Sanket ( संकेत ).
वैजूनं चिमणी पेटवली. ती हातात धरून सारी झोपडी निरखली. सापांच्या पेट्या व्यवस्थित होत्या. नागिणीच्या टोपलीवरचा दगड तसाच होता. मग मुंगसाला घाबरायला काय झालं ? वैजू मुंगसाजवळ गेला. त्याच्या पाठीवरून हात फिरवला. नेहमी जवळ जाताच कुशीत चढणारं ते मुंगूस वैजूच्या हातून सुटण्याची धडपड करीत होतं. भीतीनं त्याचं अंग फुललं होतं. वैजूच्या मनात एक अनामिक भीती तरळून गेली. त्यानं झोपडीचं दार उघडलं आणि मुंगसाला तो शांत करू लागला; पण मुंगसाची धडपड वाढली होती. अशाच धडपडीत एका हिसक्याबरोबर मुंगसाची कडी तुटली आणि सुटलेलं ते मुंगूस झोपडीच्या दरवाजातून पळालं. त्याला हाक मारत वैजू दरवाजापर्यंत गेला. त्याच वेळी त्याच्या कानांत ती दीर्घ शीळ आली. उभ्या जागी वैजू खिळून राहिला. झोपडीतून तशीच शीळ उठत होती. वैजूनं धीर करून मान वळवली. नागिणीच्या टोपलीतूनच तो आवाज येत होता. शीळ थांबताच त्या टोपलीतून भुसकारे उठत होते. वैजूनं गडबडीनं झोपडीचं दार लावलं आणि तो अंथरुणावर जाऊन कुडाला टेकून बसला. शिळेचे साद वाढत होते. जवळ जवळ साद येत होती. वैजूला वाटलं की, जेव्हा आपण दारात होतो तेव्हाच पळून जायला हवं होतं... पळून जायचा विचार पक्का झाला. धीर करून वैजूनं झोपडीचं दार उघडलं आणि एकदम मागे सरला. दारात उभा राहिलेला नागाचा फणा डोलत होता. वैजू मागं वळला. भिंतीचा कूड गाठून तो बसला; पण त्याची नजर दाराशी डुलणार्या त्या आकृतीवर खिळली होती. टोपलीतल्या नागिणीची धडपड वाढली होती. टोपलीवरचा दगड हेलकावे घेत होता. दारातल्या नागानं आपला फणा मिटला आणि ते मोठे धूड वळवळत झोपडीत शिरलं. नाग सरळ त्या टोपलीकडे जात होता. टोपलीजवळ जाऊन त्यानं फणा मिटला आणि ते मोठे धूड वळवळत झोपडीत शिरलं. नाग सरळ त्या टोपलीकडे जात होता. टोपलीजवळ जाऊन त्यानं फणा उभारला. टोपलीवर तो डुलत होता. त्याच्या भुस्कार्याला टोपलीतून प्रतिसाद येत होता. झाकणाला आतून धक्के बसत होते आणि त्या हादर्यांनी डुलणारा वरचा दगड कोलमडला...