागत’ आवश्यक आहे, असे मत शरद तांदळे यांनी व्यक्त केले. – शरद तांदळे
-
Krudhyati Ek Thararak Mahasangram (कृध्यती एक थरारक महासंग्राम)
मानवतेच्या कल्याणासाठी महाभारतासमान विध्वंस पुन्हा होऊ नये, हे गरजेचे होते. याच उद्देशाने श्रीकृष्णाने दैवी अस्वे सुरक्षित ठेवण्याची सोय केली होती; परंतु सत्तेच्या लोभापायी मनुष्य कोणताही थर गाठू शकतो, हे कृष्णमृत्यूपश्चात सातशे वर्षातच समजले. कृथ्यति, हा दैवी शक्तीने भरलेला एक असा विक्षिप्त गुन्हेगार उठ्यास आला, ज्याचे लक्ष्य शत्रू राज्यातील गर्भाचा वध करणे, हे होते. हा योद्धा जर 'विद्यधुरंधर स्पर्धा जिंकून इंद्रपदी बसला, तर समग्र आर्यावर्ताचा सर्वनाश होणार हे निक्षित. या दैवी शक्तीने उन्मत्त विक्षिप्त गुन्हेगाराला छोट्याशा राज्याचा सेनापती वीरसेन रोखू शकेल का? डॉ. ऋषिकेश बोधे यांसारख्या लेखकांनी 'कृथ्यती'सारखी गहिराई असलेली साहित्यकृती साकारून मराठी फिक्शनला एक नवे परिमाण दिले आहे. या कादंबरीचे साहित्यिक मूल्य अत्यंत ठोस आहे. तिचं भाषिक सौंदर्य, मनाच्या गुंतागुंतीचा सुक्ष्म येध आणि अंतःप्रेरणेला भिडणारी तिची शैली यामुळे ही कादंबरी एक दीर्घकाळ आठवणीत राहील अशी ठरते. खरे सांगायचे तर, बऱ्याच काळानंतर एवढं शुद्ध, विचारप्रवृत्त आणि संवेदनशील साहित्य वाचायला मिळाल्याचा आनंद झाला. मराठी साहित्यात अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या सशक्त कल्पनाविष्काराच्या अभावाची जाणीव होती; पण 'कृध्यती मुळे त्या पोकळीची भरपाई झाल्याचे समाधान वाटते. आगामी काळात ह्याचे पुढील भागही येवोत, अशा शुभेच्छा.
-
Santaji Ghorpade Japhatan Mulukh (संताजी घोरपडे जफतन मुलूख)
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचं राज्य बुडालं या औरंगजेबाच्या भावनेला संताजींनी जोरदार तडाखा दिला. चार साडेचार वर्ष ब्रम्हपुरी या ठिकाणच्या काळ्या मातीत औरंगजेब बादशहा राहिला. त्याला कारण म्हणजे मराठ्यांचा सेनापती संताजी घोरपडे यांनी बादशहाला निर्माण केलेला धोका होय. वडू कोरेगावच्या बादशाही छावणीवर सन १६८९ साली जो धाडसी छापा संताजी यांनी घातला त्यांने बादशहाची झोपच उडाली, बादशहा मरता मरता त्या रात्री वाचला. संताजीला ठार केल्याशिवाय बादशहाला ब्रम्हपुरीच्या छावणीतून बाहेर पडता येईना. औरंगजेब बादशहा आणि मोगल राजवट ही आशिया खंडातील बलाढ्य राजवट होती. संताजी घोरपडे यांचा अलौकिक पराक्रमाचा दरारा या राजवटीवर एवढा पडला होता की मोगल सरदार संताजी घोरपडे यांच्या बरोबर युध्द प्रसंग पडल्यावर ते युध्द टाळण्याचा प्रयत्न करत. अशा या नर शार्दुल रणधुरंधरास स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांकडून मुजऱ्यास न येणे पासून ते ममलकतमदार ह्या पदवी पर्यंतचा प्रवास म्हणजे संताजी बाबा. संताजी घोरपडे यांच्या जीवनावर आधारित असलेली, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडणारी कादंबरी म्हणजे संताजी घोरपडे जफतन मुलूख.
