-
Rumi Anandghan (रुमी आनंदघन)
प्रेमाच्या तत्त्वज्ञानाला हळव्या भावनिक नजाकतीचा साज चढवणारा कवी म्हणजे रुमी. या रुमीभोवतीच फिरणारं हे कथानक. नायक स्वप्नात येशूला भेटतो आणि त्याचं आयुष्य पालटून जातं. येशू त्याला आपण गेलेल्या अखेरच्या रस्त्यावरून जाण्यास सांगतो. या दृष्टांतानंतर नायक इटलीवरून थेट जेरुसलेमचा रस्ता पकडतो. तो ही पायी. पण त्याच्या या आध्यात्मिक प्रवासाची वळणवाट वेगळ्याच उत्कंठावर्धक घटनांनी व्यापलेली ठरते. या प्रवासात अचानकच नायकाला रुमीची ओढ लागते. रुमीच्या या शोधप्रवासात जीवनविषयक तत्त्वज्ञानाचं भांडार खुलं होत जातं. आणि हा प्रवास अलौकिकाच्या नव्या वळणावर पोहचते.
-
Amar Hruday (अमर हृदय)
‘अमर हृदय’ (इमॉर्टल हार्ट) या सरदार ओस्कान यांच्या पुस्तकातून अंतरंगातील प्रेमाची अमर शक्ती, प्रत्येकाच्या हृदयातून कसा प्रवास करते व आत्म्याचा अंतर्नाद कसा ऐकायचा, आनंदाच्या बेटावर कसे जायचे? याचं मार्गदर्शन करते. हृदयातील ‘मी-माझं-मला’ या स्वार्थी व संकुचित भावनांच्या राक्षसरूपी भिंती निखळ आयुष्य जगू देत नाहीत. म्हणूनच लेखकाने अंतरंगातील सकारात्मक पैलूंची ओळख मित्रत्वाच्या नात्यांतून डायनाच्या साहसी कथेतून करून दिलेली आहे. अमर हृदयातील निखळ प्रेमाच्या शक्तीचा आपण डोळसपणे, अष्टावधानी राहून शोध घेतला पाहिजे, आणि जीवनात आनंद महोत्सव साजरा केला पाहिजे.
-
Ujale Jagnyacha Deep (उजळे जगण्याचा दीप)
ओमर लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू होतो आणि तो उद्ध्वस्त होतो. पुढे त्याचा सांभाळ त्याचे आजी-आजोबा करतात. जीवनातील निरर्थकता आणि अशाश्वतता त्याला अस्वस्थ करते. ओमर आपल्याला ‘बालक’ आणि ‘प्रौढ’ अशा दोन्ही अवस्थांत भेटत राहतो. एकीकडे ‘मोठा ओमर’ जीवनाला कंटाळून आत्महत्या करू पाहतो, तर त्याच वेळी त्याच्यातील ‘छोटा ओमर’ शाश्वत आनंद प्राप्त करण्यासाठी ‘प्रकाशमय जगाकडे’ जाण्याचा मार्ग शोधतो. या प्रवासात ओमरला त्याचेच प्रतिबिंब असलेला ‘डॉल्फिन ओमर’ भेटतो, देवदूत भेटतो, स्वतः ‘प्रकाश’ झालेला हंस भेटतो आणि मृत्युदूतही. वास्तव आणि स्वप्न यांच्या धूसर सीमेवर घुटमळणारं त्याचं हे दुहेरी भावविश्व आपल्याला काहीसं अंतर्मुख व्हायला लावतं. निरागस स्वप्नरंजनापासून अगदी आध्यात्मिकतेपर्यंतच्या विविध छटा ओमरच्या या जीवन प्रवासात आपल्याला जाणवतात. "
-
October Rains (आक्टोबर रेन्स )
प्रेमाचा रस्ता अहंभावाच्या विरक्तीतून जातो. असाच प्रवास डायना करते. एफेसस, आर्टेमिस आणि मदर मेरीची गोष्ट सांगत सांगत तिची गोष्ट बहरत जाते. तिचा हा प्रवास आहे गुलाबांच्या मातीत मिसळण्याच्या, शून्यत्वाच्या शोधाचा. या शोधातच तिला प्रेम गवसतं. सेरकानसोबतचा तिचा हा प्रवास आत्मानुभूतीच्या मार्गावर नेतो. आणि एकमेकांची भाषाही न जाणणारे हे दोघे जीवनाच्या एकाच सत्यापाशी पोचतात. ते म्हणजे दोघांना स्वतंत्रपणे आकळलेलं प्रेम. मथायसपासून विलग होताना ती ज्या डायना ज्या भावनिक टप्प्यावर असते, ते सारे टप्पे या प्रवासात विलीन होत जातात. आणि माणसातल्या अहंभावासारख्या नकारात्मकेकडे दुर्लक्ष करत डायना निव्वळ स्वीकारभावापर्यंत पोहचते. प्रेमातल्या स्वीकाराच्या सहजभावा मंत्र सांगणारी ही अफलातून कादंबरी.