Khalal (खळाळ)
आनंद यादव यांनी कथालेखनाला प्रारंभ केला तेव्हा त्यांची बरीचशी काव्यरचना झालेली होती. कविप्रकृतीचे ग्रामीण कथाकार असा त्यांचा पिंड बनला. त्यांची ग्रामीण जीवनाची आत्मानुभूती, दीनदुबळ्यांबद्दलची कणव, मातीची ओढ हे सर्व गुण जातिवंत व कसदार होते पण त्याचबरोबर गुणांना व जाणिवेला कलात्मक संघटन व आकार प्राप्त करून द्यावा असा उत्कट ध्यासही त्यांना होता. या कलात्मकतेसाठी ग्रामीण बोली भाषेच्या सामथ्र्यांची कसोशीने व कल्पकतेने उकल करावी असे त्यांच्या मनाने घेतले. या तन्मयतेत व तंद्रीत खोलवर शिरताना चिंतनालाच एक नाद व लय असते याचा शोध त्यांना लागला. या शोधाच्या आधारे ग्रामीण दु:खाच्या चिंतनात्मक निवेदनाचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्यांनी आपल्या कथांतून केला. या प्रयोगातून ग्रामीण जीवनाचे जे दर्शन घडले ते अभिनव, रोमांचकारी वाटले. मराठी ग्रामीण कथेच्या विकासातला हा महत्त्वाचा टप्पा आहे....’’ प्रा.म.द. हातकणंगलेकर