-
Eklavya (एकलव्य)
दुमदुमत्या आसमंताला निठेपुढं झुकायला लावणारा, स्वअध्ययनान धनुर्विद्या मिळवणारा, कुळभेदाच्या जाचक भिंतींना तोडून सर्वश्रेष्ठ धनुर्धर होणारा निषाधराजा एकलव्य ! महाभारतातलं असं एक पात्र जे कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये असतं तर त्या युद्धाचं चित्र कदाचित बदललं गेलं असतं. एकलव्यानं गुरुदक्षिणेत अंगठा गुरू द्रोणाचार्य यांना दिला, त्याच्या निष्ठेनं सर्वांना भुरळ घातली. अशी गुरुदक्षिणा देऊन साहस, त्याग, निष्ठा व समर्पणाच्या जोरावर परत पर्वतासारखा उभा राहून एकलव्यानं आदर्श निर्माण केला. भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात फक्त आवाजाच्या दिशेनं बाण मारून लक्ष्यवेध करणारा एकलव्य बाणावर इतकं नियंत्रण असणारा महाभारतातला एकमेव धनुर्धर म्हणजे एकलव्य! तो एक बुद्धिमंत हुशार राजा होता, त्यांनीही अनेक युद्ध लढली. युद्धात कृष्णालाही नमायला लावणारा तो एक शक्तिशाली धनुर्धर आणि योद्धा होता. एकलव्य ही कादंबरी वाचल्यावर आपल्या मनाजवळ असलेला राजा. एकलव्य आपल्याला निश्चित सापडेल.
-
Rayari (रायरी)
एकविसाच्या शतकातील युवक नेमका कशाच्या आहारी जातोय ? महापुरूषांबद्दल तो काय विचार करतोय ? गाव पातळीवरील राजकारणात त्याचे अस्तित्व काय आहे ? महिलांवरील अत्याचार कसे पाठीशी घातले जातात ? युवाशक्तीचा वापर कोण व कसा करून घेतोय ? महापुरूषांच्या अस्मितांचा वापर स्वार्थासाठी कसा होतोय ? शेतकऱ्यांना राजा मानणाऱ्या समाजात सध्या त्याचे स्थान कुठे आहे ? सर्वसामान्य जनतेवर अन्याय का केला जातोय ? राजकारण नावाचे शस्त्र रयतेच्या संहारासाठी का संरक्षणासाठी ? रयतेला नासवायचे आणि नागवायचे पाप कुणाचे ? लोकशाहीतली खुर्ची कोण ठरवत ? खर प्रेम काय ? सामान्य जनतेने ठरवले तर काय होऊ शकतं ? काळ बदलण्याचे सामर्थ्य कुणामध्ये आहे ? खरे शिवभक्त कोण ? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे 'रायरी' आहे.
-
Mansik Aaghat Samjun Ghetana (मानसिक आघात समजून घेताना)
'मानसिक आघात समजून घेताना' हे पुस्तक मानसिक आरोग्यावर गांभीर्याने भाष्य करते. या पुस्तकाचे धागे माझ्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडले जातात. मी शिक्षण घेत असताना आणि करियर करत असताना गुन्हेगारी, तुरुंगवास, व्यसन, बदनामी आणि त्यातून सावरताना नकारात्मक भावना अनुभवल्या होत्या. त्यामुळे झालेला मानसिक त्रास मी सहन केलेला आहे. मागच्या पाच-दहा वर्षांपासून अपराधीपणा, भीती, दुःख आणि राग या टोकाच्या भावना मी अनुभवल्या आहेत. त्या वेळी मला योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, परंतु या पुस्तकाच्या माध्यमातून माझ्यासारख्या अनेकांना मार्गदर्शन मिळेल. माझ्या आयुष्यातली जी वर्षे भयाण अंधारात गेली, त्याला त्यांना सामोरे जावे लागणार नाही. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात लेखिकेचे व्यक्तिगत जीवन आपल्यासमोर उलगडत जाते. त्यांचा खंबीरपणा, आत्मविश्वास, जिद्द, प्रामाणिकपणा, मेहनत आणि हार न मानण्याची वृत्ती याबद्दल कौतुक वाटते. कारण अशा परिस्थितीतून सावरताना माणूस व्यसन, गुन्हेगारी आणि गैरवर्तनाला बळी पडतो. पण अशा कुठल्याही आमिषांना बळी न पडता त्यांनी मानसिक आघाताशी धैर्याने दिलेला लढा प्रेरणादायी आहे. 'जवळच्या व्यक्तीचा मृत्यू' हा आघात सहन करताना अनुभवायला येणारी 'शोक' ही भावना शरीर व मन यावर कसा परिणाम करते, हा सहसा न बोलला जाणारा विषय या पुस्तकात सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे. एकूणच आजच्या धकाधकीच्या काळात मानसिक आरोग्याचे महत्त्व ठळक करणारे हे पुस्तक आहे.
