-
Mauli (माऊली)
।। माऊली ।। ‘माऊली’ ही अगदीच वेगळी कादंबरी. तिची नायिका आहे एक मांजरी; लेखकाने माया लावलेली. या मायेच्या पसायात लेखकाचे कुटुंबीय, स्नेहीसोबती आणि त्या क्रूर काळ्या बोक्यासह मांजरीचा गोतावळाही समाविष्ट होतो आणि कादंबरीची वीण एक वेगळं रंगरूप घेऊ लागते. यादवांचे निरीक्षण वाचकाला स्तिमित करील असे आहे. हे निरीक्षणच त्यांना एक रस्ता सापडवून देते. स्वत:चे भान शाबूत ठेवून यादव हळूहळू मार्जारविश्वाचा शोध घेऊ लागतात. साधा वाटेल अशा तपशिलाची पेरणी करीत या शोधवाटेने लेखक स्वरक्षण आणि स्ववंशवर्धन या दोन मजबूत पख्यांवर विसावलेल्या निसर्गसिद्ध आदिम प्रेरणेशी वाचकाला नेऊन भिडवतो तेव्हा वाचक पछाडल्यागत होतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याच फक्त अंकित असलेले एक थेट असे नरमादीच्या नात्याचे अस्तित्व न्याहाळताना आदिनिरणाच्या वाटेकडे वळतो. मग मांजरी ही मांजरी राहत नाही; तिथे साकारत जाते आदिमायेचेत्या जगन्माऊलीचे आत्मजन्मा नि आत्मभोगी असे कृतार्थ रुपडे. चिंतनगर्भ जीवनेच्छेचा कलारूप आविष्कार म्हणजे ‘माऊली.’ दार्शनिक तत्त्वज्ञान, लोकसाहित्यपरंपरा, सनातन भारतीय समाजमन यांचा हळुवार आणि तलम स्पर्श झालेली मराठी भाषेतील ही पहिलीच साहित्यकृती असावी, इतकी ती वेगळी आहे. – प्रा. अरविंद वामन कुलकर्णी
-
Ukhadleli Zade(उखडलेली झाडे)
उखडलेली झाडे` या संग्रहात आनंद यादवांची कथा विकासाच्या एका विशिष्ट टप्प्यावर भेटते. ग्रामीण भागातील वर्तमान वास्तवाचे, समाज मनाचे, शहर व खेडे यांच्या अनेकविध संबंधांचे यादवांचे भान इथे प्रखर आणि मर्मभेदी झालेले जाणवते. ग्रामीण भागात सुधारणांच्या हेतूने आलेले शिक्षण, उद्योगीकरण, विकास योजना, पाणी योजना, पंचायतपरिषदा, ग्रामविकास, शेतीविकास इत्यादींचा ग्रामीण जीवनावर प्रत्यक्षात कसा विपरीत आणि विकृत परिणाम होत चालला आहे आणि त्यात सगळा अधस्तरीय ग्रामीण समाजच कसा पिळून, भरडून निघत आहे, कायमचा उखडला जात आहे याचे अस्वस्थ करणारे अतिशय कलात्म दर्शन ते घडवीत आहेत. याचबरोबर एकूण मराठी समाजातील जाती-वर्गांचे परस्पर संबंध, शहर आणि खेडे, बुद्धीजीवी मध्यम वर्ग यांचे सांस्कृतिक नातेही ते शोधू पाहत आहेत. त्यांचा हा संग्रह म्हणजे `वर्तमान मराठी खेड्यावरचे` आणि त्या संदर्भात एकूणच मराठी समाजावरचे प्रातिनिधिक भाष्य वाटावा, अशा योग्यतेचा आहे. - डॉ. दत्तात्रय पुंडे.
