-
The God Of Small Things(द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज)
पृथ्वीच्या गर्भातून उमटणारे साद-प्रतिसाद, ध्वनी-प्रतिध्वनी, अश्रू आणि हुंदके हे ह्या लेखनाचे प्राणतत्त्व ! मानवी अस्तित्वाला घेरून असणारी आदिम भीति आणि नियतीच्या पाशामधील अपरिहार्यता यांचे वेढे उलगडून पाहणार्या या अद्वितीय लेखनाला अदृश्य मानसिक पणाचे अस्तर आहे. अपरिमित प्रेम, द्वेष, मत्सर, विश्वासघात, तीव्र तिरस्कार, अपराधीपणाचा डंख, अशा अनेक भावभावनांचे पदर कोळ्यांच्या जाळ्या सारखे धावत राहतात. विणले जातात - त्या जाळ्यांच्या वेढ्यांमधून सुटता येत नाही. स्वत:त वेगळे करता येत नाही - कथानकाच्या शब्दाशब्दातून ठिबकणारा शोक, गूढ रहस्य आणि काळीज हलवून टाकणारी खिन्न्ता हे सारेच गूढ अजब चेटूक आहे - अश्या शब्दात जागतिक पातळीवर वाखाणल्या गेलेल्या ह्या 'बुकर पुरस्कार’ विजेत्या कादंबरीचा हा अनुवाद अपर्णा वेलणाकर ह्यांनी इतक्या समरसतेने केला आहे की त्यांनाही साहित्य अकादमीने त्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविले आहे.
-
Speed Post (स्पीडपोस्ट)
आई आणि मुलांमधला रक्तबंध आदिम...शरीराने आणि मनानेही काळजाशी घ्ट्ट बांधलेला ! सुंदर, निरामय जीवनमूल्यांना पैशाच्या दावणीशी बांधून मानवी नात्यांमधला प्राणच शोषू पाहाणार्या आधुनिक अर्थसत्तेने आई मुलांच्या नात्याला नवं परिमाण दिलं आहे... हादरे आणि आव्हानही दिलं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ख्यातनाम लेखिका शोभा डे यांनी आधुनिकतेच्या झंझावातात जगणार्या आपल्या सहा मुलांना लिहिलेली ही पत्रं... जगातल्या कुठल्याही आईला तिचीच वाटतील अशी ! गोंधळून टाकणार्या, जीवघेण्या स्पर्धेत लोटून उद्ध्वस्त करणार्या दुनियेशी टक्कर देणं अपरिहार्यच बनलेल्या आपल्या मुलांसाठी कुणाही आईचं काळीज तुटावं, अशा प्रत्येक विषयाची चर्चा या पत्रांमध्ये आहे - कुटुंबाची चौकट, परस्परांमधल्या नात्यांचे बंध, कौटुंबिक संस्कृती, परंपरा आणि नीतीमूल्यांचा आग्रह... कठोर शिस्त आणि सारंच झुगारून देणारी बंडखोरी...तासन् तास चालणारे टेलिफोन कॉल्स आणि लठ्ठ बिलांवरून घरात होणार्या हाणामार्या... मध्यरात्रीपर्यंत चालणार्या पार्ट्या आणि इंटरनेटवरचं चॅटींग... वयात येतानाच्या काळज्या, कोवळ्या वयातलं प्रेम, झपाटून टाकणारं शारीरिक आकर्षण आणि मैत्रीची नाजुक गुंतागुंत... जोडीदाराची निवड आणि शारीरिक संबंधांचा तिढा ! देश...देव...धर्म... सामाजिक जबाबदार्या आणि नागरिकत्वाचं भान!- अपरंपार प्रेमाने ओथंबलेली, मायेने जवळ घेणारी, कधी पाठीत धपाटे घालणारी, चिडवणारी, टिंगल करणारी तर कधी धारेवर धरणारी, मनसोक्त हसवणारी आणि हसता हसता अचानक डोळ्यात पाणी उभं करणारी ही सुंदर पत्रं... 'जगण्या'साठी आसुसलेल्या प्रत्येक मनाला स्पर्शून जातील
-