-
The Last Courtesan (द लास्ट कोर्टेसान)
१९९३ मधील बो बाजार बॉम्बस्फोटामुळे कोलकाता येथील व्यस्त व्यावसायिक जिल्ह्यातील कोठा संस्कृतीचा अंत झाला. पुढच्या काही वर्षांत डान्स बार आणि डिस्को म्युझिकने मुजरा, कथ्थक आणि ठुमरी या जुन्या काळातील मंत्रमुग्ध करणाऱ्या कलांची जागा घेतल्याने तवायफांनी आपला व्यवसाय सोडण्यास सुरुवात केली. रेखाबाई या तवायफसमोर अनिश्चित भविष्यकाळ उभा ठाकला होता. तिने कुठे जावे? तिने पुढे काय करावे? रेखाबाई मुळात कंजारभाट जमातीतील. तिला अत्यंत कोवळ्या वयात विकले गेले आणि तवायफ बनण्याचे धडे दिले गेले. १९८० च्या दशकात कोठ्यांना अभिजात कलेचा मान मिळत नव्हता. तो अदाकारीच्या वेषात असलेला वेश्याव्यवसाय आहे, अशी समाजाची समजूत होती. त्यामुळे तवायफच्या कलेला नाकारले गेले. अशा काळात रेखाबाईंनी कलकत्ता आणि बॉम्बेमध्ये एक गायन- नृत्य करणारी प्रसिद्ध कलावंत म्हणून नाव कमावले. तो एक काळ होता, जेव्हा तिला बंदुका, गुंड आणि गालिबच्या गझलांना हुलकावणी देऊन स्वतःची नियती घडवायची होती. मोठ्या कुटुंबाचा गुजारा करायचा होता. शिवाय मुलाला इंग्रजी माध्यमाच्या बोर्डिंग स्कूलमध्ये वाढवायचे होते. या हृदयस्पर्शी आठवणीत, तिने कधीही बेताल न होता आपल्या मुलाजवळ तिच्या जगण्याची भावनांनी ओतप्रोत भरलेली अविश्वसनीय कहाणी प्रामाणिकपणे, औचित्यपूर्ण आणि खेळकर शैलीत कथन केली आहे
-
Ichhamaran Ek Satyakatha (इच्छामरण एक सत्यकथा)
डॉ.भारत लोटे सर हे अतिशय हुशार, निष्णात, शांत, मनमिळावू व प्रेमळ व्यक्तिमत्त्व होते. त्यांना कुणीही आणि कधीही मदतीची हाक मारली तर ते सदैव तत्पर असायचे. अगदी चोवीस तास काम करूनही डॉक्टरांचा चेहरा नेहमी हसरा आणि आनंदी असायचा. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात गरिबांचा डॉक्टर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य त्यांनी खरे करुन दाखविले होते. त्यांच्या याच रुग्णसेवेची पोचपावती म्हणून शासनातर्फे २००५ साली त्यांना मानाच्या आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ज्या व्यक्तीने स्वतः डॉक्टर असताना रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा समजून आपलं संपूर्ण आयुष्य लोकांना वाचवण्यासाठी घालवलं, त्याच व्यक्तीला त्याच्या आजारपणात हॉस्पीटलच्या चुकीच्या ट्रिटमेंटमुळे आणि सरकारच्या मदतीच्या अनास्थेमुळे एवढ्या मोठ्या लोकशाही देशात इच्छा मरण मागावे लागणे यासारखी दुसरी शोकांतिका नाही…
-
Faceless Facebook (फेसलेस फेसबुक)