-
Panbhavare (पाणभवरे)
‘पाणभवरे’ मधील ‘मी’चे लक्षात घेण्याजोगे वैशिष्ट्य हे की, हा ‘मी’ आत्मचरित्रात्मक असूनही तो आपल्या नजरेत कधीच खुपत नाही. जे उघडउघड आत्मचरित्रात्मक, ते आत्मप्रदर्शनात्मक होण्याची भीती असते. अलिकडच्या आत्मचरित्रात्मक लेखनातून अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. यादवांच्या लेखनात आत्मप्रदर्शनाचा हा भाव किंचितही आढळत नाही. या ‘मी’चे व्यक्तित्व भडक नाही. ते लाजरे, बुजरे, पापभीरू, माणसांवर नितांत प्रेम करणारे, निर्सगाची विलक्षण ओढ असणारे आहे. यादव जीवनानुभवाचे दर्शन घडवीत असताना कलार्थाने ‘मी’ला विसरतात. शिवाय लेखनात बदलत्या वास्तवाचे भान आहे. आधुनिक जीवनातील मानसिक गुंतागुंत आहे. सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेतल्यावरही क्षणोक्षणी जाणवणारी असुरक्षितता आहे, धपापलेपण आहे. सामान्य माणसाची दैनंदिन जीवनातली साशंक भीती आहे. यांत्रिक जीवनातली कृत्रिमता आहे. पांढरपेशी प्रतिष्ठा जपताना होणारी मनाची तगमग आहे. संस्कारांची गिरवलेली, न पुसली जाणारी वलये आहेत. वास्तवाचे निदान करणारी शोधदृष्टी आहे. तरल, भावस्पर्शी संवेदनेची वीण आहे. यांत्रिकतेने जखडलेल्या शहरातील हे विविध अनुभव, आज माणसाला प्राप्त झालेल्या ‘प्रलयपुरातील बाहुली’च्या स्वरूपाची जाणीव करून देतात... संवेदना, काव्यात्मता, तरलता, अनुभवातील चैतन्य यादवांची भाषा उत्तमपणे पेलू शकते, असा अनुभव या लेखनामधून येतो. (आलोचना)
-
Aadital.. (आदिताल)
‘पृथ्वीवर येणाऱ्या युगारंभीच्या पहिल्या वसंत ऋतूच्या पाऊलस्पर्शासारखी ती त्याला भासली. तिचं धडधडतं हृदय त्याच्या कानापाशी होतं... जगाच्या आरंभी सुरू झालेला ताल. काळाला स्पर्श करत सतत युगानुयुगे सनातनपणे चाललेला धिनतिक. या तालातूनच निर्माण झालेली सृष्टीची लयकारी... त्याला आदिताल सापडल्यासारखं वाटलं.’
-
Ugvati Mane (उगवती मने)
मानवी जीवनात ‘मूल’ या घटनेला एक अजोड स्थान आहे. वंशसातत्याचं मूळ रुजणं म्हणजे मूल असणं. मूळ म्हणजेच मूल. ते असेल तरच संसारवृक्ष बहरतो, फुलतो आणि फळाला येतो. नसेल तर कोमेजतो, वाळतो, निष्पर्ण होऊन शेवटी नष्ट होतो. मूल असणं म्हणजे स्वत:च पुन्हा नव्यानं जन्माला येणं. नवं शरीर, नवं मन घेऊन पुन्हा जगण्यास प्रारंभ करणं. कुणाचं तरी आईबाप, बहीणभाऊ होऊन जगणं, हे आपल्या सड्याफटिंग, एकट्या जगण्यापेक्षा किती वेगळं असतं, याचे पडताळे येऊन आपण रसिक इथं थरारून जातो; समृद्धही होतो.
-
Bhumikanya (भूमिकन्या)
ह्या कथा जनसामान्य स्तरातील स्त्रीचे सर्वांगीण दर्शन घडविणाऱ्या, वास्तवाचे प्रखर भान असलेल्या, आशयसमृद्ध आणि कलासंपन्न स्वरूपाच्या आहेत. भूमिकन्यांचे शोषण त्यांच्या जन्मापासूनच सुरू असते. "मुलगी जन्मल्याचे" दु:ख घरादाराला मनोमन होते. तेव्हापासूनच मुलगीच्या आयुष्याची काळजी तिच्या आईला विशेष घेरते. अपुऱ्या जीवनसुविधांच्या कुटुंबात तर बालिका, कुमारी, युवती, गृहिणी, वृद्धा या सर्वांनाच अपुरेपणाची, अभावग्रस्ततेची आणि त्यामुळे होणाऱ्या मानसिक व शारीरिक उपासमारीची झळ सतत आणि जास्तीत जास्त सोसावी लागते.