Selective Memories
शोभा डे हे नाव बहुचर्चित. कोणत्या ना कोणत्या जगावेगळ्या वागण्यामुळं शोभा डे नेहमीच वादग्रस्त ठरल्या आहेत. 'स्फोटक आणि खळबळजनक’ या शिक्याआड दडलेल्या एका संवेदनशील सच्च्या व्यक्तीचं दुर्मिळ दर्शन 'सिलेक्टिव्ह मेमरी’मधून वाचकांना घडत जातं. अपरिचित वाटांवर हट्टानं, आत्मविश्वासानं पाय रोवणारी, आपल्या व्यक्तिमत्त्वाला नवनवे आयाम जोडणारी खंबीर, आत्मनिर्भर स्त्री वाचकांना झपाटून टाकते. एका ग्लॅमरस व्यक्तीचं विलक्षण पारदर्शी रूप वाचकांना नाविन्याचा अनुभव देते. शोभा डे यांच्या मूळ पुस्तकाचा आत्मा ओळखून आपल्या स्वतंत्र भाषेत अपर्णा वेलणकर यांनी त्याचा अत्यंत रसाळ अनुवाद मराठी वाचकांसाठी सादर केला आहे. शोभा डे यांच्या या मोजक्या अघळपघळ आठवणीत मॉडेलिंगच्या करिअरमधील लोक विलक्षण अनुभव आहेत. 'स्टारडस्ट’ चालवताना दिसलेली नटनट्यांच्या स्वभावप्रवृत्तीची विविध रूपे आहेत. कौटुंबिक जीवन, वृत्तपत्र स्तंभलेखन, कादंबरीलेखन याबाबतचे कसदार अनुभव आहेत. आपले सर्व अनुभव अलिप्तपणे परंतु रंजकतेने सांगण्याची भाषिक क्षमता असल्याने 'सिलेक्टिव्ह मेमरी' विलक्षण भावनांचा पट वाचकांपुढे खुला करते. या स्मरणयात्रेत विविध क्षेत्रातील दंभ, ढोंग उघड झालेले आहे. आपल्या निर्भिड, रोखठोक शैलीत स्वत:चा व अनुभवलेल्या सर्व मार्गाचा घेतलेला वेध म्हणजे 'सिलेक्टिव्ह मेमरी'.
-
Ladies Coupe
ही आहे कथा स्वत:चंच आयुष्य विंचरून पाहणार्या एका स्त्रीची, अखिलनंदेश्वरी ऊर्फ अखिला. वय वर्ष पंचेचाळीस, अविवाहित, सरकारी खात्यात कारकून, जगता जगता इतकी ओझी येत गेली खांद्यावर की, तिचं स्वत:साठी जगणं... स्वत:च्या मर्जीनं जगणं राहूनच गेलं. मुलगी म्हणून, बहीण म्हणून, आत्या आणि मावशी म्हणून ती उष्ट्या संसारांच्या खरकट्यात फक्त पिचत राहिली. हे रहाटगाडगं खरं तर असंच चालू राहायचं; पण एके दिवशी कशी कोण जाणे, स्वत:चीच हाक ऐकून अखिला निघाली... कन्याकुमारीच्या प्रवासाला - एकटीच. आयुष्यात पहिल्यांदाच मोकळा श्वास घ्यायला... तमिळ ब्राह्मण कुटुंबाने तिच्या अविवाहितपणाभोवती घातलेली कर्मठ रिंगणं तोडून स्वत:च्या मनासारखं जगायला... स्वत:साठी जगायला... आयुष्याची वेगळी चव चाखायला. रेल्वेच्या प्रवासात तिला भेटतं एक वेगळंच जग. लेडीज कूपेच्या धावत्या आडोशात भेटतात आणखी पाच जणी. बघता बघता परकेपणाची बंधनं गळून पडतात. सहा जणींच्या आयुष्याच्या सहा दिशा पकडून गाडी भरधाव सुटते. जखमा मोकळ्या होतात. गुपितांच्या गाठी सुटतात. सहा वेगळी आयुष्यं सहा जणींत वाटली जातात. जानकी... मार्गारेट शांती... प्रभादेवी... शीला... मारीकोलान्थू. लेडीज कूपेमधून प्रवास करताना तिला भेटलेल्या या पाचही जणींना अखिला विचारतेच, "पुरुषांच्या आधाराशिवाय बाई एकटी राहू शकते ? सुखाने, आनंदाने जगू शकते ? की बाईला पुरुष हवाच असतो शेवटी ?"