फेसलेस फेसबुक : हा विस्तीर्ण पोकळीतील कुशल माणसांचा सतेज चेहरा आहे. ज्या दोन हातांनी या विश्वनिर्मितीत मोलाचं योगदान दिलं, त्या हातांचं निर्विवाद प्रतिनिधित्व आहे. लेखकाने शोधलेली माणसं केवळ काळजात कोलाहल करत नाहीत, तर आपलं स्वतंत्र घर करुन राहतात. ज्या माणसांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास काळाच्या ओघात नजरेआड होतो, नेमकी तीच माणसं लेखकाला दिसतात आणि लेखक आपल्यासमोर त्यांचं जग रेखाटतो. 'फेसलेस फेसबुक' मध्ये लिहलेली सगळी पात्रं आपल्या अवतीभोवती खोल रुजलेली आहेत. बन्याचदा ती माणसं आपल्या सगळ्यांची सावलीसुद्धा झालेली आहेत. पण आपल्याकडून ती दुर्लक्षिली गेली आहेत. त्या माणसांच्या सावलीची कृतज्ञता लेखकाने शब्दात व्यक्त केली आहे. मनोरंजनाचा विडा उचललेला सोंगाड्या बालम, जुन्या वस्तूंशी नातं जोडलेला संग्राहक भगवान, चळवळ जिवंत रहावी यासाठी अहोरात्र झगडून मेलेला राजाराम, माय भगिनींच्या सेवेला आयुष्य समर्पित केलेला अमोल, कुस्तीसाठी जगलेला आणि बैलांसाठी राबलेला मल्हारी अशी सगळी पात्रं डोक्यात झिणझिण्या आणून सोडतात. काळजाची तार छेडतात. या सगळ्या माणसांना समाजाने न्याय दिला का ? हा सवाल उभा करतात. या सगळ्यांच्या गोष्टी मांडताना लेखकाने केलेली शब्दफेकिची जादू नक्कीच भुरळ पाडते. त्यामुळे हि पात्रं आपलीशी होऊन जातात. जगण्याच्या खोल तळाशी जाऊन माणसांच्या भावभावनांचा शोध घेतात. गावाकडील माणसांच्या जगण्यातली अस्सलता आणि त्यांच्या अफाट कर्तृत्वाची सर्जनशाळा म्हणजे 'फेसलेस फेसबुक' आहे. मला हे पुस्तक प्रचंड भावलंय. त्यामुळेच गेल्या काही वर्षातला 'व्यक्तिचित्रण' मांडणारा उत्तम लेखक म्हणून मी मारुती शिरतोडे यांच्याकडे पाहतो. शरद तांदळे
-
Inuchi Gosht (इनुची गोष्ट)
एका मजुरी करणाऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेल्या युनुसचा संघर्ष हा आधीच काही कमी नव्हता. वेटर, सेल्समन, सिक्युरिटी गार्ड मिळेल ते काम करत, तो पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत अन् सोबत अधिकारी होण्याचं स्वप्नही बाळगून होता. अशात त्याच्या आयुष्यात नियतीने कॅन्सररुपी घाला घातला. आता इनु मरणार या विचाराने अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. पण आपल्या इनुकडे लढण्याची अन् आईला सुखाचे दिवस दाखविण्याची उमेदच निराळी होती. आईच्या चेहऱ्याकडे आणि संघर्षाकडे पाहून त्याला जगण्याची नवी उमेद मिळाली. आर्थिक तसेच बाकीच्या असंख्य अडचणी, त्यात अनेक असाध्य रोग एकाच वेळी त्याला झाले, अगदी मृत्यूच्या जवळ पोहोचूनही अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहण्याचा चंग बांधलेल्या इनुने हिंमतीने कॅन्सरवर मात केली. त्याची ही मात फक्त असाध्य आजार झालेल्यांनाच नाही तर माझ्यासारख्या अनेकांना आयुष्याकडे बघण्याची नवीन उमेद आणि दृष्टी तर देतेच पण कोणत्याही परिस्थितीशी लढणाऱ्या प्रत्येकाने स्वानुभव असलेली 'इनुची गोष्ट' वाचावी आणि अंर्तमनात सांगवं की संघर्ष मान्य आहे "कारण अजून मी जिंवत आहे..."