-
Khalal (खळाळ)
आनंद यादव यांनी कथालेखनाला प्रारंभ केला तेव्हा त्यांची बरीचशी काव्यरचना झालेली होती. कविप्रकृतीचे ग्रामीण कथाकार असा त्यांचा पिंड बनला. त्यांची ग्रामीण जीवनाची आत्मानुभूती, दीनदुबळ्यांबद्दलची कणव, मातीची ओढ हे सर्व गुण जातिवंत व कसदार होते पण त्याचबरोबर गुणांना व जाणिवेला कलात्मक संघटन व आकार प्राप्त करून द्यावा असा उत्कट ध्यासही त्यांना होता. या कलात्मकतेसाठी ग्रामीण बोली भाषेच्या सामथ्र्यांची कसोशीने व कल्पकतेने उकल करावी असे त्यांच्या मनाने घेतले. या तन्मयतेत व तंद्रीत खोलवर शिरताना चिंतनालाच एक नाद व लय असते याचा शोध त्यांना लागला. या शोधाच्या आधारे ग्रामीण दु:खाच्या चिंतनात्मक निवेदनाचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्यांनी आपल्या कथांतून केला. या प्रयोगातून ग्रामीण जीवनाचे जे दर्शन घडले ते अभिनव, रोमांचकारी वाटले. मराठी ग्रामीण कथेच्या विकासातला हा महत्त्वाचा टप्पा आहे....’’ प्रा.म.द. हातकणंगलेकर
-
Saprshkamale (स्पर्शकमळे)
शृंगारिक वाङ्मयात स्त्रीला भोगलालसेच्या पलीकडे आणखी एक नितान्तसुंदर अस्तित्व असते. आस्वादाच्या पातळीवर तिच्या अस्तित्वाचे रूपसौंदर्य अनुभवता येते. आस्वादाच्या पातळीवर स्त्रीचे विविध रूपांतील सौंदर्य आविष्कृत करावे, या प्रेरणेने या संग्रहातील ललितलेख लिहिले आहेत. कधी ती बालअप्सरेच्या रूपात भेटेल, तर यौवनमुग्ध, ललितगात्रा मदनिकेच्या स्वरूपात जाणवेल, कधी ती नऊवारीतील खानदानी, कुलीन स्त्री होऊन येईल, तर कधी सहावारीतील धीट, नागर ललना होऊन भेटेल; आणि कधी आदिमायेच्या मूलभूत रूपात सखी, प्रिया, पत्नी, जननी यांसारख्या विविध नात्यांनी पुरुषाचा सांभाळ करणारी दैवी शक्तीही असेल. स्त्रीची अशी अनेकविध रूपे जेव्हा रसिक पुरुषमनाला सामोरी येतात, तेव्हाच असे ‘स्पर्शकमळे’ मधील शृंगारसमृद्ध ललित लेख घडतात.
-
Dr. Anand Yadav -Ek Sahityik Pravas (डॉ. आनंद यादव
आनंद यादव यांची प्रत्येक कलाकृती लोकप्रिय ठरली. असे असले तरी स्वतःत न रमता, त्यांनी आपुलकीने अनेक नवोदित लेखकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या लेखनाला प्रोत्साहन दिले; ग्रामीण साहित्य चळवळ केली नि त्या बाबतीत सामाजिक धुरा आपल्या खांद्यावर घेतली. यादव यांची ही सामाजिक बांधिलकी मोठी आहे. ‘कलावंत केवळ स्वतःत रमणारा असतो,’ या विधानाला यादव अपवाद आहेत. साहित्यदिंडीतील प्रत्येक वारकरऱ्याला त्यांनी आपल्यात सामावून घेतले. त्यामुळे साहित्यरसिकांनी त्यांना संतपद दिले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना मोठ्या संख्येने मतं देऊन निवडले. यादव यांना मिळालेली लोकमान्यता सहन न होऊन काही मतलबी व्यक्तींनी कुटिल राजकारण केले. वैचारिक वाद ही हिंदू संस्कृती आहे; परंतु हे वाद हिंसक पातळीवर नेण्यात आले. यादव या साहित्यसंमेलनासाठी येऊ शकले नाहीत. ही या समाजाची शोकांतिका आहे. प्रतिभावंतांना या गोष्टींविषयी जीवनात ना खंत, ना खेद राहतो. त्यांच्या दृष्टीने धरला. स्वतःच्या कथा, कविता, कादंबऱ्यामधून त्यांनी बोली भाषेतून निवेदन व संवादलेखन केले. स्वतंत्र लेख लिहून त्यांनी बोली भाषेचे सामथ्र्य जाणकारांच्या लक्षात आणून दिले. यादव यांच्या या कृतीमुळे मराठी ग्रामीण साहित्याला नवे परिमाण प्राप्त झाले. अनेक ग्रामीण लेखकांनी आपल्या बोली भाषेतून साहित्यकृती निर्मिण्यास सुरुवात केली. आजही ही परंपरा सुरू आहे. ‘मराठी ग्रामीण साहित्याची चळवळ’ सुरू करून यादव यांनी ग्रामीण जीवनाचे मराठी साहित्यातून होणारे कृतक दर्शन नाकारले. विविध पातळ्यांवर होणारी ग्रामीण लेखकांची कोंडी फोडली. त्यांच्या लेखनाला वाङ्मयीन दृष्टी प्राप्त करून दिली.
