Kachvel ( काचवेल )
सुप्रसिद्ध लेखक आनंद यादव ह्यांच्या संकलित आत्मचरित्रात्मक लेखनाच्या झोंबी, नांगरणी, घरभिंतीनंतरचा हा अखेरचा टप्पा. ह्या लेखनाची पहिली आवृत्ती १९९७ मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. जवळजवळ तोपर्यंतच्या तत्पूर्वीच्या त्यांच्या जीवनातील वीस-एक वर्षांचा कालखंड ह्या लेखनात आला आहे. म्हणजे जीवनसंघर्षाचा हा उत्तरार्ध आहे. त्यात काहीशी जीवनस्थिरताही आहे. आणि भविष्यवेधही. यादव प्रतिकूलतेतून अनुकूलतेत आले आहेत आणि वाचकांनी भरभरून दाद दिली असे त्यांचे लेखनही झाले आहे, यादव नुसते लिहीत बसले नाहीत तर साहित्यविश्वही ढवळून काढले आहे. त्याचे मनोज्ञ दर्शन ह्या लेखनात घडते आहे. जे आपण बघितले, अनुभवले ते नेमके काय ह्याचा आनंद देणारे हे आनंद यादव ह्यांचे लेखन आहे. सोप्याच्या भुईवर ग्रामीण भागात काकणांच्या काचकुड्यांनी 'काचवेल’ काढण्याची एक लोकप्रथा आहे. ग्रामीण भागातून आलेल्या आनंद यादव हयांनीही आपल्या स्वकहाणीबद्दल हे असेच 'मनोहर’ काम केले आहे.