Parvana
एकेकाळी फळांनी लगडलेल्या वृक्षांनी,गव्हाच्या शेतांनी आणि भाजीपाल्याच्या लागवडीने हिरवागार असणारा, खळाळत्या नद्यांचा मध्य आशियातील चिमुकला देश- अफगाणिस्तान. या देशावर आक्रमण करणार्या घुसखोरांच्या टोळ्यांनी हा देश संपूर्णपणे बेचिराख करून टाकला. सोव्हिएत रशियाच्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या सरकारच्या विरोधात अमेरिकेच्या हस्तक टोळ्यांनी १९७८ साली उठाव केला. तेंव्हापासून अफगाणिस्तान युद्धाच्या खाईत अखंड जळतो आहे. सोव्हिएत रशियाबरोबरच्या युद्धात मारल्या गेलेल्या अफगाणी स्त्री- पुरुषांची अनाथ, निराधार म्हणून वाढलेली मुलं, हे 'तालीबान' बनले. अमेरिकेच्या छुप्या मदतीने पाकिस्तानात ते तयार केले गेले. कडव्या संतापानं पेटलेलं हे तालीबानी तारुण्य मारण्यासाठी मरण्यासाठीही तयार होतं. कित्येक वर्षांच्या युद्धानं मोडकळीस आलेल्या, उध्वस्त झालेल्या अफगाणिस्तानात तालिबान्यांचा हैदोस सुरू झाला. युद्धाचे निखारे, आगीचे लोळ, बॉम्बच्या धमाक्यांनी उध्वस्त झालेल्या इमारतींचे सांगाडे, दगडमातीचे ढिगारे, बेचिराख भूमीवर भुकेल्या, आजारी शरीरांच्या झुंडी, कित्येक महिन्यात प्रकाशाचा स्पर्शच न झाल्यामुळे फिकुटलेल्या, अशक्त स्त्रिया, जन्मल्यापासून घराच्या बाहेरच न पडलेली, हातापायांचे सांधे आखडून लोळागोळा झालेली मुलं.... सुन्न करणारं पशुत्व.... आणि रक्तामासाच्या चिखलातसुद्धा मुळं धरणारी निखळ माणुसकी.... हे सर्व या कहाणीतून तीव्रतेने प्रहार करतं. इतक्या पराकोटीच्या परिस्थितीत केस कापून, मुलाचे कपडे घालून काबूलच्या रस्त्यावर पाय ठेवणारी, युद्धाच्या विध्वंसात जगणं शोधणारी, स्वत:च्या हिंमतीवर जगणारी परवाना ही धैर्याचं, जीवनेच्छेचं आणि अम्लान माणुसकीचं प्रतिक ठरते. 'द ब्रेडविनर' मधून तिची ही कहाणी प्रथम पुढे आली. आणि 'परवाना' मध्ये तिच्या त्यानंतरच्या रानोमाळ केलेल्या भटकंतीचं हृदयद्रावक चित्रण आहे. अत्यंत भेसूर, उजाडपणातही तिच्या मनातला माणुसकीचा पाझर सुकलेला नाही. दगडमातीच्या ढिगार्यात अडकलेले तान्हुले, अपंग झालेला आसिफ, बेसहारा झालेली लैला यांना घेऊन जीवनाकडे जाण्याची तिची जिद्द आणि चिकाटी पाहून थक्क व्हायला होते. विध्वंसातही टिकून राहणारी, जगू पाहणारी माणुसकी हृदयाचा ठोका चुकवते.