-
Zadvata (झाडवाटा)
कथा ही विविध रूपांनी जशी अवरत असते, तशी मानवी जीवनाची विविध अंगोपांगे ती धुंडाळत असते. तिला कोणतेही मानवी जीवन वर्ज्य नसते. असे असले, तरी त्या कथेच्या निर्मात्या लेखकाच्या वाट्याला विशिष्ट जीवन आलेले असते. त्या विशिष्ट जीवनातील अनेक अनुभवांना आणि त्यांच्या घटकांना तो आपल्या कथेत साकार करत असतो. पण गमतीची गोष्ट अशी, की त्या विशिष्ट घटनाप्रसंगांच्या पदरांना धरून तो विश्वात्मक मानवी जीवन-सत्याचा वेध घेतो. त्यामुळे कथेचा अनुभवाकार, कथेचे शरीर विशिष्ट असले, तरी त्या कथेचा आत्मा, आशय विश्वात्मक असतो. कलात्मक कथेचा हा गुणविशेष असतो. आनंद यादवांच्या 'झाडवाटा’मध्ये याचा प्रत्यय येतो. ते 'झाडवाटा’ धुंडाळत असले, त्या वाटांवरील अनुभव व्यक्त करत असले, तरी त्या कथांचा आशय, आत्मा मात्र सर्वच मानवी मनांना आपलासा वाटतो. 'झाडवाटा’ची ही किमया पानोपानी अनुभवाला येते.
-
Gharjavai ( घरजावई)
सामान्य माणूस जगण्यासाठी धडपडत असतो. पुष्कळ वेळा ही धडपड केविलवाणी होते; आणि ती पाहण्यार्याला हसू येते. अनेकदा माणूस आपल्या भोवतालच्या परिस्थितीत जगण्याच्या हेतूने सुसंगती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्या नकळत विसंगती निर्माण होऊन बसते. त्यामुळेही तो हास्यास्पद ठरतो. अशा विनोदाला कारुण्याची एक झाक असते. पुष्कळ वेळा बेरकी माणसे स्वार्थासाठी इतरांना अनपेक्षितपणे चकवतात, हास्यास्पद बनवतात. तटस्थपणे पाहणार्याला त्यांच्या गावरान चलाखपणाचे कौतुक वाटते. तो बेरकीपणा पाहून मन चकित होते. क्षणभर ओठांवर हसू फुटते. अतिशयोक्ती हा तर विनोदाचा आत्माच असतो. आनंद यादवांच्या प्रस्तुत संग्रहातील कथांतून जो विनोद निर्माण होतो, तो या स्वरूपाचा आहे. तो भाषानिष्ठ किंवा कोटिक्रमनिष्ठ नसून, प्रामुख्याने जीवननिष्ठ आहे. या कथांचा आशयच त्यामुळे विनोदयुक्त आहे. भेटणार्या व्यक्ती, घडणार्या घटना, निर्माण झालेली विपरीत स्थिती यांतून तो आकाराला येतो. त्यामुळे तो प्रसन्न आणि दिलखुलास; तरीही समाजातील विविध प्रवृत्तींवर प्रकाश टाकणारा वाटतो.
