-
Rebel Sultans (रिबेल सुलतांस)
रिबेल सुलतान्स हे एक नेत्रदीपक कथन आहे. पिल्लई यांनी आपल्या अत्यंत प्रभावी अशा कल्पनाशक्तीचा आणि उत्तुंग शब्दप्रतिभेचा वापर करून एक अस्सल थरारक पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक एकदा वाचायला सुरुवात केल्यावर संपल्याशिवाय थांबणे अशक्य आहे.- इंडियन एक्सप्रेस आपल्या प्रतिभासंपन्न आणि रसाळ शैलीने पिल्लई आपल्या वाचकांना मंत्रमुग्ध करतात...- द हिंदू रिबेल सुलतान्स, या पुस्तकामध्ये मनु पिल्लई यांनी तेराव्या शतकाच्या अंतापासून अठराव्या शतकाच्या आरंभापर्यंतची दख्खनची कथा सांगितली आहे. यात रंजक कथा आणि लक्षवेधी पात्रं यांची रेलचेल आहे. हे पुस्तक आपल्याला अल्लाऊद्दीन खिल्जीच्या युगापासून शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंतचा प्रवास घडवते. त्या काळी दख्खन ही चमत्कारांना प्रेरणा देणारी भूमी होती. इथल्या खजिन्यांची, राजेलोकांची ख्याती दूरवर पसरली होती. ही भूमी समुद्रापल्याडच्या प्रतिभावंतांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत होती. दख्खन हे आवेशपूर्ण धाडसांचे क्षितिज होते. इथे येणाऱ्या प्रवाश्यांना लष्करात भरती करण्यासाठी उपलब्ध असणारी युरोपिअन नेमबाजांची पथके; हिऱ्यामोत्यांनी सजलेल्या बाजारपेठा पाहायला मिळत. इथल्या दरबारांमध्ये पर्शिअन, मराठे, पोर्तुगीज आणि जॉर्जिअन यांची भरभराट होत होती. दख्खनमध्ये शेकडो भवितव्ये रचली गेली, जी मुघल साम्राज्यांच्या असंख्य पिढ्यांच्या भीतीदायक असूयेस कारणीभूत ठरली. या पुस्तकात आपल्याला विजयनगर साम्राज्याचा नाट्यमय उदय आणि पाडावही पाहायला मिळतो; तसेच त्यांची सत्ता उलथून टाकणाऱ्या बहामनी राजांची आणि बंडखोर सुलतानांची षड्यंत्रेही पाहायला मिळतात. भारताच्या इतिहासातील मंत्रमुग्ध करणाऱ्या या काळाच्या प्रवासात आपल्यासमोर चांदबिबीसारख्या पराक्रमी राणीच्या हत्येसारखे थरारक प्रसंग, हिंदू देवतांची उपासना करणारा इब्राहिम दुसरा, मलिक अंबरसारखा इथिओपिअन सरदार आणि विजयनगरच्या हिरेजडित सिंहासनावर विराजमान झालेला कृष्णदेवराय अशी उल्लेखनीय ऐतिहासिक पात्रेही येतात. मध्ययुगीन भूतकाळातील विस्मरणात गेलेल्या प्रकरणावर प्रकाश टाकताना रिबेल सुलतान्स आपल्याला दख्खनमधील एका वेगळ्या युगाचे आणि एका वेगळ्या काळाचे स्मरण करून देते–एक असे युग ज्याने एका साम्राज्याचा अंत केला आणि भारताचे भविष्य नव्याने लिहिले.