-
Raj Kapoor :The Master At Work (राज कपूर: दि मास्ट
राहुल रखैल हे माझ्या वडलांचे घनिष्ट मित्र, माझे आवडते दिग्दर्शक आणि माझे आजोबा राज कपूर यांचे साहाय्यक-दिग्दर्शक. माझ्या आजोबांनी त्यांच्या अल्पशा पण दर्जात्मकदृष्ट्या श्रेष्ठ अशा जीवनकालात कोणता अनमोल कलात्मक वारसा मागे ठेवला आहे, याची जाणीव या पुस्तकाने मला करून दिली. -रणबीर कपूर राज कपूर यांच्या अवघ्या प्रतिभेची उकल करून दाखवणारं हे पुस्तक आहे. त्यांच्या चित्रपटांतील गीतं गाण्याचा बहुमान मला लाभला होता. त्यांची संगीताची सखोल समज आणि त्यांचं त्याबाबतचं आकलन असं सर्व मला नेहमीच अचंबित करत असे. गाणं कसं चित्रित केलं जाणार आहे आणि त्यांच्या गाण्याबाबत काय अपेक्षा आहेत, हे सर्व ते एक दिग्दर्शक या नात्याने अत्यंत खोलात जाऊन आम्हाला समजावून सांगत असत. -लता मंगेशकर राज कपूर यांचं वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन, त्यांचे चित्रपट आणि त्यांचं स्वतःचं एक विश्व याबाबत विस्मयकारक अंतर्दृष्टी देणारं असं हे पुस्तक… आणि त्यांच्यासोबत काम केलेल्या व्यक्तीनेच ते लिहिलेलं असल्याने ते वाचताना खिळवून ठेवतं. -राजकुमार हिरानी मला राहुल रवैल यांचा हेवा वाटतो… हे पुस्तक वाचल्यावर मला असं वाटून गेलं की, ‘मूव्ही मसीहा’ राज कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी मला आयुष्यात एकदा तरी मिळायला हवी होती. त्यांच्या आजूबाजूला राहिल्यानेच समृद्ध करणारे त्यांचे गुण, त्यांची उत्कटता राहुलजी आत्मसात करू शकले. राहुलजींच्या या प्रवासात जरूर सहभागी व्हा. मला खात्री आहे की, तुम्हीही माझ्यासारखाच आनंद अनुभवाल. -रमेश सिप्पी
-
Bhartatil Davya Chalvalincha Magova (भारतातील डाव
लोकशाही सुदृढ व्हायची तर जनसामान्यांना देशात प्रदीर्घ काळ टिकून असलेल्या लोकाभिमुख विचारप्रवाहांची, चळवळींची सर्वांगीण माहिती असणं आवश्यक असतं... या पुस्तकात भारतातील गेल्या १०० वर्षांतील डाव्या चळवळींचा आढावा घेण्यात आला आहे. हे पुस्तक त्याविषयी केवळ समग्र माहिती देणारं नाही, तर त्याबद्दलचं वाचकांना सर्वांगीण आकलन साध्य व्हावं, या कळकळीने लिहिलेलं आहे. उदाहरणार्थ, या पुस्तकात प्रफुल्ल बिडवई यांनी केवळ डाव्या संसदीय पक्षांच्या निवडणुकीतील (लोकसभा, विधानसभा) कामगिरीचा आढावा घेतलेला नाही; तर त्या त्या वेळी विविध पुरोगामी जनसंघटनांच्या चळवळींनी वेâलेली कामगिरी, अशा निवडणुकींमध्ये कोणते मुद्दे महत्त्वाच होते, विविध राजकीय शक्तींचं आणि समाजातील घटकांचं संघटन कसं केलं गेलं (डावे, मध्यममार्गी आणि प्रस्थापित उजवे पक्ष, सर्वांद्वारे), तेव्हा आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी होती, कोणत्या आंतरराष्ट्रीय, साम्राज्यवादी शक्ती सशक्त होत्या वा देशातील कोणते वर्ग जोरावर होते याचे तपशील दिलेले आहेत आणि त्यामुळेच देशातील वेळोवेळीच्या राजकारणाचं खरं स्वरूप समजून घेण्यास अंतर्दृष्टी लाभते. तत्कालीन परिस्थितीचा संदर्भ स्पष्ट होऊन चळवळीच्या वाटचालीचं, चढ-उताराचं केवळ समग्र नाही, तर सर्वांगीण आकलन साध्य होतं.