-
Nangarni (नांगरणी)
प्रत्येकाची आपली अशी एक वाट असते. काहींची सरळ, धोपट, काहीची वळणावळणांची अडीअडचणींची लेखकाचीही आपली एक वाट काट्याकुट्यांनी भरलेली. दगडधोंडे आडवे येणारी. तरीही पुढे जायला प्रवृत्त करणारी. पुढे जायचंच या कल्पनेने झपाटलेला जीव काटेरी मार्गाची वाट त्या झपाटलेपणामुळं सहज पार करतो. आणि इच्छा आकांक्षांची पूर्ती; हवं ते मिळवल्याचं मनभरून राहिलेल्या समाधानानं, तृप्तीनं मागं वळून बघतानाचा क्षण, आयुष्याच्या वळत्या वाटेवरचं उमलण्याच्या कल्पनेनं झपाटणं, फुलार, बहरणं, आठवणींचे दवबिंदू पानावरून ओघळले तरी पानांच्या अंगोपांगी असलेलं ओलेपण जपणार्या स्मृतीची सहज उलगड जाणारी मालिका म्हणजे नांगरणी एस. एस. सी. पूर्वीचा काळ यादवांच्या 'झोंबी’मध्ये चित्रित झाला आहे. नांगरणी मध्ये त्या पुढील कॉलेज शिक्षणाचा काळ आला आहे. व्यक्तीत्वाचं रोपटं बहरावं म्हणून परिस्थितीच्या मातीची मशागत करताना, संकटाची तण उपटून फेकताना आलेले कडू गोड अनुभव, सहज सुलभ शैलीत मांडण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केलेला आहे. झोंबीपेक्षा नांगरणीतला लेखकाचा दृष्टीकोन अधिक व्यापक आहे. प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात उभा असलेला लेखक हा नांगरणीचा गाभा आहे. सहजसुलभतेने उलगडत जाणारी उत्कट आत्मकथा !
-
Matikhalchi Mati ( मातीखालची माती )
ग्रामीण जीवनातील हे विविध दर्शन अस्सल शैलीतला हा आविष्कार. मातीवर उगवलेल्या कोवळ्या अंकुराइतकीच लेखकाच्या मनाला मातीतल्या गहिर्या थरांची ओढ लागली आहे. ही विविध व्यक्तिचित्रे संवेदनशील मनाने टिपली आहेत. यातला प्रत्येक माणूस जिताजागता वाटतो... आणि त्यासोबत वाचकांच्या मनालाही अंकुर फुटतो. सभोवारच्या माणसांचेही 'माणूसपण’ त्याच्या मनाला जाणवू लागते. ती जाणीव मनातल्या मातीत रुजते, बहरते. असे हे जिवंत पुस्तक आणखीही खूपसे पालवून जाते !
-
Davrani ( डवरणी )
विविध मानवी स्वभावांचा मार्मिक वेध, बदलत्या खेड्याचे अंतर-स्पर्शी सूक्ष्म तणाव, समाजाच्या आणि व्यक्तींच्या जीवनातील विपरीत नाट्य, सखोल गहिरे कारुण्य, उत्कट काव्यात्मकता, ग्रामीण शृंगार आणि अनघड पौरुष, स्पंदनशील मनाची प्रतिमायुक्त चिंतने आणि चैतन्यपूर्ण लवचिक भाषा यांनी यादवांची कथा इथे डवरलेली आहे. कलात्मकतेचे आणि सच्च्या सामाजिकतेचे संयमी भान त्यांनी या कथांतून सहजतेने सांभाळलेले जाणवते.
-
Sahityikacha Gaon (साहित्यिकाचा गाव)
समाजात वावरणारं साहित्यिकाचं मन सामान्यांपेक्षा अधिक संवेदनशील,चिंतनशील आणि भावनाशील असतं. त्यामुळं इतरांना साध्या वाटणार्या घटनाही साहित्यिकाला मात्र सामाजिकदृष्ट्या अधिक अर्थपूर्ण वाटतात. त्यांच्यावर तो अधिक गंभीरपणे चिंतन करतो. त्याच्या भावनाशील मनाला त्या अधिक खोलवर भिडतात. पुष्कळ वेळा पारंपरिक संदर्भ असलेल्या, सणादी सांस्कृतिक संदर्भ असलेल्या नेहमीच्या घटनांचा महत्त्वाचा उदात्त संदर्भ जनलोक हरवतात. त्यामुळे त्या सणांना विकृती, विपरीत गती प्राप्त झालेली असते. त्या विकृति-विपरीत गतीच्या पलीकडे जाणीवपूर्वक जाऊन त्या सणांचे मूळ जन्म-प्रयोजन शोधते. प्रयोजन कळले की साधे सणही श्रीमंत आणि जिवंत वाटू लागतात. मग ते हवेहवेसे वाटू लागतात. त्यांचे जिवलग, घनिष्ठ नाते संस्कार हरवलेल्या आपल्या मनाला कळते आणि मनही सजग, समृद्ध होते. चांगल्या साहित्याच्या निर्मितीच्या प्रत्यक्षातील जन्मखुणा, घटना-स्थळे यांच्याविषयीची जिज्ञासा सुजाण-सुशिक्षित माणसाला सतत असते. त्या जिज्ञासापूर्तीमुळे साहित्यकृतींची जन्मरहस्ये कळतात, जन्मदात्या साहित्यिकाच्या वृत्ती-प्रवृत्ती समजतात. जिज्ञासापूतीचा निखळ आनंद मिळतो. प्रस्तुत संग्रहात याच (समाज, संस्कृती आणि साहित्य) तीन पैलूंवर आधारित लालित्यपूर्ण शब्दशिल्पे आणि रंगचित्रे समाविष्ट आहेत. रसिकांना ती अंतर्मुख करतील, जगण्याचे उत्कट क्षण देतील, अनुभवसमृद्ध करतील.
