Selective Memories
शोभा डे हे नाव बहुचर्चित. कोणत्या ना कोणत्या जगावेगळ्या वागण्यामुळं शोभा डे नेहमीच वादग्रस्त ठरल्या आहेत. 'स्फोटक आणि खळबळजनक’ या शिक्याआड दडलेल्या एका संवेदनशील सच्च्या व्यक्तीचं दुर्मिळ दर्शन 'सिलेक्टिव्ह मेमरी’मधून वाचकांना घडत जातं. अपरिचित वाटांवर हट्टानं, आत्मविश्वासानं पाय रोवणारी, आपल्या व्यक्तिमत्त्वाला नवनवे आयाम जोडणारी खंबीर, आत्मनिर्भर स्त्री वाचकांना झपाटून टाकते. एका ग्लॅमरस व्यक्तीचं विलक्षण पारदर्शी रूप वाचकांना नाविन्याचा अनुभव देते. शोभा डे यांच्या मूळ पुस्तकाचा आत्मा ओळखून आपल्या स्वतंत्र भाषेत अपर्णा वेलणकर यांनी त्याचा अत्यंत रसाळ अनुवाद मराठी वाचकांसाठी सादर केला आहे. शोभा डे यांच्या या मोजक्या अघळपघळ आठवणीत मॉडेलिंगच्या करिअरमधील लोक विलक्षण अनुभव आहेत. 'स्टारडस्ट’ चालवताना दिसलेली नटनट्यांच्या स्वभावप्रवृत्तीची विविध रूपे आहेत. कौटुंबिक जीवन, वृत्तपत्र स्तंभलेखन, कादंबरीलेखन याबाबतचे कसदार अनुभव आहेत. आपले सर्व अनुभव अलिप्तपणे परंतु रंजकतेने सांगण्याची भाषिक क्षमता असल्याने 'सिलेक्टिव्ह मेमरी' विलक्षण भावनांचा पट वाचकांपुढे खुला करते. या स्मरणयात्रेत विविध क्षेत्रातील दंभ, ढोंग उघड झालेले आहे. आपल्या निर्भिड, रोखठोक शैलीत स्वत:चा व अनुभवलेल्या सर्व मार्गाचा घेतलेला वेध म्हणजे 'सिलेक्टिव्ह मेमरी'.