-
The Breadwinner
अफगाणिस्तान, तेथील तालिबानी राजवट ह्यांच्या अंगावर शहारे आणणार्या बातम्या आपण वाचलेल्या आहेत. काही लेखांतून तेथला खुनशीपणाही जाणवला आहे. ही कादंबरी त्याचे मूर्तिमंत चित्रच आपल्या डोळ्यांपुढे उभी करते. सामान्यत: स्त्री जीवन हे कठीणच मानले जाते परंतु तेथे तर ह्या कठीणतेने परिसीमाच गाठली होती म्हणूनच परवानासारख्या मुलीवर तेथे 'मुलगा’ होऊन वावरण्याची पाळी आली होती आणि संधी मिळताच पाकिस्तानातील जिणेही काही सुखावह नाही हे माहिती असूनही तिकडचीच वाट धरावी लागली होती-सत्य हे कल्पनेपेक्षाही भयंकर असू शकते हे नकळत पटवून देणारी कादंबरी.
-
Parvana
एकेकाळी फळांनी लगडलेल्या वृक्षांनी,गव्हाच्या शेतांनी आणि भाजीपाल्याच्या लागवडीने हिरवागार असणारा, खळाळत्या नद्यांचा मध्य आशियातील चिमुकला देश- अफगाणिस्तान. या देशावर आक्रमण करणार्या घुसखोरांच्या टोळ्यांनी हा देश संपूर्णपणे बेचिराख करून टाकला. सोव्हिएत रशियाच्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या सरकारच्या विरोधात अमेरिकेच्या हस्तक टोळ्यांनी १९७८ साली उठाव केला. तेंव्हापासून अफगाणिस्तान युद्धाच्या खाईत अखंड जळतो आहे. सोव्हिएत रशियाबरोबरच्या युद्धात मारल्या गेलेल्या अफगाणी स्त्री- पुरुषांची अनाथ, निराधार म्हणून वाढलेली मुलं, हे 'तालीबान' बनले. अमेरिकेच्या छुप्या मदतीने पाकिस्तानात ते तयार केले गेले. कडव्या संतापानं पेटलेलं हे तालीबानी तारुण्य मारण्यासाठी मरण्यासाठीही तयार होतं. कित्येक वर्षांच्या युद्धानं मोडकळीस आलेल्या, उध्वस्त झालेल्या अफगाणिस्तानात तालिबान्यांचा हैदोस सुरू झाला. युद्धाचे निखारे, आगीचे लोळ, बॉम्बच्या धमाक्यांनी उध्वस्त झालेल्या इमारतींचे सांगाडे, दगडमातीचे ढिगारे, बेचिराख भूमीवर भुकेल्या, आजारी शरीरांच्या झुंडी, कित्येक महिन्यात प्रकाशाचा स्पर्शच न झाल्यामुळे फिकुटलेल्या, अशक्त स्त्रिया, जन्मल्यापासून घराच्या बाहेरच न पडलेली, हातापायांचे सांधे आखडून लोळागोळा झालेली मुलं.... सुन्न करणारं पशुत्व.... आणि रक्तामासाच्या चिखलातसुद्धा मुळं धरणारी निखळ माणुसकी.... हे सर्व या कहाणीतून तीव्रतेने प्रहार करतं. इतक्या पराकोटीच्या परिस्थितीत केस कापून, मुलाचे कपडे घालून काबूलच्या रस्त्यावर पाय ठेवणारी, युद्धाच्या विध्वंसात जगणं शोधणारी, स्वत:च्या हिंमतीवर जगणारी परवाना ही धैर्याचं, जीवनेच्छेचं आणि अम्लान माणुसकीचं प्रतिक ठरते. 'द ब्रेडविनर' मधून तिची ही कहाणी प्रथम पुढे आली. आणि 'परवाना' मध्ये तिच्या त्यानंतरच्या रानोमाळ केलेल्या भटकंतीचं हृदयद्रावक चित्रण आहे. अत्यंत भेसूर, उजाडपणातही तिच्या मनातला माणुसकीचा पाझर सुकलेला नाही. दगडमातीच्या ढिगार्यात अडकलेले तान्हुले, अपंग झालेला आसिफ, बेसहारा झालेली लैला यांना घेऊन जीवनाकडे जाण्याची तिची जिद्द आणि चिकाटी पाहून थक्क व्हायला होते. विध्वंसातही टिकून राहणारी, जगू पाहणारी माणुसकी हृदयाचा ठोका चुकवते.