-
Lokskha Dnyaneshwar ( लोकसखा ज्ञानेश्वर )
स्वजातीतून कायमचे बहिष्कृत केलेल्या मातापित्यांच्या पोटी जन्माला येऊनही आत्मविश्वासाच्या जोरावर स्वकर्तृत्वाने जीवनाचे सोने करणारा, शेकडो वर्षे सोवळ्या वर्णवर्चस्ववाद्यांनी कर्मकांडात्मक ज्ञानाच्या आणि धर्माधिकाराच्या आधारे शोषण करत उपेक्षित ठेवलेल्या जनसामान्यांच्या समाजाला विधायक नेतृत्व देणारा डोळस नेता, बहुजन समाजाच्या सांस्कृतिक जीवनाला अर्थपूर्ण प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा द्रष्टा, ब्राह्मणापासून भटक्यापर्यंतच्या सर्व समाजाचे कल्याण साधणारे तत्त्वज्ञान निर्माण करणारा ऋषितुल्य तत्त्वज्ञ, निरनिराळ्या जातिजमातींतून संत-संघटक निर्माण करू पाहणारा आणि त्या सर्वांना एकत्र आणून त्यांना आध्यात्मिक शक्तीचे बल बहाल करणारा महात्मा, वर्ण, जाती, कुल इत्यादी भेदभावांच्या, उच्चनीचतेच्या भिंती खिळखिळ्या करू पाहणारा आणि नवसमाज घडवू पाहणारा क्रियावान सुधारक, जनसामान्यांच्या प्राकृत बोलीला साहित्यसिंहासनावर स्वकर्तृत्वाने बसवू पाहणारा श्रेष्ठ साहित्यिक ... म्हणजे 'लोकसखा ज्ञानेश्वर’ !
-
Kachvel ( काचवेल )
सुप्रसिद्ध लेखक आनंद यादव ह्यांच्या संकलित आत्मचरित्रात्मक लेखनाच्या झोंबी, नांगरणी, घरभिंतीनंतरचा हा अखेरचा टप्पा. ह्या लेखनाची पहिली आवृत्ती १९९७ मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. जवळजवळ तोपर्यंतच्या तत्पूर्वीच्या त्यांच्या जीवनातील वीस-एक वर्षांचा कालखंड ह्या लेखनात आला आहे. म्हणजे जीवनसंघर्षाचा हा उत्तरार्ध आहे. त्यात काहीशी जीवनस्थिरताही आहे. आणि भविष्यवेधही. यादव प्रतिकूलतेतून अनुकूलतेत आले आहेत आणि वाचकांनी भरभरून दाद दिली असे त्यांचे लेखनही झाले आहे, यादव नुसते लिहीत बसले नाहीत तर साहित्यविश्वही ढवळून काढले आहे. त्याचे मनोज्ञ दर्शन ह्या लेखनात घडते आहे. जे आपण बघितले, अनुभवले ते नेमके काय ह्याचा आनंद देणारे हे आनंद यादव ह्यांचे लेखन आहे. सोप्याच्या भुईवर ग्रामीण भागात काकणांच्या काचकुड्यांनी 'काचवेल’ काढण्याची एक लोकप्रथा आहे. ग्रामीण भागातून आलेल्या आनंद यादव हयांनीही आपल्या स्वकहाणीबद्दल हे असेच 'मनोहर’ काम केले आहे.