-
Vihirichi Mulgi (विहिरीची मुलगी)
कादंबरी कशाबद्दल आहे ? तर एका बावीस तेवीस वर्षाच्या बंडखोर मुलीची ही कहाणी. या वयात एक विश्वास असतो की मी म्हणेल ते बरोबर, माझ्या आयुष्याचा निर्णय मीच घेणार. तारुण्याच्या उत्साहात आपण आयुष्य घडवायला पाहतो. सगळं व्यवस्थित चाललं आहे म्हणतानाच अचानक सगळे गड किल्ले कोसळतात आणि सोबत आपणही भुइसपाट होऊन जातो. हे कोसळणे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडतेच. पण या पडझडीनंतर पुन्हा स्वतःला उभं करताना, कोणती मूल्यव्यवस्था कामी येते, कोण आपल्याला आधार देतं आणि जगाला सामोरं जात असतानाच स्वतःला ही पुन्हा एकवार कसं समर्थ बनवायचं, अशा प्रकारची ही एका तरुणीची कथा आहे. तरुणीची यासाठी, कारण आपल्या समाजात पुरुष आणि स्त्री हा भेदभाव आजही पाहायला मिळतो. पुरुषांना जे अनेक प्रकारचे स्वातंत्र्य सहज मिळते, स्त्रीची मात्र प्रत्येक ठिकाणी अडवणूक केली जाते. कधी इतर लोक तिला बंधने घालतात तर कधी ती स्वतः च हरवलेल्या आत्मविश्वासामुळे स्वतः ला गमावून बसते. तर भेदभाव करणारी ही समाजव्यवस्था समजून घेत, तिच्यासमोर एक मुलगी कशी स्वतःचे विश्व घडवू शकते, या आत्मशोधाची ही कादंबरी आहे. अनेक वर्षे पुरुष त्यांच्या नजरेतून आपल्याला स्त्रियांची कहाणी सांगत राहिले. पण या पुस्तकात मात्र स्वतः स्त्रीच्या नजरेतून नायिकेची कहाणी सांगितली आहे. तिच्या मनासकट आणि शरीरासकटसुद्धा. ज्या गोष्टी बोलायच्या नाहीत हे सांगितले जाते, त्याच गोष्टी बोलून, बदल घडवून आणायची आशा आहे.
-
when my father...(व्हेन माय फादर...!)
नात्यांची झापडं डोळ्यावर ओढून बसलेल्या समाजाला नात्यांपलीकडे बघण्यासाठी भाग पाडणारी कादंबरी. माणूस विकारांसह जगत आला आहे आणि विकृत वागत आला आहे. बालकांचे लैंगिक शोषण ही सामाजिक समस्या तशी जुनीच आहे. वर्तमान काळ त्याला अपवाद नाही. आपण रोजच तशा बातम्या पाहत असतो, ऐकत असतो, वाचतो. मात्र; या विषयावर व्यक्त होणे टाळतो. बाललैंगिक शोषणाच्या बहुतांश घटनांमध्ये अपराधी ओळखीतला किंवा कुटुंबातलाच असतो. कधी अगदी जवळच्या नात्यातला तर कधी अगदी सख्खा बाप सुद्धा. अशावेळी प्रत्येक आईने कादंबरीतल्या नायिकेच्या आईप्रमाणे कणखर बनून आपल्या लहानग्यांना समजून घेणं अपेक्षित आहे.
-
Case No: 533/2007 (कोइ नं ५३३-२००७)
जेव्हा भूतकाळात गढून जाते सत्य, हतबल होते माणुसकी, बुडून जाते न्यायव्यवस्था आणि उद्ध्वस्त होते खरे प्रेम. तेव्हा उभी राहते ती नियती. निर्माण होतो एक तटस्थ नायक आणि घटीत होतात त्याच्या आयुष्यात अकल्पित, अनाकलनीय अशा घटना. मग सुरु होतो पाठलाग अनेक रहस्यांचा. काळाच्या पडद्याआड लपलेल्या अमानुषतेवर खरंच नियतीच करेल काय योग्य न्याय?