Jina Shoshitanchan (जिणं शोषितांचं)
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षं झाली. त्याचा उत्सवही दिमाखात झाला. परंतु गांधी-नेहरू-आंबेडकर यांच्या स्वप्नातील सामाजिक-आर्थिक न्यायाची गाडी पुढे सरकली का हा प्रश्न उरतोच. नेमक्या याच प्रश्नाला थेट भिडणारं हे पुस्तक आहे. ज्यावेळी एखादा आयएएस अधिकारी ‘मला या शहरात एकही झोपडी नको` असं म्हणतो तेव्हा या लेखिकेची होणारी तगमग काळजाला हात घालते. बलात्कार, बाललैंगिक शोषण, आरोग्याविषयीचे प्रश्न, मुस्लिमांचे सामाजिक, आर्थिक खच्चीकरण अशा प्रश्नांवर जमिनीवर लढतानाचे सजग प्रसंग विलक्षण अस्वस्थ करून जातात. गेल्या साडेतीन दशकांत वृषाली मगदूम यांनी शोषितांच्या प्रश्नाला हात घालत ते धसास लावताना आलेले अनुभव दाहक आहेत, म्हणूनच ते वेधक ठरतात. आपल्याबरोबरच पण आडबाजूला जगणाऱ्या एका समुदायाच्या शोषणाची, हतबलतेची, संघर्षाची ही जिवंत चित्रे तर बोलतातच, पण राज्यकर्ते, प्रशासन आणि समाजाच्या तळातली माणसे यांच्यातले वाढत जाणारे अंतर विदीर्ण करणारे आहे. अशा परिस्थितीत लेखिकेचा हात त्या अंधाऱ्या विश्वाला आश्वासक वाटतो, हे खरे आहे