-
Good Muslim Bad Muslim (गुड मुस्लीम बॅड मुस्लीम)
'चांगला' मुसलमान कोण? 'वाईट' मुसलमान कोण? - हे कुणी ठरवलं? कसं ठरवलं? का ठरवलं? मुळात 'गुड मुस्लीम', 'बॅड मुस्लीम' या संकल्पनांचा व 'राजकीय ओळखीं'चा उद्भदवच कसा झाला? अशा अनेक प्रश्नांच्या अंगाने 'शीत युध्दा'नंतरच्या काळातील जागतिक राजकारणाचं अभ्यासपूर्ण व मार्मिक विश्लेषण करणाऱ्या 'गुड मुस्लीम-बॅड मुस्लीम' या महमूद ममदानी लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद. महमूद ममदानी हे एक जागतिक कीर्तीचे अभ्यासक आणि मानववंश शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते, पाश्चात्त्यांनी जाणीवपूर्वक अशा स्वरूपाच्या सुलभ व्याख्या केल्या की, पाश्चात्त्य संकल्पनांनी संस्कारित तो म्हणजे 'गुड मुस्लीम' आणि आधुनिक-पूर्व विचारांना धरून ठेवणारा वा कडव्या विचारांचा तो 'बॅड मुस्लीम'. एकंदरीतच, १९६०च्या दशकातील व्हिएतनाम युध्द ते '९/११'च्या घटनेनंतरचा काळ या दरम्यान अमेरिका व त्यांच्या पाश्चात्त्य मित्रराष्ट्रांनी आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी मुस्लीम समाजसमूहांची 'धार्मिक ओळख' आणि 'राजकीय ओळख' यांची कशी हेतुपुरस्सर सरमिसळ केली आणि त्याचे किती विपरीत परिणाम संभवले, त्याचा उलगडा ममदानी या पुस्तकाद्वारे करू पाहतात. प्रदीर्घ संशोधन व विश्वासार्ह संदर्भांच्या आधारे त्यांनी हे पुस्तक सिध्द केलं आहे. जागतिक राजकारणातील अनेक अज्ञात गोष्टींवर, घटनांवर नव्याने प्रकाश टाकून अनेक गैरसमजुती दूर करू पाहणारं आणि जागतिक शांततेच्या दृष्टीने सर्वांनाच विचारप्रवृत्त करू पाहणारं असं हे पुस्तक... 'गुड मुस्लीम बॅड मुस्लीम!'
-
Tya Daha Varshantil Guru Dutta (त्या दहा वर्षांतील
मी ते दृश्य लिहून पूर्ण करेस्तोवर जवळपास मध्यरात्रीची वेळ झालेली होती. गुरू दत्त यांनी माझ्यासोबत जेवायला बसायचं कबूल केलं होतं, परंतु प्रत्यक्षात त्यांनी काही देखील खाल्लेलं नव्हतं. मला भूक लागलेली असल्याने मी मात्र यथेच्छ जेवलो. ज्या अर्थी गुरू दत्त मद्याचा प्याला लीलया हाती धरून होते, त्या अर्थी ते पिऊन खूप बेहोश झाले होते, अशातली गोष्ट नव्हती. परंतु त्यांची मनोऽवस्था मात्र निश्चितच भयानक होती. मला त्यांना संहिता वाचून दाखवायची होती, पण ते जराही ऐकून घेण्याच्या मनोऽवस्थेत नव्हते. खरंतर त्यातून मला संकेत मिळायला हवा होता. (अबरार अल्वी) गुरू दत्तने अबरारना संहिता रतनकडे ठेवून जाण्यास सांगितलं. ''इफ यू डोन्ट माईंड आय वुड लाइक टू रिटायर,'' असं म्हणून गुरू दत्त उठून उभे राहिले आणि आपल्या खोलीत गेले... ते गुरू दत्तचे अखेरचे शब्द ठरणार होते. गुरू दत्तचे निकटतम सहकारी व जिवलग मित्र अबरार अल्वी यांच्या कथनातून गुरू दत्तच्या व्यक्तिमत्त्वावर व त्याच्या अकाली मृत्यूसह त्याच्या जीवनातील विविध घटनांवर नव्याने प्रकाश. अबरार-गुरू दत्त यांच्या १९५४-६४ दरम्यानच्या सहप्रवासातून साकार झालेल्या 'प्यासा', 'कागज के फूल' व 'साहिब बीबी और गुलाम'सह सर्व चित्रपटांच्या निर्मितीप्रक्रियेचा सूक्ष्म वेध
-
Asa Ghadala Bharat (।। असा घडला भारत ।।)
भारताचा प्रदीर्घ स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मूलभूत स्वरूपाच्या कोणत्या गोष्टी घडून आल्या? पुढील काळात राजकारण-समाजकारण कसं बदलत गेलं? अर्थ-उद्योग ते विज्ञान आदी क्षेत्रात कसे बदल संभवत गेले? कितपत विकास साध्य झाला आणि कशा बाबतीत अधोगती संभवली? आपल्या वाटचालीच्या दृष्टीने कोणत्या आंतरराष्ट्रीय घटना अनुकूल वा प्रतिकूल ठरल्या? चित्रकला, नाट्यक्षेत्र ते चित्रपटमाध्यम यातून बदलत्या परिस्थितीचं प्रतिबिंब किती परिणामकारकतेने प्रतीत झालं? क्रीडाविश्वात काय बदल घडले? अशा प्रश्नांची उत्तर देणाऱ्या व जनजीवन घडवणाऱ्या विविध क्षेत्रांतील घटना आणि त्याचप्रमाणे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती-दुर्घटना आदींचाही वेध या ग्रंथातून घेतला आहे. गतकाळातील घटनांचा जास्तीतजास्त तटस्थतेने मागोवा घेण्याचा आम्ही यत्न केला आहे. त्यामागे केवळ स्मृतींना उजाळा द्यावा इतका मर्यादित उद्देश नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे, त्यांना या गतघटनांचं नव्याने आकलन व्हावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उगवत्या पिढीला गतकाळाचं नेमकं भान यावं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लागावा, हे अभिप्रेत आहे. एकंदरीत, आपल्या भोवतालाचं समग्र भान देऊ पाहणारा असा हा महद्ग्रंथ असा घडला भारत !