-
For Here Or To Go?
"फॉर हिअर, ऑर टू गो ?" इथेच थांबून आस्वाद घेणार, की इथले खाद्यपदार्थ सोबत घेऊन 'तिकडे' जाणार ? - जगभरातल्या 'मॅकडोनल्डस्'मध्ये विचारला जाणारा हा प्रश्न. चाळीस-पंचेचाळीस वषा|पूर्वी मध्यमवर्गीय मानसिकतेची कुंपणं तोडून महासागर ओलांडण्याचं धाडस करणा-या मराठी माणसांनी उत्तर अमेरिकेत नवं आयुष्य उभारायची धडपड सुरूकेली, त्या क्षणापासून या प्रश्नाने त्यांचा पिच्छा पुरवला. 'इथेच' राहून इथले होणार? की 'इकडली' पुंजी बांधून घेऊन 'तिकडे' परत जाणार ? खिशात आठ डॉलर्स, बॅगेत वीस किलो सामान आणि अज्ञाताला तोंड देण्याइतपात मनाचा हिय्या एवढ्या भरवश्यावर या माणसांनी दहा हजार मौलांची उडी मारली, तर रात्रीचा दिवस आणि दिवसाची थेट रात्रच. उत्तर अमेरिकेच्या भूमीवर पाय रोवणारी मराठी माणसांची पाहिली पिढी. त्या पिढीच्या संघर्षाची ही कहाणी. परक्या देशात रुजण्यासाठी दिलेल्या झुंजीची... सोसलेल्या असह्य ओढाताणीची... अपार कष्टांची.. हिंमतीची... अपरंपार वैभवाची.. झळाळत्या यशाची आणि एकट्या, एकाकी अपयशाचीही !
-
Ladies Kupe
ही आहे कथा स्वत:चंच आयुष्य विंचरून पाहणार्या एका स्त्रीची, अखिलनंदेश्वरी ऊर्फ अखिला. वय वर्ष पंचेचाळीस, अविवाहित, सरकारी खात्यात कारकून, जगता जगता इतकी ओझी येत गेली खांद्यावर की, तिचं स्वत:साठी जगणं... स्वत:च्या मर्जीनं जगणं राहूनच गेलं. मुलगी म्हणून, बहीण म्हणून, आत्या आणि मावशी म्हणून ती उष्ट्या संसारांच्या खरकट्यात फक्त पिचत राहिली. हे रहाटगाडगं खरं तर असंच चालू राहायचं; पण एके दिवशी कशी कोण जाणे, स्वत:चीच हाक ऐकून अखिला निघाली... कन्याकुमारीच्या प्रवासाला - एकटीच. आयुष्यात पहिल्यांदाच मोकळा श्वास घ्यायला... तमिळ ब्राह्मण कुटुंबाने तिच्या अविवाहितपणाभोवती घातलेली कर्मठ रिंगणं तोडून स्वत:च्या मनासारखं जगायला... स्वत:साठी जगायला... आयुष्याची वेगळी चव चाखायला. रेल्वेच्या प्रवासात तिला भेटतं एक वेगळंच जग. लेडीज कूपेच्या धावत्या आडोशात भेटतात आणखी पाच जणी. बघता बघता परकेपणाची बंधनं गळून पडतात. सहा जणींच्या आयुष्याच्या सहा दिशा पकडून गाडी भरधाव सुटते. जखमा मोकळ्या होतात. गुपितांच्या गाठी सुटतात. सहा वेगळी आयुष्यं सहा जणींत वाटली जातात. जानकी... मार्गारेट शांती... प्रभादेवी... शीला... मारीकोलान्थू. लेडीज कूपेमधून प्रवास करताना तिला भेटलेल्या या पाचही जणींना अखिला विचारतेच, "पुरुषांच्या आधाराशिवाय बाई एकटी राहू शकते ? सुखाने, आनंदाने जगू शकते ? की बाईला पुरुष हवाच असतो शेवटी ?"