-
Tufanatalya Panatya (तुफानातल्या पणत्या)
वृषाली मगदूम गेल्या साडेतीन दशकांपासून गरीब, पीडित, शोषित महिलांच्या समस्या सोडविण्याचे काम तळमळीने करीत आहे. डम्पिंग ग्राउंडवर, कौटुंबिक सल्ला केंद्रात, किंवा प्रत्यक्ष वस्तीत गेल्यावर अनेक तऱ्हेच्या समस्या घेऊन महिला येतात. या समस्यांची तड लावल्याशिवाय किंवा न्याय मिळाल्याशिवाय वृषाली स्वस्थ बसत नाही. या पुस्तकातील साऱ्याच कहाण्यांतील नायिका विलक्षण ताकदीच्या आहेत. समोर आशेचा एकही किरण नाही, आयुष्य वाऱ्यावर भिरकावून दिल्यासारखे आहे. वेदना वास्तवाच्या पलीकडच्या आहेत. अशा एका वळणावर अंतस्थ ताकदीला बाहेरच्या ताकदीचं बळ मिळतं. त्या पेटून उठतात, संघर्ष करतात, अगदी तुफानाचाही न डगमगता सामना करतात. वाट्याला आलेलं भागधेय स्वीकारून शांत संयत, चिवटपणे झुंज देत जगणं 'साकार' करत आहेत. स्त्री वर्गाच्या पलीकडे जाऊन व्यापक मानवी जीवनातील दुःख व त्यातून येणारी व्याकुळता यांचा शोध वृषालीची लेखणी घेताना दिसते. --- अजित मगदूम
-
Jina Shoshitanchan (जिणं शोषितांचं)
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षं झाली. त्याचा उत्सवही दिमाखात झाला. परंतु गांधी-नेहरू-आंबेडकर यांच्या स्वप्नातील सामाजिक-आर्थिक न्यायाची गाडी पुढे सरकली का हा प्रश्न उरतोच. नेमक्या याच प्रश्नाला थेट भिडणारं हे पुस्तक आहे. ज्यावेळी एखादा आयएएस अधिकारी ‘मला या शहरात एकही झोपडी नको` असं म्हणतो तेव्हा या लेखिकेची होणारी तगमग काळजाला हात घालते. बलात्कार, बाललैंगिक शोषण, आरोग्याविषयीचे प्रश्न, मुस्लिमांचे सामाजिक, आर्थिक खच्चीकरण अशा प्रश्नांवर जमिनीवर लढतानाचे सजग प्रसंग विलक्षण अस्वस्थ करून जातात. गेल्या साडेतीन दशकांत वृषाली मगदूम यांनी शोषितांच्या प्रश्नाला हात घालत ते धसास लावताना आलेले अनुभव दाहक आहेत, म्हणूनच ते वेधक ठरतात. आपल्याबरोबरच पण आडबाजूला जगणाऱ्या एका समुदायाच्या शोषणाची, हतबलतेची, संघर्षाची ही जिवंत चित्रे तर बोलतातच, पण राज्यकर्ते, प्रशासन आणि समाजाच्या तळातली माणसे यांच्यातले वाढत जाणारे अंतर विदीर्ण करणारे आहे. अशा परिस्थितीत लेखिकेचा हात त्या अंधाऱ्या विश्वाला आश्वासक वाटतो, हे खरे आहे